प्राजक्ता रामराजे पाटील

Children Stories Inspirational

3.5  

प्राजक्ता रामराजे पाटील

Children Stories Inspirational

श्वेताचे बालपण

श्वेताचे बालपण

5 mins
44


"कशास हवा वंशास दिवा ?


पणतीलाही सन्मान देऊन तर पाहा


तिच्या अस्तित्वाने दोन्ही घरी तेवेल प्रकाश खरा


मुलाची अपेक्षा न करता, 


 "लहान कुटुंब सुखी कुटुंब" 


हा कानमंत्र ध्यानी ठेवायला हवा..


त्यासाठी सुरूवात आपल्या घरापासूनच करायची लक्षात ठेवा."


श्वेता अतिशय गुणी आणि समजूतदार मुलगी होती. आईबाबांचं पहिलं अपत्य म्हणून अगदी लाडात वाढलेली होती. पण उत्तम संस्काराची शिदोरी लाभल्यामुळे सर्वगुणसंपन्न होती. घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचं होतं. त्यामुळे कोणाबद्दल कधीच वाईट विचारही श्वेताच्या मनात कधीच आला नाही. सगळ्यांना स्वतःप्रमाणे ती चांगलंच समजायची. श्वेताचे बाबा पोलीस ऑफिसर होते. गुन्हेगाराशी कठोर असणारे बाबा घरी आल्यावर मात्र आपल्या दोन्ही मुलींशी फणसाच्या रसाळ गऱ्याप्रमाणे वागत होते. आईबाबा दोघेही सुशिक्षित असल्याने दोन मुली झाल्यावर मुलाची अपेक्षा न करता त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. समाजात सगळ्यांपेक्षा जर कोणी काही वेगळं करत असेल तर त्या गोष्टीचा सन्मान कधीच होत नाही, उलट विरोध होतो. लोक नावे ठेवतात. खरंच माणूस मेल्यावर त्याला चांगलं म्हणणारे लोक, माणूस जिवंत असताना मात्र त्याची निंदा करतात हेच समाजातील वास्तव आहे. खुद्द श्वेताची आजी, श्वेताला भाऊ व्हावा म्हणून नवस बोलायची. घरातलेच असा अट्टाहास करत असतील तर बाहेरच्यांना काय बोलणार?


एके दिवशी चक्क आजी श्वेताच्या आईला साजिरीला रागाने म्हणाली," तुला मुलगा होत नसेल तर, मला माझ्या राघवचे दुसरे लग्न करावे लागेल." आणि नेमके हेच राघवने म्हणजे श्वेताच्या बाबांनी आईचे बोलणे ऐकले. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना ते उद्याच्या रजेचा अर्ज देऊन आले होते. त्यांनी रात्री झोपताना आपल्या पत्नीला साजिरीला अगदी योग्य प्रकारे समजावून सांगितले. दोन्ही मुलीच असताना ऑपरेशन केले तर लोक काय म्हणतील ? हाच विचार त्यांच्यासुद्धा मनात येत होता. 


तेव्हा आपल्या पत्नीला जवळ घेत अगदी प्रेमाने तिची समजूत काढत राघव म्हणाले, "अगं मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात नसतं, ते सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून असतं हे अडाणी लोकांसारखं तुलाही सांगावं लागेल का ? लोकं नाव ठेवतील, तर मला ठेवतील आणि लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची ? हे मला चांगलंच ठाऊक आहे. या गोष्टीची तू अजिबात काळजी करू नकोस. अगं आपल्याला निदान दोन मुली तरी आहेत, पण ज्यांच्या नशीबात आईबाबा होण्याचं सुखच नसतं त्यांनी काय करायचं ?" 


"आहे त्या गोष्टीत समाधान मानायचं ! हा तुमचा नेहमीचा डायलॉग आज मीच तुम्हांला ऐकवते." साजिरी राघवरावांना म्हणाल्या.


"जरी हा माझा डायलॉग असला तरी तू ऐकवलाय म्हटल्यावर अजून छान वाटतोय." साजिरीला जवळ ओढत राघवराव म्हणाले.


रात्र संपली आणि नव्या विचारांना समाजाच्या गळी उतरवण्यासाठी जहागीरदार दांपत्याने नवी सुरुवात करण्यासाठी कंबर कसली. आपल्या डॉक्टर असलेल्या मित्राकडे राघव आपल्या पत्नीला साजिरीला घेऊन आले होते. त्यांना लवकरात लवकर साजरीचे कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करायचे होते. त्या संदर्भातील माहिती घेण्यासाठी आज आवर्जून रजा काढून ते डॉ. प्रसाद यांच्याकडे पोहोचले. प्रसादची आधीच अपॉइंटमेंट घेतल्यामुळे प्रसादने कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन कधी करता येईल? हे सांगितले. साजिरीच्या काही टेस्ट करण्यात आल्या. त्या सर्व नॉर्मल निघाल्या. "नेक्स्ट पिरेडच्या वेळी ऑपरेशन करता येईल." असे डॉक्टर प्रसादने सांगितल्यावर दोघे घरी आले.


"कुठे गेला होतात ?" माया म्हणजेच साजिरीच्या सासुबाई म्हणाल्या.


"यांचं जरा काम होतं. तिकडे गेलो होतो." साजरी म्हणाली. "म्हणजे? मला न सांगण्यासारखं होतं का काम?" साजिरीच्या सासुबाई म्हणाल्या.


तेवढ्यात राघव म्हणाले, "अगं आई, म्हणजे काय आहे ना, माझ्या मित्राच्या बहिणीचे लग्न जमले आहे. त्याची शॉपिंग करायची होती. आणि साजिरीची चॉईस किती छान आहे! हे तुलाही माहितीय आणि म्हणूनच मुद्दाम त्यांनी साजिरीलाही घेऊन या असं सांगितलं होतं." एवढं सांगून राघवरावांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


आणि आपल्या खोलीत जाऊन साजिरीलाही आवाज दिला. साजिरीकडून वचन मागितलं, "ऑपरेशन होईपर्यंत साजिरीने घरी कोणालाही काही सांगायचे नाही." 


आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी साजिरीचं ऑपरेशन करायचं होतं.


डॉक्टर प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार साजिरी आणि राघव दवाखान्यात पोहोचले. ऑपरेशन थेटरमध्ये जाताना साजिरीला थोडीशी भीती वाटत होती. पण राघवने तिचा हात हातात घेतला आणि त्या विश्वासाच्या जोरावर साजिरी ऑपरेशन थेटरमध्ये पोहोचली. अवघ्या काही तासातच साजिरी बाहेर आली. ऑपरेशन नंतर काय काय काळजी घ्यायची ? याची डॉ. प्रसादने सविस्तर माहिती दिली. घरी आल्यावर मात्र साजिरीकडे बघून सासूबाईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आई काही बोलणार,त्याच्या आताच राघवने आईला खरे काय ते सांगून टाकले. आईचे डोळे डबडबले होते. डोळे पुसतच आई काही न बोलता खोलीत निघून गेली. साजिरीला खोलीमध्ये नेऊन राघवने झोपवले आणि तो तडक आईकडे आईच्या खोलीत गेला.


"राघव, आज तू माझा विश्वास तोडला आहेस.प्लीज तू मला काहीही बोलू नकोस. " आई नाराज होऊन म्हणाली.


राघव आईच्या कुशीत शिरला आणि आईला म्हणाला, "आई, तूच मला सांग.माझी श्वेता आणि सायली तुला कधी कुठल्या गोष्टीत कमी दिसतात का गं ? तू आजारी असताना किती सेवा करतात त्या तुझी. मग नातवासाठीच अट्टहास का?" 


"अरे त्या मुली आहेत ना, लग्न केले की जातील आपल्या सासरी. मग तुला आणि साजिरीला कोण सांभाळणार ? मी तर आता चार दिवसांची पाहुणी आहे." श्वेताची आजी म्हणाली.


"अगं आई, आता काळ खूप बदललाय. मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं तर त्यांच्या सासरचेही नाही विरोध करत माहेरच्या माणसांना आधार द्यायला. हे बघ आई, जरी मुलगा असेल आणि त्याचं स्वप्न जर परदेशात जायचं असेल तर रहावंच लागतं ना दोघा नवरा-बायकोना आयुष्यभर एकटं. आपल्या ज्ञानेश्वर काकाकाकूसारखं." अगदी नात्यातलच उदाहरण दिल्यामुळे ते मायाना पटलं. आणि त्या आपले डोळे पुसत म्हणाल्या, "हो, अगदी खरंय तू म्हणतोस ते. आता यापुढे मी माझ्या सुनेला मुळीच दुखावणार नाही." माया राघवला म्हणाल्या.


"आणि अगं, आताच्या काळात मुलीही कोणत्याच गोष्टीत मागे नाही. म्हणजे बघ ना! जेंव्हा केंव्हा तुझी शुगर वाढते तेव्हा तुला दवाखान्यात न्यायची वेळ येते, तेव्हा मी एकदा तरी ऑफिस सोडून येऊ शकतो का? पण तेव्हा मुलाची भूमिका पार पाडत, स्वतः गाडी ड्राईव्ह करत किती वेळा साजिरीने तुला मरणाच्या दारातून परत आणले आहे." राघव आईला म्हणाला.


"हो रे, आता मला माझी चुक समजली आहे. साजरीकडे घेऊन चल मला." राघव आईच्या हाताला धरून तिला साजिरी जवळ घेऊन आला. साजिरी उठून बसण्याचा प्रयत्न करत होती. पण सासूबाईं तिला म्हणाल्या, "अगं, पडून राहा बरं तू. आता काही त्रास होत नाही ना तुला." असं प्रेमानं विचारल्यावर साजिरीही "नाही." म्हणाली. मुली शाळेतून घरी आल्या होत्या. आजी मुलींना म्हणाल्या, "आईला त्रास द्यायचा नाही. एक महिना आपण आईला आराम द्यायला हवा." समजूतदार असलेली श्वेता लगेच कामाला लागली. सायलीही तिला मदत करत होती. राघव मात्र मनापासून आनंदी होते. ते मनात विचार करत होते.'आपला निर्णय एका तरी व्यक्तीला पटला म्हणजेच हळूहळू समाजात हा बदल घडू शकतो. आणि त्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत.' असे त्यांना वाटले.


श्वेता, सायली आणि आजीने मिळून साजिरीची छान काळजी घेतली. आता साजिरी तणाव विरहीत जीवन जगत होती. 

मुलींनाच मुलगा समजून श्वेताचे आईबाबांनी मुलींनी मनसोक्त बालपण जगू दिले तसेच समाजातील प्रत्येक घरात मुलींना मनसोक्त जगता यावे हीच इच्छा.


Rate this content
Log in