बंद मनातील गुपिते
बंद मनातील गुपिते


प्रिय दीप्ती
इतक्या वर्षांनी ,पत्र लिहिण्याचे धाडस करतोय . याला कारण पण तसेच आहे.अग काल दुपारी कालिंदी घरी आली होती.खूप खूप गप्पा मारल्या.
तुझी सातत्याने आठवण आली.
अग कलिदीचा नवरा लेफ्टनंट कर्नल सुरेश , काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या रणधुमाळीत शहीद झाला. त्याची फॅमिली पेंशन चे किचकट काम मागच्या आठवड्यात पूर्ण केले , आणि कृतज्ञतापूर्वक सदिच्छा भेटी साठी तिने माझ्या घरी येण्याचे धाडस केले.पत्ता शोधत घरी आली , नानीनेच दरवाजा उघडला.
ती घरी येताच माझी तारांबळ उडाली , नानीला माहिती नाही मी बाहेर काय उद्योग केले , घरी येताच तिने नानीला स्वतःची ओळख करून दिली ,आणि मी केलेल्या मदती बद्दल माझे आभार मानले.
कालिंदी माझी कॉलेजची मैत्रीण हे नानीला काल समजले.पत्नी च्या चेहऱ्या कडे पाहण्याचे माझे काही धाडस झाले नाही.
पाठीमागून तिचा आवाज आला ,
तुम्ही बाल्कनीत बसा मी चहा टाकते ,....
जो होगा ओ देखा जायेगा , अस मनातल्या मनात ठरवून . विभाचा परवानगी वजा आदेश समजून बाल्कनीत दोन्ही आराम खुर्च्या सरकवल्या.
गप्पांच्या ओघात आठवणींच्या शृंखलेतील एक एक कड्या निखळत गेल्या.
पहिली आठवण निघाली ती....
तुम्ही दोघी मला निरोप देण्यासाठी गावा बाहेरील एस. टी. स्टँड वर भर उन्हात आला होतात.
दुसरी आठवण ,.........
कॉलेज च्या वार्षिक स्नेहसमेलनाच्या दिवशी , मी तुला माझ्या सायकलवरून डबल सीट बसवून तुझ्या घरी सोडले.कारण तुझ्या सायकलींचे मागचे टायर पंक्चर झाले होते.
आणि तुला ज्या वेळी समजले की मीच ते मागचे टायर पंक्चर जाणून बुजून केले होते ,त्या नंतर ८/१० दिवस माझ्याशी अबोला......
तिसरी आठवण.....
एकदा कॉलेज च्या नेहमीच्या कट्ट्यावर बसलो होतो.
तेव्हढ्यात एक अवालीया जवळ येऊन अगदी खेटून उभा...
त्याने वहीतून कॉलेज लायब्ररीचे आय कार्ड काढले...
बापरे ते तर तुझेच आय कार्ड.
काय रे xxx चांगली शिवी हासडून विचारले हे कोठून मिळव लेस ?
मित्र उत्तराला..
नाही रे तिनेच दिले तिला एक पुस्तक बदलून हवे आहे.
आणि त्याने गळच घातली ....
हिच्यावर चार ओळी लिहून दे ना..
काही न बोलता सुचल्या तशा चार ओळी त्याच्याच वहीत खरडल्या.
*तुझ्या भुवईच्या धनुष्याकोटीने , साधला निशाणा ,*
*त्या मोहक कटाक्षात , समजलेच नाही !*
*निमिषात कसे भान , हरवून बसलो ,*
*कधी गुंतून गेलो , उमगलेच नाही !*
आणि मला समजलेच नाही , या ओळी केंव्हा आणि कशा तुझ्या पर्यंत पोचल्या.
घरच्या बाल्कनीत आराम खुर्च्या टाकून , आमच्या गप्पा रंगल्या होत्या , नानीची बाल्कनीत
दोनदा फेरी झाली , एकदा कटिंग चहा द्यायला आणि दुसरी फेरी रिकामे कप घेवून जाण्यास.
गप्पांच्या ओघात तिन्ही सांज रेंगाळली , नातावाचा बॉल बाल्कनीत पडला ,आम्ही गप्पा आवरात्या घेतल्या. ती जाण्यास निघाली , तिने जड पावलांनी उबराठा ओलांडला .....
दोघेही स्तब्ध ! एक जाणवणारी वादळ पूर्व शांतता.....
आणि नानिच्या हाकेने भानावर आलो......
"आहो तिला रिक्षात बसवून द्या......"
आश्चर्याचा सुखद धक्का बसला.....
कलिंदीला रिक्षात बसवून दिले , निरोपाचे शब्द उचारू शकलो नाही ,नुसताच हात हालवला ......
तिचे डोळे बोलून गेले , आणि मला उमजून गेले......
अशी पाखरे येती आणिक........
घरी आलो बाल्कनीतल्या माझ्या खुर्चीत बसलो ,रिकाम्या खुर्चीकडे पहात.
भानावर आलो नानिच्या हाकेने
*आहो माझ्या बरोबर चहाचा घोट घेता ना ? .....*
आणि मी भानावर आलो.
इथेच थांबतो
घरातील सर्व मंडळी ना माझा नमस्कार , लहानास आशीर्वाद
तुझा मित्र
विजू.