फुलत गेले ते क्षण
फुलत गेले ते क्षण


मी पंधरावीला होते....तेव्हा टीव्हीवर एक सिरीयल लागायची. तिचे नाव काही माझ्या लक्षात नाही. त्यामध्ये त्या सिरीयलची नायिका बाहेरगावी शिक्षणासाठी गेली होती आणि तेथील तिचा प्रवास यावर आधारित ती सिरीयल होती.. त्याच दरम्यान काही चित्रपटही मी पाहिले होते, पण योगायोग असा की ते चित्रपटही अश्याच काहीश्या कथांवर आधारित होते..म्हणजे कोणी शिक्षणासाठी तर कोणी नोकरीसाठी बाहेरगावी जात असतं.पण असं होत ना की चित्रपट बघता बघता त्या पात्रांच्या जागी आपणच आहोत असा विचार करूनच आपण त्या चित्रपटाचा आस्वाद घेत असतो. तसंच काहीतरी माझ्याबाबतीत झाले होते पण फरक इतकाच होता की मी फक्त विचार करत नव्हते तर मलाही असंच परदेशात नाही तर किमान दुसऱ्या राज्यात जाऊन तरी काहीतरी करून दाखवायचं होत. आणि दोन वर्षांनी मला बाहेर जाण्याची संधी आली.. मी डी.एड चा कोर्स केल्यामुळे मला कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कर्नाटकला शिक्षिकेची नोकरी चालून आली. मी ठरवलेलं मला प्रत्यक्षात साकार होताना दिसत होते. तिथे गेल्यावर सगळचं वेगळं.. म्हणजे राहणीमान तर लांबच राहिले पण इथे तर भाषा पण वेगळी... इथे आपण कसं टिकणार हा प्रश्न पडला.. पण एवढ्या लांब आपण आलो तर आपण निभावून दाखवायचंच अस मनाशी पक्क केलं..
....................
एकामागून एक दिवस जात राहिले पण ह्यामध्ये माझ्या लक्षातच नाही आले की मी ह्या वातावरणाशी इथल्या लोकांशी कधी समरस होऊन गेले.. ज्या भाषेचं मला इतकं
टेन्शन होतं ते टेन्शन तर एक वर्षभर मला जाणवलंच नाही.. कारण आपली जर इच्छा असेल तर आपल्याला लोकांशी समरस होण्यासाठी भाषेची गरज लागत नाही...
मी तिथे एकच वर्ष राहिले पण एका वर्षात जे मी तिथे कमावलं माझं घरातलं कोणी नसताना ते मी इथे राहून देखील कमावलं नसतं...कारण आयुष्यात हक्काने हाक देता
येईल अशी माणसं मी जोडली होती..आणि शेवटी तो क्षण आला...
मला तिथल्या लोकांना निरोप देण्याचा...मी निघू लागले तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांच्या तसेच तिथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी तरळत होत..आणि ते बघून मी एका वर्षात
काय मिळवलं ते मला गवसलं त्याच क्षणी वाटले...
फुलले रे क्षण माझे फुलले रे...