पंचेचाळीसतली अवहेलना
पंचेचाळीसतली अवहेलना
राधिका ने दिवसभराची काम आटपली. उद्या च्या नाश्त्यासाठी डोसा चे पीठ ठेवले. कपडे इस्त्री केले. कडधान्य भिजत घातले. कांदा कापून फ्रिज मध्ये ठेवला. सगळ किचन आवरून तिने लाईट बंद केले आणि तिने आपला मोर्चा हॉल कडे वळवला, हॉल मध्ये पसारा तर जणू काय तिची च वाट बघत होता. बघून एव्हढी चीड चीड झाली. तरी पण बोलले की भांडण होतात, म्हणून तिने सगळ आवरलं. दरवाजा-खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली. पण पुन्हा काही तरी चुकल्यासारखे वाटले म्हणून मागे फिरली. राधिका चा २० वर्षाचा मुलगा अयान शांत झोपला होता. त्याला एकदा पाहिले. आणि ती झोपायला निघाली.
कौस्तुभ, रधिकाचा नवरा, तिची वाट बघत बेड रूम मध्ये पुस्तक वाचत बसला होता. राधिका बेडरूम मध्ये आली तिने दरवाजा बंद केला. थोडा बेडरूम आवरला आणि ती बेड वर झोपली. कौस्तुभ ने ही राधिका आलेली पाहून पुस्तक बाजूला ठेवले आणि तो अंथरुणावर पडला. सगळ सगळ आवरता आवरता राधिका ला झोपायला १२.३० झाले होते. राधिका ने कौस्तुभ च्या मिठीत डोके ठेवले आणि झोपली सुध्दा. दिवसभराच्या ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाढ झाली. कौस्तुभ ला हे पाहून खूप वाईट वाटल आणि राग पण आला. आजकाल हे रोजच झालं होत. रात्री राधिका खूप लगेच झोपत असे. त्याने चिडून राधिका ला बाजूला केले आणि तो पाठ फिरवून झोपला. राधिका ला झोपेत याची कल्पना ही नव्हती. सकाळी ६.३० वाजता राधिका उठली. तिने नेहमीप्रमाणे सगळ आवरल, बाप - लेक आपापले डबे घेऊन निघाले. ती ही ऑफिस ला निघाली. राधिका एका उच्च कंपनी मध्ये मॅनेजर पोस्ट वर होती. रोज कामाचा ताण, डेडलाईन्स या तिचा जीव ओढून निघत होता. पुन्हा ऑफिस मधून निघताना आता घरच्या जेवणाची तयारी, आवरा आवर होतीच. राधिकाच हे रूटीन होत.
आज पण नेहमी प्रमाणे राधिका सगळ आवरून झोपायला आली. कौस्तुभ वाट बघत होता. राधिका ला ही माहित होत की हा माझी वाट बघत आहे. पण त्याच्या प्रणयक्रीडे ला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही नव्हती. ती आज पण बेड वर पडताच तोंड फिरवून झोपून गेली. कौस्तुभ ला खूप वाईट वाटले. काय प्रोब्लेम आहे काहीच कळत नव्हत. आधीची उत्साही राधिका हरवली होती. माझ्यावर भरभरून प्रेम करणारी, मी ऑफिसमधून कितीही उशिरा आलो तरी बेडरूममध्ये माझी वाट बघत बसणारी, माझ्यासाठी तयार होणारी ती माझी राधिका कुठेतरी हरवली आहे. कौस्तुभला सगळं कळत होतं. पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार, म्हणून तो गप्प बसत होता. पण आज त्याने न राहवून विषय काढायचा ठरवले. राधिका पाठ फिरवून झोपली होती. त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला, त्याला वाटलं.... त्याने कदाचित ती मोहरुन उठेल. आपल्याला प्रतिसाद देईल, पण तसे काहीच झाले नाही. तरीसुद्धा त्याने आपली प्रणायक्रिडा चालूच ठेवली. कौस्तुभ ला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती. पण एक नवरा-बायकोच्या नात्यामध्ये जी जवळीकता असावी, ती तो साधण्याचा प्रयत्न करत होता. प्रेमाचा वर्षाव करत होता पण, त्याला वाटले की.. आपण फक्त एका बाहुल्या सोबत सगळं करत आहोत का ? राधिका मेलेल्या माणसा सारखी फक्त पडून होती. तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता.
कौस्तुभला खूप वाईट वाटले. त्याचा राग उफाळून आला होता. त्याने तिला तसेच सोडले आणि तो उठला. त्याने लाईट लावले, राधिकाला आवरायला सांगितले आणि म्हणाला "राधिका मला तुझ्याशी बोलायचं " राधिका ही काही झोपलेली नव्हती. ती सगळं अनुभवत होती. गेल्या पंधरा वीस मिनीटं कौस्तुभ ने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं. तिने टेबल लॅम्प लावला आणि ती उठून बसली. तिला आज कळून चुकले होते, इतक्या दिवसापासून रोखून धरलेला कौस्तुभच्या सहनशक्तीचा बांध आज फुटणार होता. कौस्तुभ हा शांत स्वभावाचा माणूस आहे पण, आपल्या बायकोकडुन असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. अशी एकच अपेक्षा होती. तोही तिला काही कमी पडू देत नसे. वेळोवेळी त्याच प्रेमही तो बोलून दाखवत असे. तिच्या साठी गिफ्ट आणण. चारचौघात मान देणे, ठरलेले दिवस लक्षात ठेवणं असं सगळं करत होता. त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावे यासाठी घरातही कामासाठी बाई ठेवली होती. तिला वेळ देण्यासाठी त्याने त्याच्या कामाचेही व्यवस्थित नियोजन केले होते. मग कुठे चूक झाली हा विचार करून वेड लागायची पाळी आली होती कौस्तुभ वर. खूप वेळ असाच शांततेत गेला.
शेवटी न राहून राधिका ने बोलायचे ठरवले. राधिका म्हणाली " कौस्तुभ, मला नाही माहित असं का होतं ? मलाही तुझ्याबद्दल तेवढ्याच फीलिंग्स आहेत. माझ आज ही तुझ्यावर प्रेम आहे किंबहुना आधीपेक्षा अधिकच. पण मला माहित नाही असं का होतं ? कळत ही नाही ? मलाही वाटतं चार-चौघांसारखं आपलंही आयुष्य सुखाचं असावं पण, मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाहीये. तू जवळ आलास की मला किळस वाटते, माझी चिडचिड होते. मला सगळं नकोसं वाटतं. मला याक्षणी हवं असं वाटत असेल ते मला एका क्षणात नकोसं वाटतं माझी चिडचिड होते. मग तुला वाईट वाटतं आणि मलाही." राधिका आता रडवलेल्या स्वरात बोलत होती. राधिका पुढे म्हणाली " कळतय मला, मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत. पण मला कळत नाहीये मी काय करू ? मला पण त्रास होतोच आहे ना. तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे. माझ्या या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावून बसेल. पण, माझ्याकडे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही आहे. मला माहित होतं हे असं होणार म्हणूनच मी झोपले होते. " कौस्तुभ ला तिचा तो रडवलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून आता या दोघांच त्याला वाईट वाटू लागलं होत. त्याने स्वतःला थोडे शांत केले. तो राधिका जवळ गेला. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला," तू आधी शांत हो "
" तुला त्रास होतो आहे का ? ऑफिसचं काही टेन्शन आहे का ? असं काही की जे तु मला सांगू शकत नाहीये ?" राधिका त्याच्याकडे फक्त बघत होती कारण फक्त त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. तरी पण ती हुंदका गिळत म्हणाली , "नाही रे, ऑफिसला टेन्शन नेहमी असत, त्यामुळे असं कधी होईल असं मला नाही वाटत आणि त्रास म्हणशील तर मलाच माहित नाही काय होतं. काहीच कळत नाहीये. मला नक्की काय होतं तेच माहित नाहीये त्यामुळे तुला तरी काय सांगू. आता या सगळ्याचाच मला कंटाळा यायला लागलाय. पण माझ्या मनात नाही असं नाहीये, मला करताना नाही आवडत. माझी इच्छा असते कौस्तुभ." राधिका समजावण्याच्या स्वरात बोलत होती. कौस्तुभ कडे पण याचं काही उत्तर नव्हते. कौस्तुभ राधिका ला म्हणाला," जाऊदे. सॉरी राधिका. तू झोप. उगाच माझी चिडचिड झाली. आपण सकाळी यावर सविस्तर बोलू. मी ही सुट्टी काढतो, तू ही सुट्टी काढ. तुला जर खरच काही त्रास होत असेल, तर आपल्याला त्यावर उपाय करणं गरजेच आहे. कारण तुझी झालेली अशी घुसमट मला ही बघवत नाहीये." राधीकाचे डोळे भरून आले होते. आपल्याला काही झालं तर नसेल ना, असं का होतय याचे उत्तर तिला ही हवे होते. राधिका कौस्तुभ ला म्हणाली," ठीक आहे. मी टाकते सुट्टी. बघू आपण काय ते. कारण मला ही हा चांगला चाललेला संसार आता गमवायचा नाहीये आणि आपल्या या भांडणाचा अयान वर परिणाम झाला तर ते आपल्याला खूप घातक ठरू शकत." कौस्तुभ लाही तिचं म्हणणं पटलं होतं. त्याने लाईट ऑफ केले आणि ते दोघेही झोपले. राधिका नेहमी प्रमाणे उठली. तिने सगळे आवरले आणि आज ऑफिसला जायचं नसल्यामुळे फक्त अयान च्या डब्याची तयारी केली. अयान कॉलेज साठी निघाला. त्याला ही थोडे विचित्र वाटले .आज हे दोघे घरी कसे पण मोठ्यांचं काहीतरी असेल असे समजून तो ही गप्प बसला. अयान गेल्यावर राधिका आणि कौस्तुभ ने बोलायचे ठरवले. कारण त्याच्या समोर हे विषय काढून दोघांनाही ऑकवर्ड फील होणार होतं. अयान गेल्याबरोबर कौस्तुभ राधिका ला म्हणाला," राधिका तयार हो. आपण एका गायनाकॉलॉजिस्ट कडे जाणार आहोत.". राधिकाला कळलेच नाही हा असं का म्हणतोय. गायनाकॉलॉजिस्ट आणि आता. राधिका च्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह कौस्तुभ ने ओळखले. कौस्तुभ म्हणाला," काही काळजी करू नकोस. माझ्या माझा मित्र एक गायनाकॉलॉजिस्ट आहे. आपण त्याच्याकडे जाऊ. मी त्याच्याशी हा प्रॉब्लेम सगळा डिस्कस केला आहे. त्याने मला येऊन भेटायला सांगितले, तुलाही सोबत आणायला सांगितले . कदाचित यावर काही उपाय निघेल. राधिका अजुनही संभ्रमात होती. पण हे कुठेतरी थांबायला हवं. म्हणून राधिका ही तयार झाली. कौस्तुभ ने ही आवरले आणि ते दोघे निघाले
साधारण एका दीड तासाने ते क्लिनिक ला पोहचले. घरा जवळ जाता आले असते पण राधिका किती मोकळे पणाने बोलू शकेल काय माहित. म्हणून कौस्तुभ ने मित्रा कडे जायचे ठरवले. २-४ पेशंट नंतर राधिका आणि कौस्तुभ आतमध्ये गेले. प्रशस्त असे नावाजलेल्या डॉक्टर चे क्लिनिक होते. पेशंट ची पण वर्दळ होतीच. राधिका आणि कौस्तुभ ला पाहून डॉक्टर ने स्मित हास्य केलं. डॉक्टर ना पाहून कौस्तुभ उत्साहात म्हणाला," हॅलो मित्रां, कसा आहेस. खूप दिवसांनी भेटलास " डॉक्टर म्हणाले," मी मस्त, चालू आहे. तू बोल कसा आहेस ? ". कौस्तुभ म्हणाला, "मी पण ठीक. ही माझी वाइफ राधिका. आणि राधिका हा शरद. " डॉक्टर म्हणाले," हॅलो, राधिका. बसा. बोला मग , काय होतय. "
कौस्तुभ आणि राधिका चेअर वर बसले. राधिकाला खूप टेन्शन आले होते आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत पण होते. शरद ने पाण्याचा ग्लास पुढे करत राधिका ला म्हणाला.
" निश्चिंत होऊन बोल, मी पेशाने गायनाकॉलॉजिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट पण आहे. तू कौस्तुभ चा मी मित्र आहे म्हणून
थोड ऑकवर्ड वाटून घेऊन नकोस. घाबरू तर अजिबात नकोस. तुझ्या बोलण्याचा मी एक डॉक्टर - पेशंट याच नात्याने विचार करेन. बाकी काहीं नाही. तशी मला थोडी माहिती दिली आहे. कौस्तुभ ने पण तू सांगितलं तर उत्तमच "
राधिका ने स्वतः ला सावरले. दोन वेळा केस आणि कपाळावर हात फिरवून तिने शरद कडे पाहिले आणि म्हणाली," डॉक्टर मला काही समजतच नाही, असं का होतं? मला कधीही संवेदना होत नाही व उत्तेजना तर दूरच. त्यामुळे हा फार चिडचिड करतो. आता तर आमचं भांडण ही झालं काल. मला एक मुलगा आहे, पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतंय. तुमच्याकडे यावर काही उपचार असल्यास सांगा".
डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले राधिका अजून हि ओपन अप होऊन बोलत नव्हती त्याने थोड उघड उघड बोलण्याचे ठरवले.
डॉक्टर म्हणाले," कौस्तुभ आणि राधिका, माझं बोलणं दोघेही नीट ऐका. वैवाहिक समस्यांचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसेसमधील निदान वेगवेगळे आहेत. काही केसेसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छाच होत नाही. स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते. त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेने त्या शारीरिक संबंधाकडे बघतात. लग्नानंतर नवऱ्याचं सुख व अपत्यप्राप्ती हे दोनच उद्दिष्टे शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात. आपलं शरीर या दोन कार्यासाठी उपयोगात आणणं हाच त्यांचा शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो. या उलट कामतृप्तीचा अभाव या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असते. शारीरिक संबंधात रुचीही असते, पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते. कामतृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंधातील रुची कमी होते.या दोन्ही समस्यांचे मूळ मानसिकतेत आहे. अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं. या अतिकाळजीमुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असा समज तयार होतो. त्यामुळे संबंधाबद्दल रुची नष्ट होते. लग्नानंतर अनिवार्य म्हणून या स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात. यालाच फ्रिझीडीटी म्हणतात. या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासून स्वतःला या सर्व गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो. बऱ्याच वेळा पतीला शीघ्रपतनाचा त्रास असल्यास पत्नीला कामतृप्तीचा अभाव असू शकतो. त्यामुळे अनऑरगॅझिमया निदान करण्यापूर्वी मला दोघांशीही चर्चा करणं आवश्यक असतं.या समस्येप्रमाणेच लैंगिक इच्छेची कमी असणं ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते. ही पण समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे. तर मला अस फक्त राधिका तुझ्या एका वाक्यावरून काही नाही कळणार "
शरद ने कौस्तुभ कडे पाहिले," कळतय का ? हे बघ राधिका हेच कारण असेल ही नाही मी फक्त माहिती सांगितली. मी आता काही प्रश्न विचारीन त्याची नीट उत्तर द्या "
राधिका ने मान डोलावली.
शरद ने विचारले ," तुमचं वय किती? लग्नाला किती वर्ष झालीत? शेवटची पाळी कधी आली होती? ऑफिस कुठे आहे? घरात कोण कोण असत? त्रास कसला होतो का, पोटात दुखन, चक्कर येणे , थकवा ? "
राधिका घाम पुसत म्हणाली," माझं वय ४५ वर्षे. लग्नाला २१ वर्ष झाली. घरात आम्ही तिघेच असतो. मी , कौस्तुभ आणि मुलगा. शेवटची पाळी? अ अ...? " राधिका प्रश्नार्थक नजरेने कौस्तुभ कडे पाहत म्हणाली," बहुतेक ६ महिन्यापूर्वी" कौस्तुभ पण आश्चर्याने बघू लागला. शरद च्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्याने राधिका कडे बघितले आणि म्हणाला," नक्की सहा महिने, आणि कौस्तुभ तुला या बाबत काहीच माहीत नाही. याला च मेनोपोज म्हणतात. रजोनिवृत्ती. अरे सुशिक्षित तुम्ही. याकडे दुर्लक्ष कस केलत "
शरद चा प्रश्न योग्य होता. कौस्तुभ ला ही मेनोपोझ म्हणजे काय हे माहीत होत. पण आपल्या बायको ची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावे याचे वाईट वाटत होते त्याला. राधिका आणि कौस्तुभ एकमेकांकडे बघत होते.
राधिका म्हणाली ," हो बहुतेक मनोपोज च असेल. या रोज च्या धावपळीत पाळी आली का नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही. काही वर्षांपूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंग च ऑपरेशन केलं होत. मग त्या नंतर पाळी चुकेल आणि प्रेगन्सी याच मी टेन्शन घेणं सोडून दिलं होत. "
कौस्तुभ ही मध्ये म्हणाला," आणि मी पण"
शरद म्हणाला," अरे ते सगळं जर ठीक असल तरी आपण वयाच्या त्या उंबरठयावर आहोत आणि आपली पाळी येत नाही आहे. हे महत्त्वाचं असू नये. मग आता मला सांगाल का ? अजून तुम्हाला काय काय त्रास होत आहे ? "
राधिका थोडी अडखळत तच म्हणाली," लघवीमध्ये जळजळ होते, सारखी लघवी होते, सेक्स च्यावेळी त्रास होतो, हात, पाय, सांधे, कंबर दुखतात चक्कर येते, सगळ्याचाच कंटाळा येतो "
कौस्तुभ तर कान देऊन फक्त ऐकत होता. हिला अस पण काही होत असेल याची कल्पना ही नव्हती त्याला.
शरद म्हणाला,"येस यालाच, मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. नॉर्मल आहे हे. मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे. या काळात वय वाढत असण्याची जाणीव, मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले, वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेनोपॉज व या मुळे होणारा शरीरातील हार्मोन्सचा बदल या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो. घाबरून जाण्याचे कारण नाही पण स्वतः कडे लक्ष पण द्यायला हवे की नको. या वयातील स्त्रियां घरात इतक्या बिझी असतात की स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे. मग चिडचिडेपणा, निस्तेजपणा, थकवा, आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघाने आलंच "
राधिका आणि कौस्तुभ ला ही शरद च म्हणणं पटत होत. या सगळ्यात खरच राधिका स्वतः ला विसरून गेली होती.
राधिका म्हणाली," मग आता, डॉक्टर". शरद म्हणाला," काही नाही. काळजी घ्यायची फक्त. पालेभाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करा. भाज्या उकडून खाणे सुद्धा फायद्याचे. खारट, गोड किंवा आंबट पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करा. फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. व्यसनापासून दूर राहा. कॅल्शियम युक्त पदार्थ खा. आणि गरज लागली तर मला फोन करा. कोणतीही औषध मला न विचारता घेऊ नका. इतकंच "
राधिका ला आता हे सगळ ऐकून थोड हायसे वाटले. इतक्या दिवसापासून चे मनावरचे दडपण कमी झाले होते. आणि दोघांच्या शंकांचे ही निरसन झाले होते.
राधिका ने तरी पण न राहवून पुन्हा एका शरद विचारले," म्हणजे मला काही झालेलं नाही मी नॉर्मल आहे तर"
शरद हसतचं म्हणाला," हो नक्कीच, आणि पुन्हा काही त्रास झाला च तर कधी ही क्लिनिक मध्ये ये. मग बघू आपण"
कौस्तुभ च्या पण चेहऱ्यावरचे हास्य परत आले होते.
कौस्तुभ म्हणाला," थँक्यू मित्रा, आता थोड रिलॅक्स वाटत आहे ".
शरद म्हणाला," नो निड, इट्स माय प्लेजर. पण तू तिला समजून घे. तुझी सोबत.. तिला या फेज मधून बाहेर निघायला मदत करेल. बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे. म्हणून आपण तरी समजून घेतले पाहिजे ना. रोज ऑफिस मधून घरी जाऊन सोफ्यावर बसण्यापेक्षा एक फेरफटका आपण ही किचन मध्ये टाकावा की"
कौस्तुभ ला शरद चे म्हणणे पटले होते, ," येस बॉस, भेटू पुन्हा " शरद आणि कौस्तुभ ने शेकहॅण्ड केले, राधिकाने ही आभार मानले आणि दोघे ही पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिक च्या बाहेर पडले.
समाप्त.
मेनोपॉज होणे हे नैसर्गिक आहे, हा कोणता आजार नाही. परंतु मेनोपॉज नंतर अनेक स्त्रियांना जास्त त्रासाला तोंड द्यावे लागते. याची जनजागृती करणे गरजेचे आहे .
