सावली
सावली
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
बाहेर आभाळ भरून आलं होतं. संध्याकाळी सहा वाजता सुद्धा गुडूप अंधार झाला होता. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल असं वातावरण...कॉफीचा मग घेऊन ती गॅलरीत आली. मनात असंख्य विचारांचं काहूर दाटलेलं...या अशा वातावरणात जरा जास्तच भावूक होते ती! छोट्या छोट्या गोष्टी पण मग तिला अर्थपूर्ण आणि महत्वाच्या वाटायला लागतात. तिने कॉफीचा एक घोट घेतला आणि तिचं मन भूतकाळात हरवलं...आठवणीत रमलं...
काही सुखद तर काही दुखःद पण जगायला बळ देणाऱ्या आठवणी! आठवणींची सफर करत असताना तिचं मन आयुष्याच्या काही अविस्मरणीय वळणांवर येऊन थबकलं. मग आयुष्यातल्या त्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या निरनिराळ्या व्यक्तींचा ती विचार करू लागली...काही खूप जवळची, आपली वाटणारी तर काही जवळची असूनही वेळप्रसंगी परकी वाटणारी...! या अशा स्वार्थी लोकांसोबत चे काही प्रसंग तिला आठवले आणि तिला तिचीच दया आली... तिला वाटलं, इतका जीव लावतो आपण काही माणसांना आणि त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येतं मनात. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो पण त्रास काही संपत नाही. असं का वागवंसं वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी, हे काही केल्या उमगत नाही..! या अशा असंख्य प्रश्नांच्या गर्दीत तिचं डोकं अगदी जड झालं.
" अगं जान्हवी!"
"काय रे शार्दुल?" अचानक भानावर येऊन ती म्हणाली.
"कुठे तंद्री लागलेली एवढी? कसला विचार इतका?"
"काही विशेष नाही रे!"
"विशेष नाही म्हणतेस म्हणजे काहीतरी आहेच! सांगा पटकन.."
"काही स्वार्थी आणि मतलबी माणसांबद्दल विचार करत होते."
"अचानक? कोणी काही म्हणालंय का?"
"नाही रे! तुला नाही वाटत का असं की आयुष्यात काही टप्प्यांवर ही माणसं नसती भेटली तर कदाचित आज आपण एका वेगळ्या वळणावर असतो."
"आणि ते वळण जास्त सुखी असणार होतं का?"
"हां म्हणजे! त्या त्या वेळी ते जास्त चांगलं असलं असतं!"
"आणि प्रत्येक टप्प्यावर निस्वार्थीपणे साथ निभावणारी माणसं...त्यांचं काय? त्यांचा नाही विचार करायचा?
"...." जान्हवी निरुत्तर झाली. हा असा विचार तिने केलाच नव्हता.
शार्दुल पुढे बोलू लागला, "जान्हवी, काही माणसं इतकी हक्काची बनून जातात की ती दुखावली जातील ही शंकाच कधी मनाला शिवत नाही. छोट्या रोपट्यांना रोज पाणी द्यायची गरज असते पण डेरेदार वृक्षांना आपण रोज पाणी घालत नाही. त्यांची मूळच एवढी खोलवर रुजलेली असतात की आपण स्वतःहून पाणी द्यायची गरज संपते. ती स्वतःहूनच पाण्याच्या दिशेने वाढतात. तसंच काहीसं असतं या नात्यांचं !"
"बापरे, किती काव्यात्मक बोलतोस रे तू! वाटत नाही हां की इंग्लीश मीडियमचा आहेस!"
"नाही ऐकायचं का तुला? जातो मी. बस एकटीच विचार करत" शार्दुल हसून म्हणाला.
"नाही रे, बोल ना तू! छान वाटतंय ऐकायला "
"मी म्हणत होतो, नात्यांचा कटू अनुभव येऊ लागला की पावलं आपोआप या डेरेदार वृक्षांकडे वळतात. त्यांच्या सावलीत नुसतं बसलं तरी शांत वाटत. त्या मौनात पण एक सुख असतं. अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही..किंबहुना कोणी घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नये, हो ना?"
"बरोबर आहे रे शार्दुल, ही अशी माणसं सगळं सहज सोप्पं करून ठेवत
ात... एखाद्या मैफिलीच्या सुरवातीला तानपुरा आधीच जुळलेला असावा इतकं सहज..!"
"वाह! तुम्हालाही छान जमतंय की लेखिका बाई" शार्दुल थट्टा करत म्हणाला.
"जमायलाच हवं! तुझी बायको आहे ना मी!"
"बरं चला, बरीच कामं वाट बघतायत..कोड डिप्लॉय करायचाय आजच्या आज!" असं म्हणून शार्दुल घाईघाईत आत गेला पण जान्हवी मात्र त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली...
खरंतर, नवे बंध जोडायच्या नादात ती मात्र या जवळच्या धाग्यांना गृहीत धरत गेली. जे शाश्वत आहे त्याची किंमत उरत नाही असं नाही पण त्यांची सवय होऊन जाते असं काहीसं झालं होतं तिचं ! शार्दुल बरोबर बोलत होता. त्याच्या या नेहमी सकरात्मक बोलण्यावरच तर ती भाळली होती! आजही तो तिला एक वेगळं चैतन्य देऊन गेला...आता बाहेरचं वातावरण तिला अजूनच सुंदर दिसू लागलं!
तिने पुन्हा एक कॉफीचा घोट घेतला आणि काही क्षण डोळे घट्ट मिटून घेतले... यावेळी मात्र तिच्या डोळ्यासमोर आली काही हक्काची माणसं जी कायम तिच्या सोबत होती सावलीसारखी! तिचं मन तिला सांगू लागलं, "कधीकधी खूप गृहीत धरतो आपण या हक्काच्या माणसांना. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात पण तरी कधीच साथ सोडत नाहीत... आपला श्वास बनून राहतात." ती पटकन तिची डायरी घेऊन आली आणि सुबक अक्षरात लिहू लागली,
"मनात अनेक विचारांची गर्दी वाढायला लागली की हक्काच्या माणसांकडे आपण सगळं भडाभडा बोलून मोकळे होतो, कारण ही माणसं आपल्याला जज करत नाहीत. कधीकधी वाटतं ही अशी माणसं आयुष्यात नसती तर गुदमरून गेलो असतो आपण आपल्याच विचारांच्या डोहात ! कोणाच्या प्रेमात पडल्यावर ज्यांच्याकडे आधी कबुली दिली जाते अशी ही माणसं... इंटरव्ह्यूमधून बाहेर आल्यावर पहिला फोन ज्यांना केला जातो ती ही माणसं... आजारी असल्यावर ज्यांचा आवाज ऐकावासा वाटतो ती ही माणसं... काहीही लिहिलं तरी त्यांनी आधी वाचावं असं वाटतं ती ही माणसं.. किंवा नुसतं कुठेतरी जाऊन शांत बसावंसं वाटलं तरी सोबत यायला तयार असणारी ही माणसं...
या अशा सवयीच्या लोकांना आज मनापासून थँक यू म्हणायचंय. तुम्ही नसतात तर कदाचित नात्यांवरचा विश्वास उडाला असता. तुम्ही नसतात तर प्रेमात पडण्याची भावना एवढी स्पेशल नसती. तुम्ही नसतात तर पावसात भिजणं फक्त एक कटकट असती. तुम्ही नसतात तर आयुष्याचं चित्र तर रंगीत असलं असतं पण ते रंगीत चित्र बघण्यासाठी हवी असणारी सोबत, ते चित्र निरखणारे सुंदर डोळे मात्र नसते ! मग त्या अशा रंगीत चित्राचा तरी काय उपयोग?
खरंच, तुमच्यामुळे आयुष्यातल्या खूप तडजोडी सुसह्य झाल्यायत... रंगीबेरंगी काचा प्रत्येक जण वेचतो आयुष्यात, पण त्यांना जोडून त्यांचे सुंदर पॅटर्न्स बनवणारा कॅलिडोस्कोप खूप कमी जणांकडे असतो. माझ्यासाठी तो कॅलिडोस्कोप बनलात तुम्ही ! तुमच्याबद्दल काय लिहावं आणि किती लिहावं ते कधी समजत नाही. कारण हे अपरिमित आहे... ज्याला स्पष्ट सुरवात नाही आणि शेवट तर नाहीच नाही..!"
पावसाच्या आवाजाने ती भानावर आली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. या सगळ्यात तिचे डोळे मात्र कधी वाहू लागले तिलाच कळलं नाही, पण तिच्या ओठांवर मात्र हसू होतं... समाधानाचं !