Pradip Joshi

Others

3  

Pradip Joshi

Others

परतीची भेट प्रत

परतीची भेट प्रत

5 mins
728


सकाळची वेळ होती. बेड टी घेत घेत वर्तमान पत्रावर नजर टाकत होतो. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवले. मोबाईल एका अनोळख्या व्यक्तीचा होता. त्याने बोलायला सुरवात केली, “ नमस्कार. काय कशी काय आहे तब्येत? बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. आज योग आला बघा. तुमच्या गावावरूनच देवदर्शनासाठी जाणार होतो. विचार केला भेटावे तुम्हाला. गप्पा माराव्यात. Tuवहिनींच्या हातचे चहा कांदेपोहे घ्यावेत व निघावे पुढच्या प्रवासाला. “ आवाजावरून व बोलण्याच्या प्रकारावरून ओळखले की गेल्या साहित्य संमेलनात भेटलेले हे साहित्यिक गृहस्थ. त्यांनी मला आवर्जून भेटण्याचे आश्वासन दिल्याचेही मला आठवले. कशी आहे तब्येत? अस विचारणाऱ्या लोकांचा मला खर तर रागच येतो. तेवढ्यात आमच्या सौ नी विचारणा केली, “ कोणाचा होता फोन?”


मोबाईलची रिंग वाजली की तिला बरोबर ऐकू जाते. जेथे असेल तेथून सर्व कामे बाजूला ठेवून ती कोणाचा फोन आहे हे पाहण्यासाठी येते. या वयातही नवरा कोणाशी बोलतो हे जाणून घेण्याची तिला उत्कंठा असते. हा आजवरचा अनुभव. मी म्हटले,” माझ्या एका साहित्यिक मित्राचा फोन होता. तो दोन तासात मला भेटायला येतोय. जरा चहा पोहे करून ठेव.” ती म्हणाली,” हो करते ना ! नाहीतर आजवर आपल्या घरात कोणी न खाता पिता कधी गेलाय का? आमच्या आता हे अंगवळणी पडलय. “


चला तो यावयाच्या आत आवरावे अंघोळ करावी म्हणून मी उठलो. गरम पाणी बादलीत सोडले. हॉलमध्ये पाहिले तर बायको आवराआवर करीत होती. मला पाहताच ती म्हणाली,” घर जरा स्वच्छ ठेवा. रद्दी पेपर काढून बसू नका. आणि हो बेडवर पँट टी शर्ट काढून ठेवलाय. तोच घाला. नाहीतर बसाल आपले नेहमीसारखे बर्म्युडा व बनियनवर.” मी डोके थंड रहावे म्हणून रात्री लावतो ते नवरत्न तेल दिवस असूनही लावले. आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलो.बायकोचे ते “ बसाल आपले नेहमीसारखे” हे शब्द आठवले. मी नेहमी कसा बसतो? याचा विचार करतच गरम पाणी अंगावर घेतले. पण काय सांगू तुम्हाला बायकोच्या त्या वाक्याने गरम पाणी सुद्धा मला बर्फासारखे थंडगार लागले.


तिच्या सूचनेनुसार सर्व आवरले. आरशासमोर जावून पहिले. हॉलमध्ये येवून त्या साहित्यिक मित्राची वाट पहात बसलो. सुमारे अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर मित्राच्या गाडीचा आवाज ऐकू आला. मी चटकन उठून त्याच्या स्वागतासाठी पुढे गेलो. चांगले सहा सात जण आले होते. त्यांच्या बरोबर पर्शियन मांजर व बुलडॉग सारखा दिसणारा एक कुत्रा देखील होता. लेखकाच्या मुलाने त्या दोघांना गाडीतच ठेवण्याची सूचना केली. “करू दे त्यांना देखील जरा पाय मोकळे” असे सांगून त्या साहित्यिक मित्राने ती सुचना फेटाळून लावली.


बुलडॉगचे नाव मॉँटी व मांजराचे नाव ब्राउनी असल्याचे मला कळले ते त्यांच्या प्रेमाने हाक मारण्याच्या पद्धतीने. त्यांना हाक मारल्याबरोबर दोघांनी घराकडे धाव घेतली. एकाने टीपॉयवर बैठक मारली तर दुसऱ्याने कोचवर उड्या मारल्या. आम्ही दोघे एकदा रागाने तर एकदा हसत त्यांना दाद देत होतो. आम्ही सर्व जण गप्पा मारत बसलो तोवर सौ कांदेपोहे डिश व चहाचा कप घेवून आली. मॉँटी व ब्राउनी आशाळभूत पणे पहात होते. तेवढ्यात लेखकाच्या बायकोने त्यांच्याकडे पाहून “ हा खाऊ तुम्हाला नाही बर, थांबा तुमच्यासाठी दुसरा आहे” असे त्यांना सुनावले. आम्ही दोघे एकमेकाकडे बघत राहिलो. आता काय मागणी केली जाते याचीच चिंता आम्हाला लागली.


तेवढ्यात “ त्यांना बिस्किटे लागतात” असे लेखक महाशयांनी सांगितले. बायकोने चौकोनी बिस्किटाचे दोन पुडे आणून ठेवले. तेवढ्यात ते पुन्हा म्हणाले,” अहो वाहिनी त्यांना गोल बिस्किटांची सवय आहे.” घरात गोल बिस्किटे नव्हती सौ ने शेजारच्या एका मुलाला पाठवून गोल बिस्किटाचे दोन पुडे आणले. चहा नाष्टा यथासांग झाला. जाता जाता लेखक मित्राने माझ्या हातात एक पुस्तक दिले. “ नुकतेच प्रसिध्द झाले आहे. वाचा आपला अभिप्राय कळवा “ असे आवर्जून सांगितले. मला खूप आनंद झाला. चला वाचायला आणखी एक पुस्तक झाले मी विचार केला. कपाटात आणखी एक पुस्तक वाढल्याने सौ चा चेहरा बघण्यासारखा झाला. सर्व मंडळी निघून गेली. मी पुस्तक उघडून पहिले. आदरणीय साहेब यांना सस्नेह भेट असे नमूद करून खाली स्वाक्षरी पण केली होती. साहेब उल्लेख केल्यामुळे मला जरा बरे वाटले. समाजात मला लोक किती मान देतात हे मी बायकोच्या हाती पुस्तक देवून सांगितले.


असेच काही महिने गेले. एक दिवस त्याच लेखक महाशयांचा मला फोन आला. “ काय पुस्तक वाचले काय? कसे वाटले ? आपली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुद्दाम फोन केला.” मी म्हटले, “ हो वाचायला घेतले आहे. फारच छान लिहता तुम्ही ? कस काय जमत तुम्हाला ? काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो. तेवढ्यात ते म्हणाले ,” आज आहात का घरी. एक छोट काम होत. ते पुस्तक जरा वर काढून ठेवा. मी तासाभरात तुमच्याकडे येतो.”


मी सौ ला हाक मारली. तिला म्हटल,” अग ते पुस्तक आपण नेमके कुठे ठेवले ?” ती म्हणाली, “ कुठल पुस्तक, घरात पुस्तकांचा ढीग आहे. नेमक नाव सांगा मग शोधून देते “ आता माझ्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मी तर पुस्तक वाचतोय असे सांगितले आता त्यांना पुस्तकाचे नाव तरी कसे विचारणार ? शेवटी मी तिला म्हटले, “ तू सगळी पुस्तके काढून दे. मी बघतो. “ तिने पुस्तकाचा ढीग माझ्यापुढ रचला. तिच्या कामाला ती निघून गेली. मी सगळी पुस्तके उलथापालथ केली. मला पाहिजे होते ते पुस्तक मिळाले.


बरोबर एका तासाने लेखक महाशय आले. यावेळी ते एकटेच होते. मी पुन्हा दारात जावून त्यांचे हसून स्वागत केले. ते आत आले. बायकोने फक्त पाण्याचा ग्लास आणून ठेवला. चहा कांदेपोहे याची काही हालचाल दिसत नाही म्हटल्यावर त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. ते म्हणाले,” हे बघा साहेब, तुम्हाला मी जे पुस्तक दिल होत ते मला परत हवय. त्याच काय झाल मी पुस्तकाच्या जेवढ्या प्रती काढल्या तेवढ्या सर्व संपल्या. आता माझ्याकडे एकही प्रत शिल्लक नाही.कुणी विचारले तर प्रत शिल्लक नाही असे मी सांगू शकत नाही. राग मानु नका. अनेकांना पुस्तकाच्या प्रती दिल्या पण ते मान्यवर पडले ना? त्यांना भेट प्रत परत कशी मागायची ? माझ्या बायकोने शेवटी तुमच नाव सुचवलं. “


मी उठलो. त्यांनी दिलेले भेट प्रत पुस्तक त्यांना परत दिले. त्यांनी संशयखोर नजरेने पहात पुस्तकाचे पान ना पान तपासून घेतले. जाता जाता ते म्हणाले, “ याच पुस्तकाची नव्याने आवृत्ती छापणार आहे. छपाई झाली की तुम्हाला एक प्रत पाठवतो. सॉरी बर का ? राग नाही ना आला?”


लेखक महाशय निघून गेले. बायको म्हणाली, “ काय साहेब ? तुम्हाला माणस ओळखता येत नाहीत. पटकन तुम्ही विश्वास ठेवता. मला त्याच वेळी वाटल होत हा माणूस स्वार्थी आहे. तो फुकट पुस्तक कोणालाही देणारं नाही. काही दिवसांनी तो पुस्तक मागायला परत येणार? मला त्याच वेळी खात्री होती. नेमक तसच घडल. “ मला त्याच वेळी समजल की बायकांना सर्व गोष्टी आधीच कळलेल्या असतात. मात्र त्या आपली फजिती झाल्याशिवाय सांगत नाहीत. एखादी घटना घडून गेल्यावर मला वाटलच होत असा सूर त्या काढतात.


त्या दिवसापासून मी ठरवले कोणीही भेटप्रत म्हणून पुस्तक दिल तर ते स्वीकारायचे नाही. अगदीच स्वीकारण्याचा प्रसंग आला तर त्यावर कायमस्वरूपी भेट असे त्याच्याच हस्ताक्षरात लिहून घेवून मग त्याचा स्वीकार करायचा. साहित्याच्या क्षेत्रात देखील अस वागणारी माणस आहेत याचेच मला आश्चर्य वाटून राहिले. त्या लेखकाने दुसरी आवृत्ती छापली की नाही मला समजले नाही. त्यानंतर आजतागायत तो माझ्याकडे फिरकला नाही. एका बाजूला माझ्या संग्रहातील एक पुस्तक कमी झाले याचे मला दुख झाले. दुसऱ्या बाजूला कपाटातील एक पुस्तक कमी झाले म्हणून बायकोला मात्र आनंद झाला.


Rate this content
Log in