शेती विकणे आहे
शेती विकणे आहे


7/12 वरील बोझा सहीत शेत विकणे आहे....
पेपरला बातमीचं हेडींग पाहताच बस स्टँड वर एकच हशा पिकला. प्रत्येक जण आपापली अक्कल पाजळायला लागला,
"पगला काय हा शेतकरी?"
"उचकेलच दिसतं बेणं!"
"अकलेचा गाभारा रिकामा आहे का रे त्याचा?"
असे किती तरी प्रश्न/वाक्य कानावर आले तसा नानांचा पारा चढला, आणि नाना खडसावत बोलले.
अरे ओ शांत्या, पुरी बातमी तर वाच येड्या !
तसे सारे शांत बसले, शांत्यानं पेपरातली बातमी वाचायला सुरवात केली.
वैतागवाडी:ता.दुष्काळपूर, येथील हरलेला शेतकरी श्री/कै. गणपतराव देहावसाणे यांचे दिवसेंदिवस शेतमालाचे कमी उत्पादन, अपूरी पर्जन्यवृष्टी, वीज भारनियमन आणि शेतमालाचा अयोग्य मोबदला. या मुळे मागील चार वर्षापासून सोसायटीची थकबाकी असल्यानं, गावातील सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. दोन वर्षापूर्वी थोरल्या मुलगी बाळंतणाला आली असता, तिच्या झालेल्या खाण्यापिण्याच्या अवहेलनेनं बाळ कुपोषित जन्माला आले. कुपोषित बाळ पाहून, जावयाने मुलीला न्यायला नकार दिलेला असल्यानं एका व्यक्तीचा भार कुपोषित बालकाच्या दवाखान्याच्या खर्चा सहीत वाढलेला आहे. लहान मुलीनं मागच्या वर्षीच बापाचा भार कमी व्हावा म्हणून आत्महत्या केली होती. तर
लहान पोरगं नुकतच 10 पास झालयं, त्याच्या शिक्षणाचा भारही आता सोसेनासा झाल्यामुळे, देहावसाणे पार हतबुद्ध झालेले आहेत. मागील वर्षी बैल जोडी पैकी उरलेला एक बैल विकून कशी बशी बिजवाई घेतली होती, पण आज तीही आशा उरली नसल्यामुळे गावगुंड नवऱ्यानं टाकलेल्या मुलीवर अश्लिल शेरे मारून देहावसाण्यांवर उपकार करायच्या युक्त्या सुचत आहेत. म्हाताऱ्या मायच्या दम्याचा इलाज करायची ही आता सोय राहिलेली दिसत नसल्यानं, आता श्री पण लवकरच कैलासवासी होण्याच्या मार्गावर असलेले गणपतराव देहावसाणे यांची 4 गुंठे कोरडवाहू जमीन सोसायटीच्या थकबाकीसहीत 72000 व सावकाराचे 67300 च्या कर्जासहीत विकणे आहे. खरेदी दाराने बोझासहित जमीन विकत घेऊन काही मोबदला इतका उदरनिर्वाहा पुरता तसेच कुपोषित बालकाचा इलाज मुलाच्या शिक्षणाचा खर्च निघेल अशा पद्धतीने द्यावा. अशी विनंती गणपतराव देहावसाणे यांनी केलीय. जर जमीनीत काही पिकत नाही मग इतकी किंमत कशी मागली जातेय असा प्रश्न निर्माण झालेल्यांनी कृपया मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांना प्रश्न विचारून शंका निरसन करावे. किंवा मा.मु. अध्यक्ष महोदयांना ही या बाबत सविस्तर विचारणा करू शकतात. पण जातांना थंडीचे कापडं घालून जाणे. जेणे करून भक्तांकरवी लाथाबुक्क्यांचा वर्षाव झाल्यास व्यक्ती स्वतः जबाबदार राहील.
कृपया संपर्क वार्ताहर :- व्हॉस्अपवर करावा.