Shrirang Ghodsar

Others

4.7  

Shrirang Ghodsar

Others

पळस - निसर्गाचे रंग वैभव...

पळस - निसर्गाचे रंग वैभव...

2 mins
763


पळस म्हणजे रानाचा अग्नी! पळस बहरतो तेव्हा अख्खं रान पेटल्यासारखं भासतं. म्हणूनच कदाचित त्याला इंग्रजीमध्ये 'flame of the forest' म्हणत असतील.


थंडीचे दिवस संपून उष्ण काळ सुरू होण्याआधी ऋतूचक्राच्या आसाभोवती फिरणारी सृष्टीच जणू संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभी असते. 'पळसाला पाने तिनच' ही म्हण फार प्रचलित आहे. म्हणींमध्ये जसा पळस वापरला जातो तसाच याचा उपयोग आयुर्वेदिक औषधींमध्येसुद्धा केला जातो.


तसं पाहायला गेलं तर पळस बहुगुणी आहे. अशा बहुगुणी पळसाची फुलं बहरल्यावर त्यातला रस पिण्यासाठी पळसावर पक्ष्यांची यात्राच भरते जणू. या पक्ष्यांमध्ये आघाडीवर असतात पळस मैना! निसर्गाच्या सोहळ्यात सहभागी होऊन फुलांचं परागीकरण करणार्‍या पळसमैना पळसफुलांमधला रस पिऊन परागकण वाहून नेण्यास निसर्गाची एक प्रकारे मदतच करतात.


फार पूर्वी तर नाही म्हणता येणार पण अगदी आता आतापर्यंत होळीला पळस फुलांनी तयार केलेला रंग वापरत होते. कारण एक तर या रंगाला खूप उच्च दर्जाचा सुंगध यायचा आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याचा शरीरावर तोटा कमी आणि फायदाच जास्त होत होता. आपले जुने लोकं खूप हुशार होते. लोकं तसं ऐकत नाही म्हणून काही गोष्टी त्यांनी देवाशी/परंपरेशी निगडित केल्या. परंपरेशी निगडित केलेल्या गोष्टी शक्यतो कोणी टाळत नाही. (भितीनं!?) 


असंच एक उदाहरण देतो. बैल पोळ्याला घराच्या प्रत्येक दाराच्या बाजूला लोकांनी पळसाच्या फांद्या लावायला 'पाहिजेच' अशी परंपरा चालू करून दिली जुन्या लोकांनी. पण हे सगळे का सुरू केले यामागे सुंदर आणि चपखल कारण आहे. ते मला माझ्या वडिलांकडून समजलं. 


'पूर्वी पळस बन हे गावाच्या अगदी जवळ असायचे. पळस बन खूप गर्द, अति दाट माजते आणि पळस फुलांच्या सुवासाने अस्सल नाग यामध्ये वावरतात, रमतात. नागासारखा रागीट विषारी सरपटणारा प्राणी गावाजवळ असणे हे गावातील लोकांसाठी अति धोक्याचं होते. तसं कोणी पळस बन साफ करणार नाही म्हणून त्याला पोळा या सणाशी जोडण्यात आलं.'


प्रत्येकाने जर आपल्या दारापाशी पळसाच्या फांद्या ठेवल्या तर आपसूकच पळस बने गावापासून दूर राहतील. 


पळसाची अजून एक गोष्ट माझ्या नजरेत भरते ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत असूनसुद्धा पळस बहरतो. न बोलता पण माणसाला खूप काही शिकवून जातो पळस! 

पूर्वीचे लोकं आजच्या लोकांसारखे उच्चशिक्षित नसतीलही पण निसर्ग वाचन जन्मतः येत असल्यामुळेच आणि निसर्गाशी जुळवून घेतल्यामुळे कदाचित हे लोकं सुखी आणि समाधानी होते.


असा हा समृद्ध बहुगुणी पळस काळाच्या ओघात (अति शहरीकरणामुळे किंवा आपल्या उदासीनतेमुळे) नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असचं होत राहिले तर जसं भारतीय चित्ता नामशेष झाला तसाच पळस पुढच्या पिढीला फक्त चित्रामध्येच बघावा लागेल. 

पळस टिकला, बहरला तर कदाचित त्याला बघून आपली पुढची पिढी बहरेल. देव करो आणि असंच होवो!


Rate this content
Log in