मी आहे !
मी आहे !


मंत्रमुग्ध करणारे वसंतरावांचे स्वर ऐकत,
राघवेंद्र एकटाच आभाळाकडे एकटक पाहत बसला होता ! वाऱ्याची झुळूक अलगद स्पर्श करून गेली,
शहारा आला त्याच्या अंगावर.... कोणीतरी खूप लांबून समजुत काढतंय असं वाटावं इतका मायेचा स्पर्श ! क्षणभर त्याला वाटलं या अशा निवडक जागा माणसांपेक्षाही जास्त बोलतात. प्रत्येकक्षणी काहीतरी सुचवतात. भाषेचं बंधन नसतं....सगळं शब्दांपलीकडलं...! सगळं लख्ख,पारदर्शी आणि तितकंच निरपेक्ष!
माणसं बदलतात,दूर जातात...
पण त्यांच्या आठवणी माञ कायम त्याच जागेत जपुन ठेवतात या जागा. अशा काही जागा, कितीतरी ठिकाणं मनात कायम घर करुन रहातात....कोरल्या जातात खोलवर कुठेतरी..!
त्यातलीच ही एक जागा. शहरापासून थोडी दूर पण तरी राघवेंद्रच्या मनाच्या खूप जवळची.
त्याला आठवलं पहिल्यांदा तो जेव्हा पुण्यात आला होता तेव्हा मित्रांबरोबर बाईक वरून पावसात मनसोक्त फिरताना गवसली होती ही जागा. मग त्यानंतर कितीतरी वेळा कल्ला करायला त्यांचा अख्खा ग्रुप इथे यायचा.
पण आज मात्र कितीतरी वर्षांनी त्याची पावलं या वाटेवर पडली होती.
काही वेळानी त्या निळ्याशार आकाशाकडून त्याचं लक्ष नदीच्या दोन भिन्न काठावर वसलेल्या त्या वृक्षांकडे गेलं.
या पानझडीच्या काळात ते स्वतःचं अस्तित्व शोधतायत असा भास झाला त्याला. कदाचित या नदीपलीकडे कोणीतरी आपल्या सोबत आहे इतकाच काय तो त्यांना एकमेकांचा आधार असेल. एकमेकांवर अवलंबून असण्याची त्यांना सवय नाही पण मग तरीही कालांतराने फांद्यांची गुंतागुंत होईल असं का वाटतंय?
दोन टोकांचे दोन वृक्ष. साधारण एकाच उंचीचे पण या नदीमुळे कायम त्यांची भेट झाली नसावी. कायम डोळे भरून पाहत असतील एकमेकांना ...दुरूनच!
मग अचानक त्याला विज्ञानातला संदर्भ आठवला, झाडांची मुळं पाण्याच्या दिशेने वाढतात. म्हणजे या दोघांची मुळं नदीच्या दिशेने वाढत असतील का? आणि मग तिथेच आत खोलवर कुठेतरी गुंतली असतील का एकमेकांत? तो विचार करू लागला.
त्याला वाटलं, वरवर पहाता नाही कळणार त्यांच्यातलं नातं पण कदाचित या जमिनीखाली ते रुजलंही असेल. शेवटी कितीही स्वतंत्र असण्याचे गुणगान गायले तरीही लागतं ना कोणीतरी "मी आहे" असं म्हणणारं ! पण मग ही नदी विलग करणारी वैरीण आहे की त्या दोघांना जोडणारा दुवा ?
तेवढ्यात मोबाईल ची स्क्रीन blink होवू लागली. राघवेंद्र भानावर आला. आईचा फोन होता. राघवेंद्र नी फोन कानाला लावला.
"हां, बोल आई"
"अरे राघू, कुठे आहेस तू? बाबा किती वाट पाहतायत तुझी"
"का? अचानक?"
"तुझ्याशी बोलायचं आहे त्यांना !"
"कशाबद्दल?"
"हे बघ! ते मला काही माहीत नाही. तुम्ही दोघं दरवेळी काय रे मला मधस्थ करता? पण आज मात्र मी ठरवलंय बापलेकाचा संवाद होऊ दे समोरासमोर!"
"येतो ५ मिनिटात"
राघवेंद्र नी फोन कट केला. बाईक ला किक मारली आणि तडक घरी आला. बाबा त्याची वाट पाहत दिवाणखान्यात सोफ्यावर बसले होते. राघवेंद्र येताच त्यांनी त्याला बसण्याचा इशारा केला. काही क्षण शांततेत गेले.
"आई दिसत नाहीये!"
"मीच तिला थोडा वेळ बाहेर फेरफटका मारायला सांगितलं. तुझ्याशी बोलायचं होतं."
"हो, म्हणाली आई मला..बोला ना!"
"मी काही दिवस पाहतोय, खूप गडबडीत असतोस. सतत कामात व्यस्त. मला कळतंय, बरेच व्याप असतात तुम्हा आजकालच्या मुलांना! मला मान्य आहे की तू स्वतंत्र आहेस आणि हे सगळं तू बोलून नाही दाखवणार..पण .."
"बाबा, कष्ट कोणाला चुकलेत? तुम्ही नका उगाच काळजी करू!" राघवेंद्र बाबांचं वाक्य तोडत म्हणाला.
"हो पण तरी...जास्त नाही सुचत मला तुझ्या आईसारखं बोलायला..! पण तरी एक सांगतो."
"काय बाबा?"
"मी आहे!"
राघवेंद्र ते शब्द ऐकताच शांत झाला. डोळ्यासमोर ते मघाशी पाहिलेलं दृश्य दिसू लागलं...ते दोन वृक्ष...ती नदी! सगळ्या गोष्टी त्याच्या मनात फिरू लागल्या. अचानक संदर्भ जुळवत तो स्वतःशीच पुटपुटला, "शेवटी कितीही स्वतंत्र असण्याचे गुणगान गायले तरीही लागतं ना कोणीतरी "मी आहे" असं म्हणणारं !" राघवेंद्र उठला आणि बाबांना आवेगाने मिठी मारली! दोघंही निशब्द..त्यांना जाणवलं, या नात्याची मूळं खूप खोलवर रुजली आहेत एकमेकांत!
त्या दोघांना असं पाहून आई मात्र दिवाणखान्याच्या दाराआडून तिचे अश्रू लपवत होती..! ती तर अन्विता होती ना त्या नदीसारखी !