पुरुष जात
पुरुष जात


कोरडे केस, मळकटलेले अंग, ठिगळे पडलेले पोलके, हाता-पायाची नखे मातीने माखलेली अशी ती सहा वर्षाची शालू कोपऱ्यात झोपलेली. ‘ शाले, ऊट ग आता, नायतर बा वरडल कामाला जायचय न व….’ हे ऐकताच ती दचकून जागी झाली. तोंड धुतले आणि पोटभर पाणी पिऊन आईच्या मागून वाटेत चिंचा बोरांची न्याहारी करत उड्या मारत चालत होती. आपण मस्ती करुन पण आई आज ओरडत नाही हे पाहून ती खूश होती कदाचित तिच्या आई बाबांना नवीन काम मिळाले असावे.
काही वेळाने तिला आईने एका मोठ्या गेटच्या इथे थांबवले . कपडे नीट केले, केसांवरून हात फिरवला आणि म्हणाली ‘ हे बग शाले आजपासून आपल्याला नवीन काम मिळालया या घरात मालक मालकीन बाई आन् त्यांची पोरगी हाय तिच्यासंगत तुला खेळायच हाय, त्यांला बेबी ताई म्हनायच हा. त्यांला एकट सोडायच नाय, चल आता… ‘शालू आईच्या मागून पदराला पकडत आत गेली. खूप छान घर होत शालूने अस घर तर स्वप्नात पण पाहिलं नव्हत.तेवढ्यातच आवाज आला, तूझ नाव शालू आहे का ग? शालू ने मान डोलावली. लगेच तोच प्रश्न तिने तिला केला ती म्हणाली , ‘ माझं नाव प्रिया ’ चल माझ्यासोबत आपण खेळूया आणि त्या दोघी उड्या मारत निघून गेल्या. आले दिवस छान सरत होते. शालू ची परिस्थिती सुधारली नव्हती पण ती तीच कुटुंब सुखी होत. प्रिया शाळेत जे काही शिकत असे ते घरी येऊन शालूला शिकवत असे.शालू कधी शाळेत गेली नव्हती पण कसं वागायचं, कसं बोलायचं हे सारं तिला प्रियाने शिकवलं होत. आई बाबा घरी जात पण शालू थांबायची अभ्यास करायला. त्यात ती आता चांगली चौदा वषाांची झाली होती.
रोज सारखाच तो दिवस . त्या दिवशी ती जास्तच खूश होती. कारण मालकीण बाईंनी नवीन कपडे, पुस्तक दिली होती. आई घरी काळजी करत असेल म्हणून ती भराभर पावलं उचलत होती, तेवढ्यातच तिला आवाज आला ‘वाचवा, वाचवा ‘ ती आवाजाच्या दिशेने धावत गेली.जसजसं जवळ जात होती तसतसं आवाज अजूनच जास्त येत होता. तिचे डोळे विस्फारले भीतीने लाल झाले होते,चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. समोर चार हैवान उभे होते आणि त्यांच्या ‘ती’ नग्नावस्थेत निपचित पडली होती. शालूला काय करावे सुचेना तिला काही कळत नव्हते, शालू आई… आई..….. ओरडत तिथून पळाली. आता नवीन भक्ष्य मिळणार म्हणून ते हैवान तिच्या मागे पळू लागले. ती जीव मुठीत धरून धावत होती, घामाघूम झालेली. काही अंतरावर जाताच त्यांनी तिला घेरलं ती तिथून सुटका करू पाहत होती, जिवाच्या आकांताने ओरडत होती त्यांनी तिच तोंड दाबून धरलं. तिला काहीच कळत नव्हतं माझ्यासोबत काय होतंय. तिचे हात पाय तिच्याच ओढणीने बांधले. हळूहळू अंगावरचे कपडे उतरत होते, डोळ्यातून अश्रु ओघळत होते. आता तिला वेदना जाणवू लागल्या होत्या त्या वेळी ती जणू काही स्वतःशीच झुंज करत होती. थोड्या वेळाने तिचा आई.. आई….. असा आवाज आता बंद झाला होता. बंद झालेले डोळे उघडले. आजूबाजूला मिट्ट काळोख आणि खायला उठणारी शांतता…… ती उठू पाहत होती पण पुन्हा कोसळत होती.सारं बळ एकवटून तिने कपडे गोळा करून अंगावर चढवले. तिला काही सुचत नव्हते थोडा वेळ तिथे बसून ती उभी राहिली . आता तिला शुद्धीवर आल्यासारखं वाटत होतं.तेवढ्यातच तिलाआईची हाक ऐकू आली, ‘शाले. ये.. शाले…`
आईला बघताच तिला दिलासा मिळाला . आई मात्र तिच्याकडे बघून थबकली. तिला पाहून कल्पना आलीच होती की काय घडलं. ती धावत शालू कडे गेली तिला उराशीधरून रडू लागली. कोणाला काहीच कळू नये म्हणून ती शालूला घाईघाईत घरी घेऊन गेली. शालू आईला सारखे प्रश्न विचारत होती. ‘काय नाय होनार ` अस म्हणूनआई तिच मन दुसरीकडे वळवत होती. आई आपल्याला टाळतेय आणि आपल्यासोबत काहीतरी वाईट घडलंय हे तिला कळत होतं. काहीतरी करायला हवं अस तिने आईला सुचवलं पण आपल्याकडे कोणी लक्ष नाही देणार , आपली तेवढी लायकी नाही अस सांगत तिला गप्प बसवले.जसजशी वेळ सरत होती तसतशा त्या वेदना त्या कडवट आठवणी पुसट होत गेल्या.आयुष्याच्या पुस्तकाची पाने वेगाने उलटत होती. परंतु त्यात मात्र एक होतं शालू नेहमी हिरमुसलेली असायची. पुरूषांचा तर तिला तिटकाराच होता. त्यांच्या सावलीला पण ती जात नसे. सकाळी कामाला जायच आणि संध्याकाळी घरी यायचे एवढाच दिनक्रम ,आता तर प्रियाकडेही जाण तिने बंद केल होतं.
शालू गुणी होती, संस्कारी होती दिसायला ही सुंदर अगदी कोणाच्या ही मनात भरेल अशी. गेल्या एक महिन्यापासून तो तिच्या मागे लागला होता. सतत तिला
लग्नासाठी विचारत असे ती मात्र त्याला टाळत असे आणि तो का मागे लागू नये, तिने तारुण्याच चोवीसाव्व पान उलटल होतं. शेवटी एके दिवशी तिने ठरवलच आज धीर करून रजतशी बोलायचच, ‘मला नाही जमणार हे सगळ’ अस सांगायचं. ती त्याच दिवशी संध्याकाळी त्याला भेटली. तिने ग्रुहीतच धरल होतं की तिच्यासोबत आधी काय घडलंय हे कळाल्यावर तो तिला नाकारेल. आत्तापर्यंत तिने काही केले नव्हते कारण आईने तस बजावलच होतं. मनात विचार चालूच होते, ‘हे ऐकून जरी रजतने नाकारलं तरी चालेल आणि त्याने का नाकारू नये अशा मुलीला कोण स्विकारेल ते काहीही असो पण त्याला अंधारात ठेवणं योग्य नाही’. म्हणून एवढ्या वर्षांचं मनात साचलेल दलदल तिने त्याच्यासमोर बाहेर काढलं. डोळ्यात साचलेल्या अश्रूंना तर त्या दिवशी पाझरच फुटलं . शेवटचा शब्द ‘संपल एवढचं सांगायचं होतं’……….. दोघांमध्येही शांतता………..
शालू स्वतः शीच बोलत होती, ‘मला माहीत आहे तू नाहीच म्हणणार मला. ’ अस बोलत ती तिथून उठून निघून गेली. तेवढ्यात रजतने तिचा हात धरला आणि म्हणाला , आम्ही
सगळे सारखेच नसतो गं…………………