आठवणी
आठवणी
बाई आत्ताच माझं डोकं तुला लागलं रे, आता?
आता काही नाही शिंग येतील फक्त तुला...
नाही रे दादा,नको ना अस म्हणू,भीती वाटते रे,
मग का डोकं हाणल मला बर ,आता घे शिंग...
बाई आता मी चक्क एक बी गिळली ग,आता?
आता काही नाही मोठ झाड येईल फक्त पोटात..
नाही ना आई,नको ना म्हणू अस,भीती वाटते ग,
मग नीट पाहून खायचं की,आता घे झाड ...
बाई आता मी तिन्ही सांजेला चंफुल खेळले ग, आता?
आता काही नाही फक्त हात उलटा होईल तुझा..
नाही ना आजी,नको अस म्हणू, भीती वाटते ग,
मग नको म्हणलं तरी खेळते,घे आता उलटा हात..
बाई मी चोरून एक प्रसादाचा लाडू खाल्ला ,आत्ता?
आता काही नाही देवबाप्पा देईल शिक्षा देईल तुला..
नको ना ताई अस म्हणू,भीती वाटते ग..
मग चोरून खाऊ नये सांगते तरी खाते,मग आता भोग शिक्षा..
बाई लहानपणी मी हे सारे कुटाणे केले ,आता?
आता काही नाही,फक्त आठवणीत मस्त रमशिल तू..
वाह अस काही तरी म्हणा म्हणजे भीती गायब होईल ग..
मग असे कुटाणे केले की आयुष्यात सुंदर आठवणी मग राहतात..
