प्रवास दोन घडीचा
प्रवास दोन घडीचा


भर दुपारी , कडक उन्हात पाणवठ्याच्या कडेला , वडाच्या सावलीत खांद्यावरची झोळी सांभाळत काठीच्या आधाराने , तिठ्यावर वर तो म्हातारा उभा होता....
हॉर्न चा कर्कश आवाज करत , करकचून ब्रेक लावत एस. ती. ची लाल बस थांबली.
लटपटत्या पायाने , जेवत्या हाताने बस च्या दरवाज्याचा दांडा धरून आत प्रवेश केला....
कंडक्टर खेकसला....ए म्हाताऱ्या बस इथे...
त्याला कंडक्टर च्या बाजूची सीट मिळाली......
का कुणास ठाऊक मला त्या वेळी त्या वृद्ध गृहस्था बद्दल एक वेगळीच आपुलकी वाटून राहिली
मी त्यांना माझ्या सीट कडे घेवून आलो , त्यांना खिडकीची जागा देऊन मी त्यांच्या बाजूला सरकून बसलो.
धूळ , वाऱ्याचा त्रास होऊ नये , म्हणून मी खिडकी ची काच ओढून घेतली.
ए...खिडकी का लावली ? गृहस्थ माझ्यावर चिडले.
माफ करा दादा...
त्यांना बोलतं करण्याचा माझा प्रयत्न...
आणि आश्चर्य...?
माझ्या या आपुलकीच्या शब्द ओहोळ्याने
त्या गृहस्थाच्या सुरुकुतल्या
चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य पसरले.
नाव काय रे तुझे , कुठे चालला आहेस ? एकटाच आहेस ?...
त्यांनी चौकशीची सराबती चालू केली...
मी सुट्टी काढून गावी चाललोय , बायको , मुलांना भेटण्यास , बेळगावला उतरणार आहे.मी न थांबता एका दमात उत्तर दिले.
ते गृहस्थ बोलते झाले , मी पण बेळगावला चाललोय , आधारवड आश्रमात . खरं तर तसा मी सतत चालतच असतो, एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका प्रवासातून दुसरा प्रवास..., तू कंटाळणार तर नाहीस न माझी म्हाताऱ्याची बडबड ऐकून ? कसं आहे राजा, हा प्रवास म्हणजे प्रारब्ध आहे माझं, तुझं !
इथे आपल्याला ना प्रवासाची दिशा ठरवता येते, ना प्रवासाचा वेग ! ना सहप्रवासी निवडता येतात ना गंतव्य स्थान ! हो न ? आपल्या आयुष्याच्या ह्या प्रवासाची सुरुवात होते ती आई वडिलांचं बोट धरून, आणि मग चालता चालता लक्षात आलं की अरे, ते तर नेहेमीच आपल्यासोबत असतात, अगदी सोबत नसताना सुद्धा ! आई वडील सोबत आहेतच ह्या विश्वासाने चालत असतानाच प्रवासात अलगदपणे काही सहप्रवासी येऊन मिळाले, अन नकळत ह्या नवीन साथीदारांनी स्वतःच असं एक खास स्थान निर्माण केलं माझ्या जीवनप्रवासात ! त्यातले काही माझे आप्तेष्ट होते तर काही मित्र, माझीच मुलं, माझाच परिवार, जणू हे सर्व होते माझी जगण्याची आशा !
प्रवास म्हटला की त्यात प्रवाशांची चढ उतार असणारच. बरेचदा आपले आई वडील, आपले पालक आपल्याला एकट्याला सोडून दुसऱ्याच प्रवासाला निघून जातात, लांबवर, परत कधीच न भेटण्यासाठी ! इतरही अनेक जागा प्रवासात अधून मधून रिकाम्या होत जातात, एक एक पोकळीला जन्म देत ! अशा कित्येक पोकळ्या आजवर प्रवासात सोसल्या, ज्या आजवर कधीच भरून येऊ शकलेल्या नाहीत. नवीन प्रवासी आला तरी तो उतरलेल्या प्रवाश्याची जागा कशी भरून काढणार ? हे असे उतरून जाणारे प्रवासी फार जाणवत रहातात, पुढच्या सर्व प्रवासात ! सांगून सवरून उतरलेल्या प्रवाशांना हात हलवून निरोप तरी देता येतो, पण अचानक उतरून जाणाऱ्यांचं काय ? लक्षात येईपर्यंत प्रवास पुढे गेलेला असतो आणि आठवणी मात्र मागे रहातात.
अशा चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशांच्या सुखदुःखाच्या, आशा निराशेच्या स्मृती म्हणजेच जीवनप्रवास ! ह्या प्रवासात कोण सोबत आले, कोण सोडून गेले यापेक्षा प्रवास सुरु असताना सहप्रवाश्यांशी मी कसा वागलो, प्रवासातले ते एकत्रित क्षण कसे घालवले, प्रवासातले कडू गोड आठवणी हे सर्व जास्त महत्वाचे ! प्रवासाचे यश याच गोष्टी निश्चित करतात. गंमत म्हणजे इतरांच्या प्रवासाचं गणित मोजणारा मी, माझा प्रवास कुठपर्यंत आहे हे मात्र मलाच माहिती नसते. प्रवास संपण्यातली अनिश्चितता हेच ह्या प्रवासाचं खरं रहस्य आहे. म्हणूनच प्रवाश्याने एवढंच करावं की जोवर प्रवास सुरु आहे तोवर फक्त प्रवासाचा आनंद घ्यावा, सहप्रवाश्यांमध्ये न गुंतता ! "नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जीणे गांगोदकाचे पाणी !" असं वाहात्या पाण्यासारखं जीवन जगणाऱ्याचा जीवन प्रवास हा सर्वार्थाने संस्मरणीय असतो ! आयुष्य असावं वाहणारं, लोकांच्या लक्षात राहणारं !
अखंड वाहणाऱ्या झऱ्यासारखं बोलणारे दादा बोलता बोलता खिडकीला मान टेकवून रेलून झोपले...
बेळगाव बस स्टेशन जवळ आले......प्रवाशांची गडबड सुरू झाली , जो तो आपापल्या सामानाची आवरा आवर करू लागला.....प्रवास संपला...
दादा उठा... बेळगाव आले......प्रवास संपला...
दादांना ना हलवून जागे करण्या साठी त्यांच्या खांद्याला हात लावला आणि त्यांची मान माझ्या कडे वळवली.....
अन्.......दादांचा पण प्रवास इथेच संपला होता......