मैत्री
मैत्री
एकदा बागेत फिरताना,
साद एक कानी येता
दचकून बघता बाजूला
फुल हसले बघून मजला।
का रे हसलास मला?
विचारले मी त्याला
करशील मैत्री माझ्याशी?
विचारले त्याने मला।
हो ..हो..म्हणाले मी त्याला
नाती दुर्लभ झालीत सद्या
कोण कोणा विचारेना...
सगळी नाती निभावून झाली
मनाला रे, कुठलीच नाही शिवली..
अपेक्षांच्या डोंगरात गाडली गेली
कुणाला कुणाची चाडच नुरली.
हवयं मलाही नातं मैत्रीचं
भक्कम अशा खात्रीचं
जे आहे ...अवघ्या नात्यांच्या पलिकडलं..
आपुलकीचं...
तू भेटलास ..छान झाले गड्या
नको वाटतो हा एकलेपणा
पाडूया गप्पांच्या टाळ्या
दुटप्पीपणाच्या या जगात
हसणे , बागडणे विसरलेय
मी सद्या...।
आणखी कोण कोण
आपल्या मित्र परिवारात?
हा गार गार वारा...
केव्हा केव्हा..पावसाच्या धारा
भिरभिरणारी ती फुलपाखरे...
किलबिलणारी ती मुक्त पाखरे...
हीच माझी मैतर खरे
आता तूही आलीस की...
झाला आपला मित्र परिवार पूरे।
दरवळू दे सुगंध
आपुल्या मैत्रीचा...
खरे खुरे जग आपुले
खोट्याला इथे थारा नसे
आनंदाची लयलूट ईथे
प्रसन्नता काठोकाठ वसे