Swanandi Sudha

Others Abstract

0.6  

Swanandi Sudha

Others Abstract

साखर आणि मीठ..!!! (???)

साखर आणि मीठ..!!! (???)

6 mins
562


लंचब्रेकची वेळ झाली तसा मधूने शुभ्राला फोन केला आणि दोघीही लगबगीने जेवणाचे डबे घेऊन कॅन्टीनकडे निघाल्या. ऑफिसला जाणं जसं अर्थार्जनासाठी महत्वाचं वाटायचं, तसंच या लंचब्रेकच्या वेळात जिवलग मैत्रिणीसोबत मनमोकळ्या गप्पा मारणंही तितकंच महत्वाचं वाटायचं मधूला. शुभ्रा तशी मधूपेक्षा सात-आठ वर्षांची लहान होती वयाने, पण दोघींचे सूर फार जुळले होते. एका प्रोजेक्टवर काम करताना दोघींची ओळख झाली चार वर्षांपूर्वी, आणि तेव्हापासून दोघीही हळूहळू कधी मनाने एकमेकींच्या जवळ आल्या ते त्यांचं त्यांनाही कळलं नव्हतं. रोज दुपारी ऑफिसमध्ये सोबत जेवायच्या, आणि जेवताना एकमेकींची सुखदुःखे वाटून घ्यायच्या.


शुभ्राचं नुकतंच लग्न झालं होतं. तिचा नवरा आणि सासरचे लोक इतके प्रेमळ आणि समजूतदार होते कि तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तिचं आयुष्य आता इतकं सोप्पं झालं होतं कि "मी या आधीच लग्न करायला हवं होतं.." असं शुभ्रा वारंवार म्हणत असे. मधूला मात्र शुभ्राच्या अशा बोलण्याची भलतीच गंमत वाटायची. मधूच्या लग्नाला आताशा दहा वर्षं झाली होती. आणि लग्नानंतर प्रत्येक वर्षी.. किंवा प्रत्येक महिन्यात... ती पूर्वीपेक्षा अजूनच अधिक कामात गुंतत जात होती. मधूचं लग्न झालं त्या आधीच तिच्या दोन्ही नणंदांचं लग्न झालं होतं. आता घरी सासूबाई, सासरेबुवा, समीर (मधूचा नवरा) आणि मधू असं चौकोनी कुटुंब रहात होतं. मधू लग्न करून घरी आली तसा हळूहळू तिच्या सासूबाईंनी स्वयंपाकघरातून सन्यासच घेतला जणू. नवीन नवलाईच्या उत्साहात मधू घरातलं एक एक काम आनंदानं अंगावर घेत गेली. वरदचा जन्म होण्यापूर्वी मधूच्या नणंदांची दोन बाळंतपणं घरात झाली होती.


मधू नेहमी हसतमुख असायची. घरातल्या सगळ्यांचं खूप आपलेपणानं सगळं करायची. तिची कधी कसलीच तक्रार नसायची. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायच्या हा जसा काही तिला छंदच जडला होता. सासूबाई आता त्यांची देवपूजा, भजनी मंडळ आणि भिशी मंडळ यात रमलेल्या असायच्या, तर सासरेबुवा त्यांच्या हास्यक्लब आणि वर्तमानपत्रात दंग असायचे. तसं वरदच्या जन्मानंतर वरद आणि आजोबांची जोडी कौतुकानं अगदी छान जमली होती. वरद आता पहिल्या इयत्तेत शिकत होता. समीरचं त्याच्या ऑफिसात आता मॅनेजर म्हणून प्रमोशन झालं होतं, त्यामुळं घरातल्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला त्याला बिलकुलच वेळ नव्हता. घरातलं सगळं आवरून सकाळी नऊला ऑफिस गाठेपर्यंत मधूची चांगलीच ओढाताण होत होती. पण आपलंच घर आणि आपलीच माणसं म्हणून मधू सगळं निभावून नेत होती. गेल्या वर्षी ऑफिसमध्ये आलेली प्रमोशनची संधी मधूने नाकारली, कारण अजून जास्तीची जबाबदारी पेलता यायची नाही आपल्याला आणि घराकडे दुर्लक्ष सुद्धा व्हायला नको, असं तिला वाटलं म्हणून...


सासूबाईंच्या मैत्रिणी कधी घरी आल्या कि मधूचं खूप कौतुक करायच्या. "तुम्ही फार भाग्यवान आहात हो, तुम्हाला मधूसारखी कामसू सून मिळालीये. नाहीतर आजकाल नोकरी करणाऱ्या मुली घरातल्या एकाही कामाला हात लावत नाहीत", असं म्हणायच्या. या कौतुकाने मधू एकदम सुखावून जायची. "आम्हीपण केलंच आहे कि हो हे सगळं..." असा सासूबाईंचा हसत हसत मारलेला टोमणा मात्र मधूचा आनंद कणभर कमीच करून जायचा. पण "शाब्बास सूनबाई..!" असे कौतुकानं भरलेले सासऱ्यांचे शब्द कधीकधी कानावर पडले कि मधूला अगदी तृप्त वाटायचं. "सासरी आम्हाला नावं ठेवतील असं काही वागू नको गं..., आता आमची इज्जत तुझ्याच हाती आहे..." हे तिच्या आईचं लग्नाच्या पाठवणीच्या वेळचं वाक्य तिला आठवत राहायचं...


शुभ्राचा हसरा आणि उत्साही चेहरा बघून मधूला एकदम खूप हलकं झाल्यासारखं वाटलं. दोघी एका टेबलवर आपापले डबे ठेवून बसल्या. शुभ्रा उत्सुकतेने आपला डबा उघडत म्हणाली, "आज सासूबाईंनी काय भाजी केलीये बघू...". तोवर तिचं लक्ष मधूच्या मंद हालचालींकडे गेलं. ती मधूला म्हणाली, "मधू.., अगं आज पण बरं नाहीये का वाटत तुला?". तशी मधू हसत हसत तिला म्हणाली, "अगं वाढतं वय आहे, जरा दमल्यासारखं वाटतं आजकाल, इतकंच. विशेष त्रास असा काहीच नाही गं... काळजी नको करू तू. आणि आता वरदचा रोज होमवर्क असतो ना, त्यामुळं मला त्याला झोपवून झोपायला अजूनच उशीर होतोय बघ. म्हणून जरा...". मधूचं वाक्य मधेच तोडत शुभ्रा तिला म्हणाली, "अगं वाढतं वय कसलं? अजून पस्तिशी पण नाही आली तुझी, आणि हे काय असं म्हातारी झाल्यासारखं बोलतेस तू?? तुला मी किती वेळा सांगतेय कि रोज एखादा तास मस्त योगा क्लास लाव, किंवा तुझा पूर्वीचा क्लासिकल डान्सचा क्लास पुन्हा चालू कर. शरीराला व्यायाम मिळेल आणि मनाला थोडा विरंगुळा पण... आणि हो एक मेडिकल चेकअप करून घे...". मधूने घाईघाईने तिला थांबवले आणि म्हणाली, "हो मॅडम, करते विचार. आता आपण जेवूया का ?". मधूने तो विषय चर्चेपुरता तरी तिथेच थांबवला, पण मनात अजूनही तोच विषय घोळत होता तिच्या. रोज एक तास केवळ स्वतःसाठी काढायचा हे अगदी अशक्यच वाटत होतं मधूला, आणि घरातील इतकी सारी कामं सोडून असं काही करायचं म्हणजे थोडं अपराधीपण सुद्धा वाटत होतं...


शुभ्रा म्हणाली, "अगं उद्या आमच्या घरी तुला संक्रांतीच्या हळदीकुंकवाला यायचंय बरं का..! लग्नानंतर माझी पहिलीच संक्रांत आहे ना ही, सासूबाईंनी मस्त काळी साडी घेतलीये मला आणि एक त्यांना स्वतःला पण.!" शुभ्रानं अगदी आनंदानं आणि उत्साहानं मधूला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. तुझ्याकडे काळ्या रंगाची साडी असेल तर तीच नेसून ये असंही बजावलं. मधूनं पण लगेच आनंदानं आमंत्रण स्वीकारलं. दोघींनी मग रोजच्या सारखंच हसतखेळत जेवण केलं, आणि आपापल्या कामासाठी निघून गेल्या.


मधूचा दुसरा दिवस रोजच्यापेक्षा एक तास अगोदरच सुरु झाला. आज काळी साडी नेसून ऑफिसला जायचं होतं ना तिला, आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडीफार तयारी पण करून जावं लागणार होतं, रात्रीच्या जेवणाला उगाच सगळ्यांना उशीर व्हायला नको म्हणून. तिनं लगबगीनं स्वयंपाकघरातली सगळी कामं आवरली आणि अंघोळ उरकून आरशासमोर उभी राहिली. दिवाळीनंतर असं साडी नेसून मनापासून नटायला आणि आरशात स्वतःकडे बघून हसायला वेळच मिळाला नव्हता आपल्याला, हे मधूला जाणवलं. ती छान तयार झाली आणि सासूबाईंना शुभ्राच्या घरी हळदीकुंकवाला जाऊन संध्याकाळी थोडं उशिरा घरी येणार असल्याचं सांगून ती ऑफिसला निघाली. आज शुभ्रा सुट्टीवर होती. संध्याकाळी थोडं लवकर निघता यावं, या विचाराने मधूने आज डेस्कवरच आपला डबा पटकन खाऊन घेतला, आणि ती काम संपवायच्या मागं लागली.


संध्याकाळी सहा वाजता मधू ऑफिस संपवून शुभ्राच्या घरी पोहोचली. दरवाजासमोरची सुंदर रांगोळी आणि अत्तराचा मंद मोहक सुवास यांनी मधूचं मन एकदम प्रसन्न झालं. मधूला दारात पाहताच शुभ्रा एकदम खुश झाली. तिनं मधूला हाताला धरून आत आणलं आणि आपल्या सासूबाईंसोबत तिची ओळख करून दिली. शुभ्रा छान तयार झाली होती, आणि काळ्या साडीत ती आणखीनच खुलून दिसत होती. शुभ्राच्या सासूबाई प्रसन्न मनाने सर्व सुवासिनींना तिळगुळ आणि संक्रांतीचे वाण देत होत्या, काही वेळा प्रेमाने शुभ्राकडून ते सर्व करून घेत होत्या. मधूला त्यांच्या घरातील एकंदरच मोकळं वातावरण जाणवत होतं, आणि शुभ्रा इतकी कशी खुश असते याचा उलगडा होत होता.


"या या मंगल वहिनी, बरं झालं लवकर आलात", शुभ्राच्या सासूबाई दरवाज्याकडे जात म्हणाल्या. शेजारीच राहणाऱ्या मंगल वहिनी त्यांच्या लेकीसोबत आल्या होत्या. सगळ्या सजावटीचे कौतुक करत करत त्या दोघी सोफ्यावर बसल्या. शुभ्राने त्यांना मसाल्याचे दूध आणून दिले. मंगल वहिनींची नजर काहीतरी शोधात असल्यासारखी सगळीकडे फिरत होती. थोड्या वेळाने नं राहवून त्यांनी विचारलेच, "सुलेखा कुठे दिसत नाही ते..?". सुलेखा म्हणजे शुभ्राची नणंद, लग्न करून त्याच शहरात राहणारी. शुभ्राच्या सासूबाईंनी जरा खेदानेच सांगितले, "अहो ती येणार होतीच; पण तिची लेक आजारी पडली ना, त्यामुळं हळदीकुंकवाला आज येऊ शकली नाही ती". त्यावर मंगल वहिनींनी अगदीच चेहरा पाडून आपले पुढचे मत नोंदवायची घाई केली - "लेकींशिवाय घरच्या कार्यक्रमाला काही शोभा नाही बघा. लेकी साखरे सारख्या, तर सुना मिठासारख्या असतात. जेवणात मीठ नसून चालत नाही, आणि जास्त झालेले खपत नाही. पण लेकी मात्र साखरेसारख्या... सगळं काही गोड करून टाकतात, आणि म्हणूनच नेहमी सगळ्यांना हव्याहव्याशा वाटतात..!" शुभ्राच्या सासूबाईंनी देखील त्यावर हसून मान डोलावली. शुभ्रा आणि मधूने एकमेकींकडे बघून मौनानेच संवाद साधला, आणि उद्याच्या लंचब्रेकसाठी चर्चा करायला त्यांना एक नवीन विषय मिळाला. 


कार्यक्रम आटोपून मधू घराकडं निघाली तरी मंगल वहिनींचं ते वाक्य मात्र तिच्या मनात घुमत होतं. आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपलं नाव "मधू" ठेवून आपल्याबद्दल त्यांना वाटणारा गोडवाच तर दाखवून दिलाय असं एका बाजूला तिला वाटत होतं. तर दुसरीकडे मनात शंका येत होती कि सासरच्या लोकांना माझ्या बद्दल काय वाटत असेल? त्यांना खुश ठेवण्यासाठी मी तर रात्रंदिवस मेहनत घेत राहते. स्वतःचे करिअर, छंद, मित्रमैत्रिणी, अगदी माझं स्वतःचं आरोग्य पण मी मागं टाकलंय माझ्या घरासाठी आणि घरच्यांसाठी... माझ्या मनासारखं मी जर काही करू लागले तर त्यांनासुध्दा माझं अस्तित्व जेवणात जास्त झालेल्या मिठाप्रमाणे खटकू लागेल का ??? विचार करता करता तिचं सारं आयुष्य काही क्षणांत तिच्या डोळ्यांसमोरून गेलं.


मधुची टॅक्सी तिच्या घराजवळ येऊन थांबली आणि तिच्या विचारांची मालिका तुटली... टॅक्सीतून उतरून मधू घाईघाईने घरात गेली. अजून सगळ्यांची जेवणं व्हायची होती. ती रोजच्या लगबगीनं कामाला लागली..., मनातली सगळी घालमेल मनातच बंद करून ...


Rate this content
Log in