विसावा
विसावा


विसाव्यावर खांदे पालट करण्यासाठी थांबलेली अंतयात्रा पाहून, त्याच्या डोक्यात विचार आला. त्यानं तिरडीवर लेटल्या लेटल्या थोडा मागोवा घेण्याचं ठरवलं. शेवटचा श्वास घेत असतांना मन अगदीच विचलित झालं होतं, तो विचार करू लागला.
आता मला अंघोळ घातली जाईल! पण कुठे? भर रस्त्यावर...! अरेरे, मग त्या संगमरवरी स्नानगृहाचं काय?
नवी कापडंही मिळतील, पण बिन मापाची, आणि ती कपाटातली?
कुणाला दिली असती, तर बरं झालं असतं मरण्यापूर्वी!
मी कमवलेला पैसा...
तो ही तसाच पडून राहील तिजोरीत,
गाडी बंगला, शेती वाडी सगळं इथंच राहणार ना
मग का कमवलं हे ?
कसला भोगही घेतला नाही ना जिवंत असतांना?
नुसताच धावत राहिलो पैशामागे वेड्यासारखा.....
पत्नीला ही वेळ दिला नाही कधी,
तशी तिनं ही कधी तक्रार केलेली आठवत नाही मला!
मुलं लहान होती तोवर ठीक होतं, पण मोठी झाल्यावर ती ही लांब निघून गेली. कशी राहतील बरं माझी मुलं ? माझ्या नंतर.....
आता राहतात तसेच, की तुटून विखरला जाईल हा परिवार....
एखाद्या मोत्याच्या माळे सारखा, जी माळ धागा जीर्ण झाल्यावर जशी विखरून पडते तशी.
मोठा मुलगा इंजिनियर सून डॉक्टर, शहरात गुण्या गोविंदाने नांदतायत. धाकटा पाटबंधारे खात्यात उच्च पदावर आणि मुलगी वकीलाच्या घरची सून...
कुणाला काहीच कमी नाहीये.
सगळे सुखी आनंदी आहेत.
फक्त पत्नीच तेवढी एकाकी वाटत होती,
पैसा त्यानं चिक्कार कमवला होता.
करोडोची स्थावर मालमत्ता तर बँक बॅलन्स ही भरपूर होता.
कदाचित तीच भीती त्याला विचलीत करत असावी. मोठ्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून त्यानं शेवटचा श्वास घेतला.<
/p>
तसा तो मुक्त झाला या मोहमायेच्या जगातून....
असं त्याला वाटत होतं.
पत्नी ढसाढसा अश्रू ढाळत होती, मुलगी हंबरडा फोडून रडत होती, मुलं मधून मधून डोळ्याच्या कडा पुसत होते.
गावातील मंडळी, नाते वाईक, मित्रपरिवार अंत्यदर्शन घेऊन जात होती.
कुणी दोन चार वाक्यात त्याचा जीवनपट सांगून जातं होतं. तर कुणी भल्या कामाची यादी बोलून दाखवत होतं. मुलाच्या मांडीवर पडल्या पडल्या त्याला जरा हायसं वाटलं. त्यानं सुटकेचा निश्वास सोडला खरा, पण तो फार काळ टिकला नाही. जवळच उभी असलेली विहीण बाई आपल्या मुलीला दबक्या आवाजात काही तरी सांगत होती.
त्यानं हळूच खांबाआड जाऊन कानोसा घेतला. त्याला जे ऐकायला मिळालं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. थोरल्या सुनेची आई तिला सांगत होती, चार आठ दिवस दवाखान्याला दांडी मार हवं तर, पण तुझ्या वाटणी बद्दल आताच बोलून जा बाई, नंतर फालतू लचांड नको. त्याला अगदी टकमक टोकावरुन ढकलल्याचा आभास झाला. त्यानं एक वळसा बैठक खोलीत मारायचा ठरवलं. तिथेही त्याला तेच दिसलं. त्याचे वकील व्याही असचं काही आपल्या मुलाला समजवत होते. कुणी घरदार विकायचा विचार करत होतं तर कुणी एकट्यानंच सारं हडपायच्या विचारात होतं. या पलीकडे कुणीच काही विचार करत नव्हतं. फक्त एक अपवाद वगळता, आणि ती म्हणजे त्याची पत्नी. आज नंतर सर्वांना काही ना काही मिळणार होतं, जे त्यांचंच होतं. फक्त ती एकटीच अशी होती, जिचं सारंच हिरावलं जाणार होतं. किंबहुना हिरावलं गेलंच म्हणायला हरकत नाही. पती अगोदरच डोळे मिटून चालता झालेला, धन संपत्ती सोबत नाती गोती, मुलं बाळं साऱ्यालाच ती मुकणार होती. देह जरी त्यानं त्यागला होता, परंतु खऱ्या अर्थानं आज ती मेली होती. तो तिच्या कडे नुसताच भारावल्या गत बघत होता. पण काहीच करू शकत नव्हता. जिवंत असतांनाची चूक आता भोवणार होती. अचानक त्याला हलका झटका बसला, तसा तो भानावर आला. विसाव्यावरून तिरडी खांदेपालट करून पुढे निघाली होती.आणि मागे सुटला होता फक्त प्रचंड जन सैलाब जो शेवटच्या थांब्यावरून परत फिरणार होता, पुन्हा एक मृतदेह आणून सोडायला.