अंजली (Anjali) बुटले (Butley)

Children Stories Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Children Stories Others

खाऊचा दोरा

खाऊचा दोरा

7 mins
284


बर्याच दिवसानी पाहिले की घरी आलेल्या पाहुण्यांनी वर्तमानपत्राच्या कागदात दोर्याने गुंडाळलेली खाऊची पुडी हातात दिली...प्लास्टीक बंदीचा परीणाम!


२०-२५ वर्षापुर्वी घरात येणारे वाण सामान, खाऊ अशाच पुडीत बांधुन यायचे...आणलेले वाण सामान निट साफ करून डब्यात भरून ठेवले जायचे व कागद नीट घडी करुन परत वापरण्यासाठी बाजुला करुन ठेवला जायचा. पुडीला लावलेला दोरापण रीकाम्या काड्यापेटीला किंवा नीट लहान घडी घातलेल्या कागदाला, कुठल्यातरी वस्तुला नीट गुंडाळुन ठेवला जायचा, तर कधी आपल्याच हाताच्या २-३ बोटांवर दोरा गुंडाळुन त्याची छान 'लड' तयार केली जायची. मग त्या लडीचे वेगवेगळे आकार तयार करायचे, कधी बाहुली, तर कधी एखादा पक्षी, किंवा इतर काही. ही सगळी खटाटोप कशासाठी तर दोर्याचा परत वापर करता यावा ह्या साठी!


खरतर ते काही 'सोन' नव्हतं जपुन ठेवण्यासाठी...पण आमच्यासाठी ते सोन्याहुन जास्त प्रिय!!! आई, आजी जश्या काही वस्तु जपुन ठेवायच्या ते बघुन बघुन नकळत शिकल्या गेल हे सर्व. फुकटात, नकळत शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत किती अस कोणी आज विचारलच तर नक्की किती सांगायची हा मोठा गहन प्रश्न समोर उभा राहतो. व्यवाहरीक बाजारात त्याची किंमत कदाचीत शून्य असेल. खरतर किंमत ठरवायची गरज नसतेच ह्या गोष्टींची. संस्काऱ संस्कार काय म्हणतात ते हेच असेल. पुडीला बांधुन आलेल्या दोर्याला 'खाऊचा दोरा' का म्हणत असतील हा आमच्या बालसुलभ मनाला पडलेला प्रश्न..?.प्रश्न म्हणूनच राहीला आमच्या मनात..... खाण्यात पहीले मन गुंतल्या गेलेले असायच न. मग काय सर्व प्रश्न मनातच विरून जायचे. साधसोप उत्तर ... खाऊच्या पुडीला बांधुन घरी येतो म्हणुन खाऊ दोरा!!!... सोप तर उत्तर आहे, हो की नाही?

"तो कचर्यात टाकण्याचा दोरा सोन्यासारखा जपुन का ठेवायचा?"

"अरे यार त्याच्यात खूप गंमत असते ती, अनुभावी लागते ती.!"

"त्यात काय गंमत?... " चिवडा, भजे,वडा पाव वैगरे खाऊचा तेलकट पणा त्या दोर्याला अधुन मधुन लागलेला असतो. जिलबी बरोबर आला असेल तर साखरेचा थोडा पाक त्याला लागतो... कधी कागदाचा रंग त्याला लागतो!!

हा दोरा कच्चा असतो. हाताने ओढुन सहज तोडला जातो तेही काही दुखापत न होता सहजतेने.

गंमत म्हणजे आपण खाल्लेल्या खाऊची आठवण बर्याच वेळ आपल्या सोबत राहते. आहे न गंमत!


दोरा नीट वर्गवारी करून ठेवायचा...

जाड, बारीक, लांबी ने कमी - जास्त, रंगाने पांढरा शुभ्र, मळका! नकळत ह्या छोट्या कृतीतुन मिळालेल समाधान व अगणित आनंद चेहर्यावऱ पसरलेला असायचा वर्गवारी करताना. मग जेव्हा वेळ मिळेल तसा याचा वापर करायचा...

बघा... जर दोन दोरे एकमेकांना जोडून मोठ्या लांबीचा दोरा करायचा असेल तर, दोन दोर्यांचे एक एक टोक हाताच्या आंगठा व जवळच्या बोटाच्या चिमटीत पकडायचा व हळुच त्याला पिळ देवुन फिरवायचा म्हणजे त्या दोर्याला गाठ पाडता येते, व मग... हाताच्या चिमटीने गाठ पकडुन दोन्ही दोर्याचे दोन सुटे असलेले टोक शोधायचे... व उजव्या हाताच्या चिमटीत एक सुटे टोक व डाव्या हाताच्या चिमटीत दुसर सुट टोक पकडायच व आता दोन्ही हात विरूद्ध दिशेने एकमेकांपासुन लांब करायचे... व बघायचे दोरा किती लांब झाला!!!! हा... हा.. ही... ही... झाला की नाही लांब दोरा!!! ...हो.. हो झाला लांब दोरा!!! आहे कि नाही गंमत.. हो खूप गंमत आहे!!!


आता दुसरी गंमत... दोन हातात जे दोन टोक दोर्याचे आहे ते कोणत्याही एका हातात घेऊ व त्याला गाठ मारू!!

बघा आता ह्या दोर्यापासुन गोल, चौकोन व विविध प्रकारचे आकार बनवता येतात का!! लावा शक्कल.

अरे हो आले कि बनवता!!!

लक्षात  येतनं ह्या खाऊच्या कच्चा दोर्याच्या साह्याने आपले आपणच, गणित, भुमिती, व्यवस्थापनाचे धडे गिरवत असतो किंवा गिरवले जातात नकळतच!! तेही गंमती गंमतीत सहजतेने.


वहीच्या पानाचे दोन भाग नीट करायचे असेल तर, पानाची मधोमध घडी करायची व याच्या आत दोरा ठेवायचा.घडीच्या वरच्या बाजुला दोरा नीट एका हाताने पकडुन ठेवायचा व दुसर्या हाताने घडीच्या खालच्या भागातला दोरा हळुच घडीच्या बाहेरच्या बाजुला ओढायचा म्हणजे घडीवरच कागद हळुहळू फाडत वरच्या बाजूला न्यायचा. कागदाचे दोन भाग नीट केले जायचे. वाकडे तिकडे कागदाचे दोन भाग होत नसायचे.

निट दोन भाग झाले कि आपलीच आपण पाठ थोपवटायची.

शाळेच्या दप्तरातपण खाऊचा दोरा सोबत असायचा. न जाणो कधी कसा वापर करावा लागेल म्हणुन.

शाळेत मैत्रिणी घरच्या झाडांची जाई, जूई, चमेली, मोगरा वैगरेची फुले आणायच्या एकमेकींसाठी.

मग काय, आपला खाऊचा दोरा काढायचा व त्या फुलांपासुन छान गजरा करायचा आपल्या वेणीच्या उंचीचा. शाळेतल्या बाईंनापण गजरा तयार करून द्यायचा, तेव्हढी बाईंना खुश करयाची संधी हुकवायची नाही कधी. कधी कधीतर आमच्यात भांडणपण व्हायची कोण कोण कोणत्या आपल्या आवडीच्या बाईंना पहिले गजरा देणार. बाईंचापण ओरडा खाललेला, शाळेत गजरा करता म्हणून. वर्गात एक मंद वास दरवेळलेला असायचा. त्यात बाईंचा राग विरून जायचा. छान प्रसन्न वातावरण तयार व्हायचे वर्गात. आमचही अभ्यासात लक्ष लागायच.

गणिताच्या बाई सहजतेन गणित शिकता यावे म्हणुन, फुल, गजरा, खाऊचा दोरा ह्याचा वापर करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवायच्या. मज्जा यायची त्यांची उदाहरण देवुन गणिता सारखा अवघड विषय सोपा करून शिकवण्याच्या त्यांच्या शैलीची.


वर्गातं एकमेकांच्या खोड्या काढतांना कागदाच्या चिठ्ठीवर काहीतरी चित्र काढायच व बाई फळ्यावर काही लिहीत असताना पटकन समोरच्या बेंचवर बसलेल्या मुलीच्या वेणीला खाऊच्या दोर्याने ते बांधायच. मग वर्गात हळु आवाजात हश्याचे पिक ऊडायचे. बाईंच्या लक्षात येत होत कि नाही हे सांगता येत नाही. बहुतेक लक्षात येत असेल पण त्या तसे दाखवत नसतील बहुदा. खोडी काढापण कोणाला त्रास होइल असे वागु नका अशी शिकवण त्यांनीच दिलेली आहे. हार, गजरा करायला खाऊचा दोरा वापरायचा कारण कच्चा धागा असेल्यामुळे नाजुक फुलांना त्रासपण होत नाही एकमेकांत दोर्याच्या साह्याने गुंफतांना व आपल्या हातालाही इजा होत नाही. नाजुक वस्तु कशा हळुवारपणे हाताळयाच्या हे पण समजत गेल नकळतं. वर्गात खोड्या काढतांना ही या खाऊच्या दोर्याचा वापर सहजतेने केला जायचा. कागदाची चिठ्ठी करून ती समोरच्या बाकावर बसलेल्या मैत्रिणीच्या वेणीला बांधायची बाईंच फळ्याकडे तोंड असताना.

कधी शाईत बुडवून वहीच्या पानावर एका लईत पसरवुन वेगवेगळे आकार तयार करून चित्र काढायचे. कधी कधी शाई कपड्यांना लागून डाग पडायचे. भांडण करण्यासाठी हे कारण पुरेस असायच.तसेच आईचा ओरडा खायला. शाईचा डाग धुतला तरी निघायचा नाही. आईला खुप त्रास व्हायचा कपडे धुवायला.


देवघरातपण एक खाऊच्या दोरीची गुंडाळी ठेवलेलीच असायची वात तयार करण्यासाठी. दिवा लावतांना ह्या वातीचा उपयोग केला जायचा.

कधी बसल्या बसल्या हार करायला तर कधी

हळदी कुंकवाच्या पुड्या बांधायला...

पानामधे फुलपुडीलापण हा खाऊचा दोरा बांधलेला असायचा.

हळद ओलीकरून खाऊचा दोरा पिवळा रंगाचा करायचा तर कधी कुंकवाचा लाल रंग लावुन लाल खाऊचा दोरा करायचा. कापसाची वात संपलीतर पटकन खाऊच्या दोरा वापरून त्याची वात करून दिवा लावायचा.


उन्हाळ्याच्या सुट्टीत, आपल्या वापरलेल्या वह्यांमधली कोरी पान नीट फाडुन एकत्र करायची व त्याची नविन वही तयार करतांना ह्या दोर्याचा वापर करायचा. हापण एक मोठा सोहळा असायचा. वर्षभरात वहीचा वापर आपण कसा केला, अक्षरं कशी काढली होती, काय काय शेरे बाईंन कडुन, सरांकडुन मिळाले होते. पान कोरका ठेवले होते? अशा प्रश्नावलीतुन घेतला गेलेला आपला वर्षभराचा आपणच घेतलेला आढावा. पुढच्या वर्षी अक्षरं नीट वळणदार काढायची निदान आपल्याला स्वतःला तरी नीट वाचता यावी आपली स्वतःची अक्षरे, अक्षरांचा आकारपण उगाच खूप मोठा असतो आपला, थोडा छोटा करू. कोरी पान मधे सोडु नये, उगाच कोणाचे चित्र वहीमधे काढू नये वैगरे मनात ठरवलेले असते आढावा घेतांना. आत्मपरीक्षण करायची सवय न कळत लागते!!!


लोकरीचे काम, क्रोशा शिकायला, लोकर, चांगला दोरा वापर्यायच्या आधी सरावासाठी हा खाऊचा दोरा वापरायचा. व्यवस्थित क्रोशाची साखळी, खांब टाकायला जमल्यावरच, चांगला दोरा हाती घ्यायचा असा अलिखित नियम आमचा आम्हीच बनवलेला. पैसे न खर्चं करता आपल्या जवळच असलेल्या सामानातुन कला शिकायची , कोणाला त्रासही न देता, हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करायचा. क्रोशा शिकतांना खूप गंमत आलेली. पहिला साखळीचा टाका घालुन दुसरा घालेस तो पहिला टाका सुटलेला असायचा, खूप प्रयत्न केल्यावर हळुहळू जमायला लागल, गाठ पाडू चिमटीत कसा पकडून ठेवायचा पहिला टाका, कारण त्या पहिल्या टायावरच पुढच सगळ अवलंबुन असायच.

नविन डिझाईनपण पहिले खाऊच्या दोर्यानेच करून बघायचे.

बरेच वेळा आईचा ओरडा खालेला वेळ घालवते, केलेले क्रोशाकाम इकडे तिकडे पडून राहतं फेकतापण येत नाही, वापरतापण येत नाही...काय करायचे ह्याचे.


गोधडया शिवायलापण खाऊचा दोरा वापरला जायचा. कचर्यातुन कला काय ते म्हणतात नं हल्ली तश्या आधीपण केल्या जायच्या..

त्याची तशी जाहिरात केली जायची नसायची, कि कुठे आता सारखे महागडे क्लासेस नसायचे. आम्हाला त्या कलावस्तू करतांना खाऊच्या दोर्याचा खूप उपयोग करता आला व पैसे खर्च न करता आहेत्या वस्तूचा परत वापर करता येतो हे नकळत मनात रुजल्या गेलं. हळुहळू खाऊचा दोरा घरात यायच बंद झाल... प्लास्टिक पिशवित पॅक केलेले वाण सामान यायला लागल. जाहिराती असलेया पिशव्या, मेणबत्तीने सिल केलेल्या प्लास्टिक पिशवीत निट पॅक केलेल... मग ह्या पिशव्या जपुन ठेवायला लागलो. खूप सवय झाली प्लस्टीक पिशव्या वापरायची. त्याचे वाईट परीणाम कसे होतात हे समजायला १५-२०वर्ष कसे निघुन गेले हे कळलेही नाही.

युझ आणि थ्रो हे ब्रिद वाक्य आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला. चिकटलाच आहे म्हटले तरी चालेल.


परत मागे फिरायला कमीपणा वाटायला लागलं, मोठे मोठे रिसर्च झाले प्लस्टिक बंदी करण्या आधी... जुन ते सोन होत हे पटवून देतांना नविन शब्द प्रयोग होत असतांना दिसतात, केळीची पान कशी चांगली असतात, यावर जेवण केल्यास कँसर पासून बचाव कसा होतो वैगरे. कागदी पिशव्यांचा परत वापर सुरू होतोय हळुहळू. नविन डिझाईन तयार व्हायला लागले. कापडी पिशव्या परत हाती दिसु लागल्या हाती त्यावरपण जाहिरातींचा प्रभाव दिसतोच.... जाहिरातीचे युग कधीच संपणार नाही असे वाटते...

पुणेरी पाटी ... आमच्याकडे कापडी पिशवीला प्लस्टिक लावून मिळेल, कागदी पिशवीला आतून प्लस्टिकचे अस्तर लावुन मिळेल वैगरे..

गंमतीचा भाग हा... असो. कागदात गुंडाळलेले पदार्थ एकाच मोठ्या कापडी पिशवित निट आणतांना सर्व निट न सांडता आणायला खुप कौशल्य लागत. कुठली वस्तु कशी पिशवित भरायचे याचेपण क्लासेस घेतले जातील याचे नवल वाटुन घेऊ नये. चला दुसर कोणी हे करेल याची वाट न बघता आपणच काढु. वेळपण छान जाईल आपला. एकही हातची खर्च न करता फावल्या वेळत क्लास घेत जावू. नुसत्या कल्पनेनेच समाधानी हसू चेहर्यावर पसरलेल आहे. चला सेल्फी काढून घेवू आपण.

बायोडिग्रेडीबल, रियुज,रिसायकल, रिक्रीयेट वैगरे सारखे जड शब्द वापरून 'खाऊचा दोरा' अॅमेझॉन शॉपिंग साईटवर डॉलर किंमतीत विकायला आलातर आश्चर्याचा धक्का बसेल कदाचीत तुम्हाला!! पण लवकरच मिळेल ही!!! पेटली का तुमची ट्युबलाईट, लाईट?

मीच तशी सोय करते आता.

आपलाही छान वेळ जाईल व दोन पैसे घरी बसल्या कमावता येईल.

आज घरात आलेल्या खाऊच्या दोर्याने लहानपणीचे समाधानी आनंदी जीवनाची आठवण तर करून दिलीच व त्या सोबतच पुढे काय करायचं ह्याच नकळत प्लॅनिंगपण करून झालं


Rate this content
Log in