एका आठवणीची कविता!
एका आठवणीची कविता!


रविवारची सकाळ जरा निवांतच चालू झाली होती माझी. गॅलरीमध्ये बसून आरामात सकाळचा नाष्टा आणि चहा घेतला म्हणजे मगच मला रविवारचा खरा आनंद मिळतो. मग दिवसभर घर आवरण्यात गेला तरी त्याची कटकट वाटत नाही... तसाच एक छानसा रविवार होता तो पण...
अंघोळीच्या अगोदर जरा घरातला पसारा आवरायचा ठरवून मी कामाला लागले. बैठकीची खोली सर्वात आधी आवरली. वर्तमानपत्रांचा ढीग व्यवस्थित करून कपाटात ठेवून दिला, फक्त ताजा अंक वरती राहू दिला. वाचनाची किती आवड होती मला पूर्वी... शाळेत असताना रविवारच्या अंकावर तर मी सर्वात आधी झडप घालत असे, त्यातल्या त्या रविवार विशेष मध्ये येणाऱ्या कथा आणि कविता वाचण्यासाठी आणि शब्दकोडं सोडवण्यासाठी... त्या आठवणीने गालातल्या गालात हसू आलं मला... आणि आता बघा कसं झालंय माझं... घरातली आणि ऑफिसातली कामं उरकून रात्री अंथरुणाला पाठ टेकल्यावर वाटतं -- आजचा पण दिवस असाच धावपळीत गेला. मोबाइलवर ठळक बातम्या बघायच्या कि मग झालं आपलं ज्ञान अप-टू-डेट. घरी वर्तमानपत्र रोज येऊन पडतं ते केवळ हौसेपोटी... अग्रलेखाचं पान वाचायचं राहतं, कथा - कविता तर दूरचीच गोष्ट... कादंबऱ्या वाचन वगैरे आता मला परिकल्पनाच वाटत होती! मनात म्हटलं, असू दे, आज दुपारी जरा वेळ काढून रविवार विशेषचा अंक वाचूयातच.
पुढचा नंबर होता माझ्या लेकीच्या - श्रावणीच्या - खोलीचा. तिच्या खोलीत शिरले नव्हते तोवरच पायाखाली काहीतरी आलं. बघते तर चित्रकला करून सगळा पसारा रात्री तसाच टाकलेला दिसत होता मॅडमनी. गादीवरसुद्धा वह्या पुस्तकं कोपऱ्यात सरकवलेली दिसत होती. त्यातच झोपली होती वाटतं रात्री पोरगी. आता इयत्ता चौथीला गेली तरी पसारा काही कमी झाला नाही हिचा अजून, असा विचार करून मी खोली आवरायला घेतली.
एक एक वस्तू जागच्या जागी ठेवू लागले. वह्यापुस्तकं उचलताना काही कागद दिसले - वहीमधून फाडलेले. माझ्या रागाचा पारा चटकन चढला - आजकालच्या मुलांना सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात मिळतात ना कि यांना कशाची काही किंमतच वाटत नाही. इतकं वाया घालावयाची काय गरज असते यांना काय माहित... वस्तू जपून वापरायला कसं शिकवायचं या आजच्या पिढीला??? असे अनेक विचार चटकन माझ्या मनात गर्दी करू लागले... काय केलंय हे कागद वहीमधून फाडून बघू तरी, असा विचार करून ते कागद मी उचलले आणि एक एक करून बघू लागले. काही कागदांवर नुसता गिरगोटा केला होता, तर काही कागदांवर काहीतरी लिहिले होते... एका कागदावर काही लिहून खाली तिने स्वतःची सही पण केली होती. आता मला थोडी उत्सुकता वाटली आणि गम्मत पण..! मी तिच्या गादीवर बसून ते कागद वाचू लागले. त्यातल्या एका कागदावर खालील ओळी लिहिल्या होत्या तिने –
*** The First Time ***
The first time I started to talk,
The first time I started to walk,
The first time I opened my eyes
Was the most beautiful surprise!
The first time I went outside,
The first time I heard some cries,
Was the day I started to live
And my first beautiful smile..!!!
हि कविता वाचून मला कोण आनंद झाला काय सांगू..!! किती सुंदर दिसतंय हे जग तिला.. आणि तो पहिलेपणाचा अनुभव किती हळूवारपणे तिनं मांडलाय..! माझी येवलुशी लेक इतकी मोठ्ठी कधी झाली मला कळलंच नाही... तिने कविता लिहिली..???!!! तशी तर मीसुध्दा कविता लिहायचे कधी काळी, पण नकळत ते वाचन आणि लेखन सुटून गेलं... बहुतेक अनुवंशिकतेतून श्रावणीला ते माझ्याकडून मिळालं असेल, या भावनेनं मी सुखावून गेले...
तिची हि कविता वाचल्यानंतर खूप वेळ मनात ते शब्द घोळत राहिले... आणि अचानक वीज चमकावी त्या प्रमाणे एक खूप जुनी आठवण हजेरी लावून गेली.. ती नवजात होती, मी नवीन आई आणि माझी आई नवीन आजी..!! त्यावेळची एक सुखद आठवण..
तिचे वय एक महिन्याचं झालं होतं त्यावेळी.. बाळाच्या जन्मानंतर इस्पितळातून घरी आल्यापासून मी (आणि ती सुध्दा) घराबाहेर पडलोच नव्हतो.. तिला एक महिना पूर्ण झाल्यानं पोलिओचं इंजेक्शन देण्यासाठी आणि routine checkup साठी दवाखान्यात जायचं होतं. जाण्याचा दिवस ठरला. सकाळीच आवरून आम्ही (तिघीजणी..) तयार झालो. घरापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर रिक्षा मिळेल, तिथंपर्यंत पायी जायचं ठरलं. बाळ माझ्या हातात होतं. आईने घराला कुलूप लावलं आणि म्हणाली, “दे बाळ माझ्याकडे, मी घेते तिला माझ्या पदराखाली. तिला वारा, धूळ यांचा संपर्क नको..”. तिने बाळाला एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हातानं तिच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावरून पुढे घेऊन बाळाच्या डोक्यावरून, अंगावरून पांघरून घेतला.. आणि आम्ही निघालो.. वेळ सकाळची दहाची असेल. शरद ऋतू ओसरत असल्यानं ऊन अजून कोवळं होतं. छान सोनेरी किरणं सगळीकडं पसरली होती… प्रसन्न वातावरण होतं अवतीभवती.. बाळ पहिल्यांदाच घराबाहेर पडत होतं, त्याचं आम्हालाही कौतुकच वाटत होतं. पहिलेपणाच्या गोष्टी अशा खासच असतात..! आईने तिच्या पदराखाली लपलेल्या बाळाचा चेहरा पाहिला.., आणि ती आश्चर्यमिश्रीत कौतुकाने मला म्हणाली, “बाळराजा भलताच खुष दिसतोय आज!!” मी लगेचच पाहते तर काय.. बाळाचा चेहरा पदरातून झिरपणाऱ्या सोनेरी सूर्य किरणांनी न्हाऊन निघाला होता.. बाळ गोड हसत होतं, अगदी तोंडभरून.. पदराआडून बाहेरचं जग पाहू बघत होतं... त्या कोवळ्या सूर्यकिरणांमुळं बाळाचे सुंदर डोळे अजूनच बोलके वाटत होते.. बाळाचं हसू आता आम्हा दोघींच्याही चेहऱ्यावर पसरलं होतं... बाळानं मला आई आणि माझ्या आईला आजी बनवलं, याबद्दल आम्हाला पुन्हा एकदा कृतकृत्य वाटत होतं...
हिच ती आठवण.. पहिले सूर्यकिरण, निसर्गाचे पहिले दर्शन… बाळाच्या मनात अगदी अजाणतेपणे हि आठवण हळूवारपणे आपली जागा घेऊन बसली असेल का? हिच ती पहिलेपणाची आठवण पोरीनं तिच्या पहिल्या कवितेत मांडली असेल का... अगदी तिच्याही नकळत…?
आठवणींचं असंच असतं.. कळत नकळत आपल्या मनात घर करून बसतात. कधी खोडकरपणा करून लपून बसतात; एखादी गोष्ट आठवण्याचा खूप खूप प्रयत्न करूनही हाती काही लागतच नाही.. एखादी टोचणारी आठवण मात्र विसरावी म्हटली तरी पाठ सोडत नाही…! आणि एखादी हळूवार सुखद आठवण… मनाच्या एका कोनाड्यात अलगद जपून ठेवलेली… तशाच एखाद्या हळूवार क्षणी पावलं न वाजवता मागून येते आणि पुन्हा एकदा तोच अनुभव जागवून, चेहऱ्यावर समाधानाची लकेर ठेवून जाते..!!
श्रावणीनं केलेल्या पसाऱ्याबद्दलचा माझ्या मनातला राग आता कुठच्या कुठं पळून गेला होता. मी तिथून उठले ते आजच्या आज तिला एक छानशी डायरी आणून द्यायची, असा संकल्प करूनच... तिच्या सुंदर आठवणी तिला नोंदून ठेवता याव्यात म्हणून... आणि इतक्या सुंदर आठवणींच्या कविता उगाच कुठेतरी हरवून जायला नकोत म्हणून...