बांडगुळ
बांडगुळ
1 min
41.9K
बांडगुळ.....
वृक्ष उन्मळून पडलाय.
वेढलंय त्याला बांडगूळानी.
वासनेच्या चक्राकार फोडानी
चिकचिकत झालेल्या त्याच्या देहाला
सोसाव्या लागतायत जखमा.
हरित पटलाच्या संवेदनातून
धावतोय घृणा आणणारा स्त्राव.
श्वासाच्या मुळांनी केलीय
फितुरी आजन्म शुष्कपणाची.
शुक्राचार्यांच्या शापित
वाणीसारखा भोगू लागलाय वृक्ष
एक भग्न अवस्था......
बहरलेल्या वृक्षाला लागलीत फुलं पानं.
पण आतून पोखरून गेलेली
त्याची काया हिणवतेय त्याला "व्यभिचारी"
तो विव्हळून म्हणत असतो
दोष माझा नाही ग ....
माझा नाही ....
--- हे सर्वेशा
दोष माझा नाही,
दोष इतकाच -
त्या बांडगुळाला
माझ्या देहावर मी दिला आसरा
आणि गमावून बसलो माझे
तू दिलेले पावित्र्य....
आणि सोबत वाहवतोय
अस्वस्थपणाची अश्वत्थाम्यासारखी शापवाणी....
