The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Tejal Dalvi

Others

5.0  

Tejal Dalvi

Others

अर्धविराम

अर्धविराम

6 mins
560शरयू मरीन ड्राइव्हच्या कट्ट्यावर पाय मोकळे सोडून एकटक समुद्राच्या लाटांकडे पाहत बसली होती. आताशा ऊन उतरलं होतं. संध्याकाळी असं निवांत बसून चेहऱ्यावर खारे वारे झेलत स्वतःत डोकवायला मरीन ड्राइव्हहून चांगली जागा नाही असं तिचं ठाम मत आहे. शरयू मूळची पुण्याची. मुंबईत कॉलेज मध्ये असताना तिची मैत्रीण पृथा तिला या ठिकाणी पहिल्यांदा घेऊन आलेली.  


त्या उंचच उंच इमारती, थंड खारे वारे, कट्ट्यावर बसलेले सर्व वयोगटातील लोक, लांबच लांब पसरलेला तो समुद्र हे सगळं पाहून ती या जागेच्या प्रेमातच पडली. तिथपासून अनेकदा ती इथे येते...कधी मंदार सोबत long drive वर, कधी मित्र मैत्रिणींसोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी तर कधी एकटीच आत्मपरीक्षण करण्यासाठी!

आज मात्र इथे येण्याचं कारण वेगळं होतं. आज ती एक नवीन स्वप्नं पूर्ण करण्यासाठी इथे आली होती. एका नामांकित कंपनीत तिचा आज दुपारी इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू मध्ये सगळी उत्तरं अगदी बिनचूक आणि प्रभावी दिल्यामुळे ती मनोमन खूप खूष होती. गेल्या कित्येक वर्षांपासून ती या संधीची वाट पाहत होती. आज अखेर ते क्षितिज तिला खुणावत होतं. पुढच्या फेरीसाठी तीन मुलांची निवड होणार होती. निकाल एका तासात ईमेल वर कळवण्यात येणार होता. इंटरव्ह्यूचा रिझल्ट आपण आपल्या आवडत्या जागीच पहावा म्हणून ती तिथेच त्या कट्ट्यावर तिच्या भविष्यातली चित्रं रंगवत बसली होती. तिच्या मनात विचार आला, जर रोज इथे येता येणार असेल तर अजुन काय हवं आयुष्यात? काम करता करता ऑफिस विंडो मधून बाहेर पहावं तर हा अथांग समुद्र मला दिसेल आणि मग सगळा दिवसभराचा थकवा दूर करेल माझा! या स्वप्ननगरी मध्ये मी स्वतः च असं स्थान निर्माण करेन...आणि हे आकाश कवेत घेण्यासाठी उंचच उंच भरारी घेईन...या इमारतींहूनही उंच!


तिची घड्याळाकडे नजर गेली. एक तास कसा निघून गेला तिचं तिलाच कळलं नाही. तिने मेलबॉक्स उघडला. एकही नवीन ईमेल नव्हता. तिने पुन्हा पुन्हा रिफ्रेश केलं. तरी तेच... "अजुन नसेल आला रिझल्ट, वेळ लागणार असेल. मीच उगाच उतावळी होऊन बसलेय" तिने स्वतःची समजूत घालून घेतली. स्वतःच्याच अधीरतेवर हसून ती पुन्हा आजुबाजूचं दृश्य न्याहाळू लागली.


तेवढ्यात तिचा मोबाईल vibrate झाला. तिने पटकन मोबाईल unlock केला आणि मेलबॉक्स ओपन केला. "We regret to inform you....." पुढची वाक्यं तिला धूसर दिसू लागली. २-३ क्षण तिचं डोकं पूर्ण बधीर झालं. तिच्या डोळ्यातल्या आसवांचे थेंब मोबाईल स्क्रीन वर पडत होते. एकच प्रश्न मनात रेंगाळू लागला, "का?" 

हे अपयश पण खूप वाईट गोष्ट आहे. विशेषतः प्रामाणिक प्रयत्नानंतर येणारं! आणि जेव्हा अपयशाची कारणं शोधता येत नाहीत तेव्हा तर अजुन चिडचिड! 


काही स्वप्न अशीच अर्ध्यावरच तुटतात..काही प्रश्न निरुत्तरच राहतात..कायमचेच ..! 

शरयूच्या बाबतीतही आज असंच झालेलं... काही वेळानी ती थोडी सावरली...नेहमी सुखावून टाकणारे ते थंड वारे आता मात्र तिच्या अंगाला बोचू लागले. तिने पटकन कॅब बुक केली आणि तडक घरी निघून आली.


तिची flatmate पृथा तिची वाट पाहतच होती. गरमागरम चहाचा कप तिने शरयू समोर सरकवला. तिचा रडवेला चेहरा, निस्तेज डोळे पाहून पृथाला इंटरव्ह्यूच्या रिझल्टची कल्पना आली.

पृथाला पाहून शरयूच्या गळ्यात दाटलेला हुंदका फुटला आणि ती धाय मोकलून रडू लागली.


"का? माझ्या बाबतीतच का? आज तर खूप चांगला झालेला इंटरव्ह्यू. खूप आत्मविश्वासाने दिलेला गं! इतक्या दिवसापासून जे स्वप्न पाहत होते ते संपलं अर्धवटच! आणि त्याचं कारण ही आज मला समजत नाहीये..मी खूप प्रयत्न केला गं नेमकं कारण समजून घ्यायचा... असं वाटलं की जाऊन विचारावं त्यांनाच की नक्की काय कमी होतं? सगळं तुटक, निरुत्तर आणि अर्धवट वाटतंय! "


"शरयू, मला मान्य आहे की काही गोष्टी असतात तुटक, काही संवाद राहतात अपूर्ण पण या गोष्टी मनाला फारशा लावून नाही ग घ्यायच्या. उलट मला कधीकधी वाटतं, ते तसेच राहिलेत तेच सोयीस्कर आहेत. दरवेळी निदान आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावता येतो त्यांचा..

बंद साच्याचं बंधन नाही ... दरवेळी आपल्याला हवा तो अर्थ, हवा त्या वेळी काढण्याची मुभा दिलीये या अशा अर्धवट अपूर्ण संवादांनी आणि गोष्टींनी!"


"अगं पृथा, उगाच स्वतःचं खोटं समाधान करून घेण्यात काय अर्थ आहे? या अशा अर्धवट राहिलेल्या प्रश्नांचा, संवादाचा आणि स्वप्नांचा काही विशेष फायदा मला तरी नाही वाटत...उलट आयुष्यभर एक बोचरी जखमच बनून राहतात अशा अर्धवट गोष्टी..!"


"अगं, नाटक संपतं आणि पडदा पडतो तेव्हा समाप्तीचं समाधान फक्त प्रेक्षकाला मिळतं, कलाकाराला मात्र तो पडदा पडूच नये असं वाटत राहतं ..!

अगदी तसंच वाटतं मला... काही प्रसंगांवर पडदा पडला नाही ..काही गोष्टी अपूर्णच राहिल्या म्हणून आज दुःख करावं असं वाटत नाहीये उलट त्यातल्या अपूर्णत्त्वातली गोडी कळतीये ! त्या गोष्टींना त्या त्या वेळी 'क्रमशः' चं लेबल लागलं आणि आजतागायत त्यांच्या सांगतेसाठी दरवेळी त्याचा वेगवेगळा संदर्भ लावत गेली मी.. स्वतःच्या सोयीनुसार..!"


"म्हणजे?" शरयूने गोंधळून विचारलं.


"संदर्भासहित स्पष्टीकरण हवंय का मॅडम तुम्हाला?" पृथा हसून म्हणाली.


"हो गुरुवर्य! तुमच्या ज्ञानामृताची फुलं उधळा आमच्यावर!" शरयू गमतीत म्हणाली. 


"अगं, मध्यंतरी मला एक कथा खूप आवडलेली... ती कथा नक्की कोणी लिहिली आहे हे शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण अजूनही नाही शोधता आलं..! आज असं वाटतंय, तो लेखक शोधायच्या हट्टापायी अनेकदा वाचली गेली ती गोष्ट आणि दरवेळी वेगवेगळा सारांश समजला तिचा परिस्थितीनुसार..!"


"कथेचं ठीक आहे, पण माणसांचं काय? काही माणसांना ओळखायला चुकतो आपण... संपूर्ण कळतंच नाहीत अशी माणसं... आपण आपल्या मनात त्यांची एक प्रतिमा तयार करतो आणि त्यानंतर असा एखादा प्रसंग घडतो की त्या प्रतिमेला तडा जातो..माणसाची संपूर्ण प्रतिमा कळली की दुःख होतं.. तो माणूस तसा नव्हताच याची जाणीव बोचायला लागते मग!"


"म्हणूनच कधीकधी अशी जाणीव करवूनच घेत नाही मी.. त्या पेक्षा त्यांना समजून घेऊन त्यांच्या जुन्या आणि आपल्याला कळलेल्या अपूर्ण प्रतिमेतच थोडेसे बदल करून त्यांना बसवण्याचा वेडा प्रयत्न करत राहते ...

हे चूक कि बरोबर माहित नाही.. पण हो, त्या अपूर्ण प्रतिमेचा फार त्रास होत नाही एवढं नक्की.. कदाचित ती अपूर्ण प्रतिमा पूर्ण करायचा हट्टच मी सोडून दिलाय आताशा."


चहाचा कप किचन मध्ये ठेवण्यासाठी पृथा आत गेली.

शरयू मात्र तिथेच डायनिंग टेबल वर शून्यात पाहत बसली होती. मनात मात्र पृथाच्याच बोलण्याचा विचार करत होती ती. खरंतर, पृथा असं बोलू लागल्यावर शरयू ला खूप हलकं वाटतं. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हिच्याकडे आहेत असं वाटतं तिला दरवेळी!


विचार करता करता शरयू बुक शेल्फकडे वळली, तिचा आवडता कविता संग्रह चाळत असताना तिच्या मनात आलं, या अशा कवितांचा संपूर्ण अर्थ समजूच नये कधी.. दरवेळी वाचताना नाविन्याची गोडी चाखायला शिकवतात अशा कविता.. यांच्या भावार्थाला सीमा नाही आणि समाप्तीची ओढही नाही...!


शरयू स्वतःशीच हसली आणि पुन्हा बुक शेल्फ च्या तिसऱ्या रॅकवर तिची नजर पडली. तिने पटकन वि.स. खांडेकरांनी लिहिलेलं ' अमृतवेल ' बाहेर काढलं. शाळेतल्या मराठीच्या आवडत्या शिक्षिकांनी तिला भेट म्हणून दिलेलं हे पुस्तक. मॅडमनी त्या वेळी केसात माळलेल्या अबोलीचा सुगंध अजूनही या पुस्तकात भरून राहिलाय असा तिला नेहमी भास होतो. 

तिने शाळा सोडल्यानंतर कॉलेजमध्ये पण लेखन सुरु ठेवावं म्हणून दिलेली ही भेट... त्यांनी तिला पुढच्या भेटीत तिचं लिखाण घेऊन यायला लावलेलं.. 

आज शाळा सोडून दहा वर्ष झाली पण ती पुढची भेट आजपर्यंत होऊ शकली नाही आणि त्यांना सगळं लिखाण ही दाखवायचं राहून गेलं.. पण खरं सांगायचं तर दरवेळी त्यांना हे दाखवू, हे नको या नादात निदान थोडं का होईना लिहिलं गेलं तिच्याकडून.. त्या प्रेरणा ठरल्या त्या तुटपुंज्या लिखाणासाठी.. ती भेट अपूर्ण आहे तरी शरयूला खूप काही देऊन गेलीये...


तिला मग परवाचा प्रसंग आठवला, मुंबई पुणे प्रवासात शेजारच्या सीटवर बसलेली मुलगी चांगली ओळखीची झाली तिच्या.. खूप गप्पा मारल्या त्यांनी.. आपले खूप विचार जुळतात हेही लक्षात आलं त्या ३ तासाच्या प्रवासात.. पण गप्पांच्या नादात कधी वाकड चा स्टॉप कधी आला ते कळलंच नाही दोघींना.. आणि ती तिथे उतरली.. "मोबाइल नंबर घ्यायचाच राहिला अग्ग!" अस खिडकीपाशी पाहून जवळजवळ किंचाळलीच ती.. पण तोपर्यंत गाडी सुटलेली...दोघींनी शेवटचं ओझरतं पहिल एकमेकींना. पोटात कसतरीच झालं शरयूच्या त्यावेळी.. असं कसं आपण विसरलो मोबाइल नंबर घ्यायला म्हणून स्वतःलाच दोष दिला तिने.. पण आज मागे पाहिल्यावर तिला वाटतंय, कदाचित तो संवाद अपूर्ण राहिलाय म्हणूनच आजही पुन्हा पुन्हा आठवावासा वाटतोय! त्यातला गोडवा आजही टिकून आहे.. तस्साच..


आता मात्र शरयूला मनापासून पटलं की पृथाचा हा अर्धवट गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन खरंच स्तुत्य आहे! 


तिने पटकन जाऊन पृथाला मिठी मारली आणि म्हणाली, "रोज रोज मरीन ड्राइव्ह वर गेले असते तर कदाचित तो चार्म हरवला असता गं त्या जागेचा! हो ना ?"

दोघीही त्यावर मनसोक्त हसल्या.


शेवटी दरवेळी पूर्णविराम देण्यापेक्षा अर्धविराम देण्यातही एक वेगळंच सुख आहे...


Rate this content
Log in