सागरसुक्त
सागरसुक्त
लख्ख टिपुर चांदण्यात, लाटा कापत आपल्याच मस्तीत जहाज चाललंय. दुर क्षितीजावर टिमटिमणारे दिवे सोबतीला इतरही जहाजं असल्याची जाणिव करून देत आहेत. मंद वाऱ्याची झुळूक अनुभवत आणि चारी दिशांना पसरलेल्या समुद्राच्या अथांग पसाऱ्याकडे पाहत कॅाफीचे सीप घेत मी आजचा लेख लिहीतोय.
माझं संपुर्ण बालपण कोकणात रत्नागिरीत गेलंय. आमच्या घरा पासून अवघ्या २०० मीटर वर समुद्र असल्या मुळे, कवींना काव्य स्फुरवणारी सागराची गाज, हा आमच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग होता. किनाऱ्या वरील लोकांसाठी कधी संथ-मंद तर कधी रोरावणारी, लयीतील गाज हिच समुद्राची ओळख असली तरी समुद्रात आतमध्ये मात्र असा कोणताही आवाज नसतो. कारण इथे असतेती Swell, जी मैलोनमैल प्रवास करत शेवटी किनाऱ्यावर जाऊन फुटते. समुद्रात आत मध्ये, खोली पुरेशी असल्याने लाट फुटण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे असते ती फक्त धिर गंभिर शांतता, आणि वादळा मध्ये रोरावणारा वारा.
आपण नेहमी म्हणतो, ‘मनुष्य असामाधानी असतो’. पण त्याचं हे असं, असलेल्या परिस्थीतीत नेहमी असामाधानी असणंच त्याच्या प्रगतीचं खरं कारण आहे. तसं नसतं तर जमिनीवरच सुरक्षित राहून सुखा सुखी आयुष्य जगण्यात त्याने धन्यता मानली असती.. गुढ, अज्ञाताचा शोध घेणं हे मानवी स्वभाववैशिष्ठ्य आहे. समुद्राची खोली, त्याची व्याप्ती, त्याच्या उदरात दडलेले धोके याचा अजीबातच अंदाज नसताना ज्या कोणा मानवाने फक्त जिज्ञासेपोटी पहिल्यांदाच नाव सागरात लोटली, तो क्षण मानवाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यासारखा होता असेल. माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने त्याच्या मनातील पाण्याच्या नैसर्गीक भया वर मिळवलेला तो विजय होता.
होकायंत्राच्या (Magnetic Compass) शोधाला मानवी इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे. होकायंत्रामुळे माणसाला दिशा सापडली. घरी परतण्याच्या शक्यतेत वाढ झाल्याने, आणखी साहसी पाऊल उचलण्यास तेव्हाच्या मनुष्यास बळ मिळालं असावं. अथांग समुद्रात दिशाहीन भरकटण्याची शक्यता संपवून, होकायंत्र, क्षितिजा पल्याड अज्ञाताच्या प्रवासात मानवासाठी ‘वाटाड्या’ बनलं. वारा, शीडे ,वल्ही, पाण्याचा प्रवाह, भरती ओहोटी, होकायंत्र यांच्या मदतीने सागर विजयाच्या मोहिमेवर निघालेली, अजस्र लाटांवर डगमगणारी ती इटुकली-पिटुकली नाव, त्याकाळी ते धाडसी नाविक सोडता इतरांसाठी हास्यास्पदच ठरली असणार..
त्याकाळचे दर्यावर्दी आणि आताचे अंतराळवीर यांत मला कमालीचं साम्य आढळतं. माणसाच्या बुद्धीवर पुर्ण विश्वास ठेऊन स्वतःचं आयुष्य पणाला लावून,तत्कालीन मानवाच्या खोट्या कल्पना मोडून काढत, सत्यशोधनाचं काम त्यांनी केलंय. ज्यासाठी सदैव आपण त्यांचे ऋणी राहू. बऱ्याच वेळा अशा साहसी मोहिमांवर गेलेल्या नाविकांचं पुढे काय झालं ते कळायचं देखिल नाही. एवढं सर्व पणाला लावून, घरा दारावर तुळशीपत्र ठेवून, शेवटी कित्येकांच्या वाट्याला भयावह मरणच यायचं.
मध्ययुगीन काळात मोठ्या समुद्र सफरीवर गेलेल्या एकुण क्रू पैकी ५०% तर व्हिटॅमिन सी च्या कमतरते मुळे स्कर्व्ही होऊन मरणार हे गृहितच धरलेलं असायचं. हेन्री हडसन सारख्या महान दर्यावर्द्याला जहाजावरील भांडणातून कट रचून भर समुद्रात छोट्या नावे मध्ये त्याच्या मुलासहीत उतरवलं गेलं होतं, मरण्यासाठी.
ॲंटोनी गेलॅशीयोचं मरण तर याहून भयावह होतं. भरकटलेल्या जहाजा वरचा सर्व अन्नसाठा संपल्यावर क्रू मेंबर्सनी त्यांच्या सोबत आणलेली कुत्री, मांजरं मारून खाल्ली. ती ही संपल्यावर उंदिर आणि चामड्याच्या वस्तूंवर काही दिवस गुजराण केलं गेलं. ते ही संपल्यावर मग 'समुद्री प्रथे' नुसार ड्रॅा काढण्यात आला. ज्यात ॲंटोनीचं नाव आलं. त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याच्या शरीरावरपुढच्या दोन आठवड्याची भुक भागवली गेली.
‘कस्टम ॲाफ द सी’ अर्थात समुद्रातली ती एक 100 वर्षांपुर्वी पर्यंत अस्तित्वात असलेली अलिखीत, सर्वमान्य प्रथा होती ज्यातसमुद्रा मध्ये जर कधी जीव वाचवायचा प्रसंग आला, आणि खाण्यासाठी इतर काहीच शिल्लक नसेल तर लॅाटरी पद्धतीने एकाची निवड केली जाई, जेणेकरून एकाच्या बलीदानाने इतरांचे जीव वाचले जावेत. या साठी कोणत्याही प्रकारचा मर्डर चार्ज लागायचा नाही..
प्रचंड मोठ्या व्हेल माश्याच्या तडाख्यात Essex जहाज फुटल्यामुळे वाचलेल्या नाविकांनी छोट्या होडीचा आसरा घेतला. त्यांच्यावरही काही दिवसांनी लॅाटरी काढायची वेळ आली. ज्यात ओवेन नावाच्या तरूण सीमॅन चं नाव आलं. म्हाताऱ्या कॅप्टन ने, ओवेनच्या ऐवजी स्वतः बलिदान द्यायची तयारी दर्शवली. ‘तुझ्या पुढे अवघं आयुष्य पडलंय, माझं जगून झालंय, त्यामुळे मला मारून तुम्ही जगा’ अशी विनंती कॅप्टनने केली. परंतु ‘समुद्री प्रथेला’ जागण्यासाठी ही ॲाफर ओवेन ने स्पष्टपणे धुडकावून लावली आणि स्वतः मृत्यूला सामोरा गेला. केवढी ती समुद्रावर आणि समुद्री कायद्यांवर अढळ निष्ठा. मला तर ओवेन ‘समुद्रातला सॅाक्रेटीसच’ वाटतो..
खऱ्या अर्थाने समुद्राचे राजे, कुप्रसिद्ध ‘वायकींग्स’(Vikings) होते. त्यावर आणि त्यांचा देव ॲाडिन वर पुन्हा कधीतरी सविस्तर लिहेन.
मेरीटाईम हिस्ट्री मधल्या अश्या अंगावर काटा आणणाऱ्या शेकडो घटना सांगता येतील. कोणाला नरभक्षक आदिवासींनी खाल्लं तर जलसमाधी मिळालेल्यांची तर गणतीच नाही. परंतु त्यांच्या बलिदानाचं फलित म्हणून आपल्या भुगोलाच्या कक्षा रुंदावल्या. नवनविन भुप्रदेश, बेटं शोधली गेली. सर्व पृथ्वीवरील माणसं समुद्री मार्गांनी जोडली गेली...संस्कृतींची, ज्ञानाची देवाण घेवाण झाली.
भविष्यात जेव्हा केव्हा अंतराळवीर वेगवेगळ्या ग्रहांवर उतरतील, तेव्हा तिथले (कदाचित असलेले) ‘ॲबॅारिजनल्स’ त्यांचं स्वागत कसंकरतील ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल..
प्रोव्हायडेड दॅट, मनुष्य आपापल्या धर्माचा मुर्खपणाचा बावटा पृथ्वीवर मागेच सोडून जाईल. नाहीतर त्याचा ‘फर्डिनांड मेगॅलन’ झाल्यास तो स्वतःच यास जबाबदार असेल..
