गिफ्ट
गिफ्ट
मंजू आणि संजू दोघी खास मैत्रीणी. मंजू खूप श्रीमंत होती. मोठा बंगला,गाडी, बाबा मोठ्या कंपनीत डायरेक्टर. तर संजूचे वडील एका कंपनीत फिटर होते. त्यामुळे तिची परिस्थिती तशी बेताचीच होती.
मंजूचा दहावा वाढदिवस होता. तिच्या आई वडीलांनी हाॅटेलमधे हाॅल घेऊन साजरा करायचा ठरवला होता. तिच्या बाबांच्या कंपनीतली पण माणसं येणार होती.
संजूला आमंत्रण होतं. पण संजू कडे मंजूला गिफ्ट घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून तिने वाढदिवसाला जायच नाही असं ठरवलं.तिने मनातुनच मंजूला शुभेच्छा दिल्या.पण तिला चैन पडतं नव्हतं.
ठरल्या प्रमाणे संध्याकाळी पाच वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम चालू झाला. सगळे जण वेलकम ड्रिंक, गेम ची मजा लुटत होते. केक कापायची वेळ आली. पण संजू आली नाही म्हणून मंजू नाराज झाली.ती म्हणाली की संजू आल्याशिवाय मी केक कापणार नाही.
मंजूच्या आईने संजूला फोन केला ,
'अग संजू, कुठे आहेस तू? मंजू तू आल्या शिवाय केक कापणार नाही म्हणतेय. आवरुन ठेव .तुझ्यासाठी गाडी पाठवतेय.'
आता संजूचा नाईलाज झाला. वाढदिवसाला जायला हवं. आपण गेलो की सगळ्यांच लक्षही आपल्या कडे असेल.पण महागड गिफ्ट घ्यायला आपल्या कडे पैसे नाहीत. काय कराव ते तिला सुचत नव्हतं.तिचा एक नवीन ड्रेस होता तो तिने घातला. मग तिने बागेत जाऊन फुले काढून आणली. त्यातली गुलाबी फुले तिने छान हेअरस्टाईल केल्यासारखी केसात लावली. बागेतली भरपुर ताजी फुले ती बरोबर घेऊन गेली. गाडीत बसल्यावर तिने एक छान बुके बनवला आणि त्यावर एक Dairy Milk ची कॅडबरी लावली.
हाॅलवर पोचल्यावर संजूला बघितल्यावर मंजू खूप खुश झाली. ती म्हणाली ,' अग, केसातली फुले किती छान लावलेस. किती गोड दिसतेस
तू. '
संजूने मंजूला पण तिच्या केसांमधे लावली होती तशीचं फुले लावून दिले.मंजूने आता आनंदाने केक कापला. केक कापून झाल्यावर संजूने तिच्या बागेतल्या आणलेल्या फुलांचा मंजूवर वर्षांव केला.वातावरण मस्त सुगंधी झाले. मंजू खूप खुश झाली.
ती म्हणाली ,' Thanks Dear, किती छान गिफ्ट दिलस हे.'अस म्हणत तिने संजुला मिठी मारली.
संजुला कृष्ण सुदाम्याच्या गोष्टीची आठवण झाली आणि डोळ्यात अश्रू तरळले.
खरं प्रेम, आपुलकिची भावना ही पैशापेक्षा श्रेष्ठ असते.
