शब्दावाचून कळले सारे
शब्दावाचून कळले सारे
"रेणू अग उठ ग!! आज समुपदेशनाची तारीख आहे न, उठ लवकर" आईच्या आवाजाने हडबडून रेणू उठून बसली. मोबाईल मध्ये पाहते तर, "अरे बाप रे! ९ वाजले. अगं लवकर का उठवले नाही ग!", रेणू.
रेणू लगेच बाथरूममध्ये तयार होण्यास निघून गेली. रेणू बाहेर येईपर्यंत आईने नाश्ता तयारच ठेवला होता.
रेणू देखील खुप लवकर तयार होऊन खाली आली.
हातातील बॅगेत सर्व सामान तपासताना पाहून आई, "अगं, नाश्ता तर. दिवसभर मग उपास घडेल ना".
"नाही आई निघते मी खुप उशीर झाला आहे ट्रॅफिक मध्येच १ तास लागेल. माझा पहिला नंबर असेल तर ११ वाजताच माझ्या नावाचा पुकारा होणार. त्या आधी मला हजेरी लावायला हवीच. निघते ह बाय बाय", रेणू.
"अग्ग! सोबत तर घेऊन जा. वेळ मिळेल तेव्हा खाशील ना..." आईचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच रेणूने स्कुटी स्टार्ट केली, तशी आईदेखील तिच्या पाठोपाठ दरवाजा बंद करायला गेली.
----------------------------------------------------------------
रेणूची पावले कौंटुबिक न्यायालयाच्या समुपदेशन कक्षाकडे वेगाने पडत होती. मनात अनेक विचारांनी काहूर माजवले होते. आज शेवटचा दिवस आहे समुपदेशनाचा, आज काही विपरीत घडण्याच्या आशंकेने मन साशंक होते रेणूचे. याच विचारात असताना ती समुपदेशन खोलीच्या दारावर लटकलेल्या लिस्ट जवळ पोहोचली. पाहते तर तीचा नंबर ११ वा आहे.
" ओहssss! " एक सुस्कारा सोडत जवळच्याच बाकावर जाऊन बसली.
तिच्या आसपास बसलेल्या स्त्रिया आपापल्या त्रासाविषयी एकमेकींना सांगताना पाहून रेणूचे मनदेखील भूतकाळात डोकवायला लागले.
----------------------------------------------------------------
दिसायला गोरीपान, लांबसडक केस, टपोरे सुंदर डोळे, सरळ नाक, मध्यम बांधा, ओठांवर डाव्या बाजूला असलेले काळे तिळ रेणूच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. काॅलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच तिला एका जवळच्याच नात्यातील स्थळ आले. निलेश नावाच्या मुलाचे. मुलगा सरकारी बॅंकेत कॅशीअर या पदावर कार्यरत होता. दिसायला रुबाबदार व्यक्तिमत्व होते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे म्हटल्यावर रेणूच्या बाबांना पहिल्यांदा भेटल्यावरच पसंद पडला. देणं घेणं या औपचारिक गोष्टी पुर्ण करत त्यांचे लग्न थाटामाटात झाले.
नववधू रेणू सासरी आली. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. नव्याची नवलाई म्हणतात ना त्याप्रमाणे आता त्यांच्या संसाराला खरी सुरुवात झाली. निलेश हा स्वभावाने जरा बुजराच होता. जास्त बोलणं त्याला आवडत नसे. रेणू त्याच्या अगदी उलट म्हणजे थोडीशी अल्लड, बोलक्या स्वभावाची होती. छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधणारी. प्रत्येक गोष्टीकडे बघताना त्यातून आपल्या विनोद बुद्धीची झलक दाखवायची.
सुरुवातीला सगळ्यांनी तिच्या स्वभावाला तिचा बालिशपणा म्हणून दुर्लक्ष केले. परंतु जसजसा वेळ समोर जाऊ लागला निलेशला प्रत्येक गोष्टीत विनोद आवडेनासा झाला. त्यावरुन मतभेद सुरु झाले. छोट्या छोट्या कुरबुरी सुरू झाल्या.
अशातच रेणूला दिवस गेले. आता घरात छोटा पाहुणा येणार म्हणून घरात आनंदाचे वारे वाहू लागले.
निलेश तिला वेळोवेळी वैद्यकीय तपासणी साठी डॉ.कडे नेत होता. आई होण्याच्या प्रवासात निलेश आणि रेणू यांच्यातील पेल्यातील वादळ जवळजवळ विसावलेच होते की, अचानक एक दिवस रेणूच्या आईचा निलेशला फोन आला की, रेणूच्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे रेणूला भेटायला पाठवा म्हणून. पण निलेशच्या आईने नकार कळवायला सांगितला. तिच्या मते रेणूला हा धक्का पेलवणार नाही त्यामुळे बाळावर देखील परिणाम होऊ शकतो. आपल्या वंशाच्या दिव्याला काही झाले नाही पाहिजे म्हणून रेणूला देखील सांगू नकोस म्हणून निलेशला बजावले. त्याने देखील आईचे ऐकले. रेणूला काहिच सांगितले नाही.
इकडे रेणूच्या बाबांवर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. रेणूचे आई बाबा देखील जावयावर नाराज झाले. पण मुलीच्या सुखासाठी शांत बसले. काही काळानंतर रेणूला मुलगा झाला. पहिले बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत असते. परंतु निलेशने जिथे ट्रिटमेंट सुरू आहे तेथेच बाळंतपण करण्यावर जोर दिल्याने रेणूने माघार घेतली. पण बाळंतपण नाही तर निदान माहेरपणाला जाण्याची इच्छा व्यक्त केली निलेश समोर. पण त्याने तिही नाकारली कारण तिला माहेरी पाठवले तर त्याचे लपविलेले सत्य उघडे पडण्याची शक्यता होती. तिचा माहेरशी संपर्क करण्याचे एकमेव साधन म्हणजे लॅंडलाईन टेलीफोन. तोही त्याने बंद केला. आता रेणू बैचेन झाली होती, केव्हा आई बाबांशी बोलते असे झाले होते तीला. अशातच सहा महिने निघून गेले.
एक दिवस रेणूने निलेशला न सांगता आपली बॅग भरली आणि मुला सहित आईबाबांकडे निघून आली. ती कोणालाच न सांगता गेल्याने निलेश आणि त्याचे आई-वडील रागावले. इतकेच नव्हे तर त्यांनी कशाचाही विचार न करता तिला नोटीस पाठवला की, आता परत येण्याची गरज नाही तेथेच राहा. मी तुझ्या पासून विभक्त होण्यासाठी न्यायालयात जात आहे.
जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा वडील मंडळींच्या मानाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या समोर आता निलेश आणि रेणू सारख्या लोकांचे काहिच चालत नाही. रेणूच्या बाबतीतही तेच झाले. तिच्या बाबांनी देखील कायद्याच्या चौकटीतच निलेशला उत्तर पाठवले. त्यामुळे निलेश सुद्धा चवताळला. अशाप्रकारे त्यांच्या घटस्फोटाच्या प्रकियेला सुरुवात झाली. सर्वप्रथम न्यायालय पती-पत्नीचे नाते तुटू नये म्हणून एक संधी देते. त्यांना समुपदेशकाकडे पाठवते. त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी त्यांना बोलायला संधी दिली जाते. त्यात जर त्यांनी आपला निर्णय बदलला तर मुलगी पुन्हा नांदायला सासरी जाते.
अशा प्रकारच्या दोन भेटी रेणू आणि निलेशमध्ये अगोदरच होऊन गेल्या. पण त्याने माघार घेतली नाही. तो घटस्फोटावर कायम होता. आजही तो काय बोलतो यावर अंतिम निर्णय होणार होता. रेणू त्याच विचारात असताना. अचानक , " रेणू निलेश हाजिर होssss" चा जोरात पुकारा झाला. तशीच रेणू सावध झाली.
----------------------------------------------------------------
दोघेही समुपदेशक समोर उभे झाले. त्यांनी दोघांनाही एका तासासाठी खिडकी लगतच्या भिंतीजवळ बसून आपसात प्रश्न मिटविण्यासाठी बोलायला सांगितले. तसे दोघेही खिडकी लगत ठेवलेल्या खुर्चीवर बसले. एकमेकांकडे निव्वळ पाहत होते. एक शब्दही कोणीही बोलत नव्हते.
भर दुपारची वेळ होती. गरम हवा अंगाला स्पर्श करत होती. आजुबाजुला बाकिच्या लोकांचा प्रचंड गोंगाट ऐकू येत होता. त्यावर नियंत्रण म्हणून एक शिपाई मध्येच ओरडत शांत राहा. या व्यतिरिक्त या दोघांच्या मध्ये केवळ शांतता होती. बस एकमेकांना बघतांना केव्हा वेळ संपली हे त्यांच्याही ध्यानात आले नाही. समुपदेशकाच्या वेळ संपली या आवाजाने त्यांच्यातील शांतता भंग पावली. तशी रेणू उठली आणि पाऊल पुढे टाकणार तोच, "बस....एवढंच बोलायचं होतं का?" निलेशने तिचा हात पकडत विचारले. तशीच रेणू वळली त्याच्याकडे, तिचे डोळे पाण्याने भरले होते. एकही शब्द मुखावाटे बाहेर पडत नव्हते. फक्त त्यांची नजर आपसात बोलत होती. वास्तविक दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. पण या मोठ्यांच्या मान पानाच्या लढाईत त्यांच्या शब्दांवर नियंत्रण घातले होते त्यांनी.
थोड्या वेळाने समुपदेशकाने पुन्हा आवाज दिला. तसे दोघेही त्यांच्या समोर उभे राहिले.
----------------------------------------------------------------
आता समुपदेशक त्यांना विचारत होता की, काय निर्णय झाला. केस बंद करायची की पुढे पाठवायची. दोघेही स्तब्धच. पुन्हा पुकारा झाला सांगा लवकर मला आणखी लोकांना भेटायचे आहे.
निलेशने केस मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच रेणूच्या चेहऱ्यावरदेखील आनंदाचे भाव उमटले.
दोघेही निघणार तोच समुपदेशक म्हणतात, "नात्याला टिकवायचे असेल तर कधी कधी शब्दांनाही सुटीवर पाठवायचे." खरंच तर आहे, शब्दाविना कळले सारे या उक्तीचा प्रत्यय आज दोघांनीही अनुभवला होता.
रेणूने निलेशचा हात घट्ट पकडला होता जणू काही कधी सुटूच नये शेवटपर्यंत ही पकड अशीच घट्ट राहावी हाच विचार तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
