आठवणीतले क्षण
आठवणीतले क्षण
दिवाळीपेक्षाही असायची,तयारी ती फारच न्यारी
जेव्हा माझ्या आजोळी यायची,श्री गणेशाची स्वारी....
चार दिवस आधीच मुक्काम आमचा,असे मामाच्या घरी
लहान मोठे होऊनी एक,कामे पूर्ण करू सारी
आनंद अन् उत्साहाने,भरून जाई दिशा चारी
जेव्हा माझ्या आजोळी यायची,श्री गणेशाची स्वारी.....
मखर आणि आरास देवाची,रात्रभर जागून होई
एकवीस दुर्वांच्या जुड्या करायला,बसत साऱ्या आज्जीबाई
मध्येच कधीतरी सगळ्यांना,चहाची हो तल्लफ येई
माऊली ती तेव्हा सुध्दा,कप चहाचा हाती देई
जेव्हा माझ्या आजोळी,श्री गणेशाची स्वारी येई...
दिवस उजडे आनंदाचा,आशिर्वाद मिळे गणरायाचा
प्रसाद असे हो,लाडू,पेढे अन् मोदकाचा
तृप्त होती सारे जण,आस्वाद घेता भोजनाचा
दुपारी खोलीत दुसऱ्या,डाव रंगे तो प्लांचेटचा
मोठे सारे दम भरती,आवाज फार नाही करायचा
जेव्हा माझ्या आजोळी ,श्री गजानन यायचा....
मौज फार असे त्या, रात्रीच्या मोठ्या आरतीची
सूर लागे साऱ्यांचा,साथ त्याला उत्तम तबल्याची
हौस फारच असे सगळ्यांना,एकत्र नाचण्याची
देवाला आळवून,रात्र सारी जागवण्याची
मग येई तो दिवस दुसरा,वेळ होई विसर्जनाची
पुढल्या वर्षीचा वायदा देऊन,निघे स्वारी गणपतीची
सारेच जाती घरा आपुल्या,जाणीव होई खिन्नतेची
दिवस ते सरले सारे,ओढ मात्र असे भेटीची
आजही आम्ही जपतो आहोत,शिदोरी त्या आठवणीची...
