Priyanka More

Others

3.8  

Priyanka More

Others

गोंडस हास्य

गोंडस हास्य

3 mins
151


मी एक शिक्षिका आहे त्यामुळे मला जे अनुभव आले, आहेत ते जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थ्यांशी निगडित आहेत.त्यातील एक अनुभव......

      असंच एक दिवस नुकतीच शाळेतून येऊन फ्रेश होते ना होते तोवर दारावर एक निरागस आवाज ऐकू आला. टीचर टीचर... मी दारापर्यंत येऊन दार उघडेपर्यंत तो आवाज तसाच येत होता... म्हणून मी घाईगडबडीने दार उघडले. बघते तर काय माझा दुसरीतला विद्यार्थी आणि त्याची छोटीशी गोंडस बहीण. तिलाही मीच शिकवत होते. पण ती एलकेजीमध्ये होती. पुनीत मला सांगायला लागला, टीचर आज श्रेयाचा वाढदिवस आहे. तुम्हाला आई बाबांनी घरी बोलावले आहे.. मी खूप थकले होते त्यामुळे मी त्याला थकलेल्या स्वरात म्हणाले, नाही रे पुनीत आज नाही जमणार मला यायला सॉरी... मी उद्या येईन भेटायला आणि आज खूप काम पण आहे...


पण ते इवलेसे केविलवाणे डोळे माझ्याकडे आशेच्या नजरेने बघत होते हे मला जाणवले आणि पुनीतशी बोलता बोलता तिने अचानक माझा हात पकडला... टीचल टीचल चला ना.. माझा आज बद्दे आहे, तुमी या ना माझ्या घली... ती बोबड्या स्वरात मला घरी बोलावू पाहत होती....


त्या बोबड्या स्वरांनी माझा थकवा उतरवला. ठरवलं जाऊ दे काम येऊन करू. मी त्यांच्याशी टीचरपेक्षा त्यांची फ्रेंड म्हणूनच जास्त वावरले त्यामुळे कदाचित त्यांना माझा लळा लागला असावा कारण आमच्यावेळी शिक्षकांचा हात पकडुन त्यांना घरी बोलवायची हिम्मत आमच्यात तर नव्हती. असो...


मी त्यांना म्हणाले, तुम्ही व्हा पुढे मी येते... कोणाच्या वाढदिवसाला खाली हात कसं जायचं म्हणून मी आणि माझी मैत्रीण बाजारात जाऊन

तिच्यासाठी छानसा एक फ्रॉक आणि तिला आवडेल म्हणून डेअरीमिल्क घेतली आणि गिफ्ट छान पॅक करून तिच्या घरी जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात तिच्या वडिलांचा मला फोन आला... टीचर कुठे आहात तुम्ही मी म्हटले, हा हा.. रस्त्यातच आहोत, येतो आम्ही

ते बोलले, ठीक आहे या या...

आम्ही घरी पोहोचलो तर ते केविलवाणे डोळे टीचरच्याच येण्याकडे टक लावून बसले होते.. जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला तर ती चक्क नाचायलाच लागली. मी आणि माझी मैत्रीण तिच्याकडे आश्चर्याने बघतच बसलो. तिच्या आईने सांगितलं की तिनं आम्हाला ताकीदच दिली होती की तुम्ही आल्याशिवाय केक कापायचा नाही म्हणून... मी तिच्याकडे बघितले तर ती हसायलाच लागली...


मग केक वगैरे कापला. आम्ही तिला गिफ्ट देऊन घरी जायला निघालो तर ती जोरात येऊन मला बिलगली आणि मला बोलली थँक्यु टीचल.. आणि मला एक गोड पापी दिली.

मी तिला विचारलं, थँक्यु कशासाठी?

तर ती म्हणाली की तुम्ही आज थकला होता ना तली तुम्ही माझ्यासाठी आलात म्हणून...

तिचं हे उत्तर मला अनपेक्षित होतं... कारण मला असं वाटलं होतं की ती नाचायला लागली कारण आम्ही गिफ्ट घेऊन आलो म्हणून पण खर तर तसे नव्हते ती आनंदी होती कारण... तिची टीचर तिच्यासाठी तिथे आली होती.


मी काही क्षण तिला बघतच बसले तर तिने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि एक गोड स्माईल मला दिली. त्याच क्षणी वाटले बास्स अजून काय पाहिजे... ते गोंडस हास्य पाहून आणि ते उत्तर ऐकून मी तर पूर्ण साखरेसारखी विरघळले होते. नंतर मनात विचार आला की कसं त्या छोट्याश्या

जीवाला कळलं असेल माझ्या थकव्याबद्दल...


त्या दिवशीचा माझा संपूर्ण थकवा त्या गोंडस हास्याने क्षणार्धात दूर पळवला होता. त्यामुळे मी घरी येऊन पुन्हा जोमाने कामाला लागली...


Rate this content
Log in