पेरूचे प्रेम!
पेरूचे प्रेम!
मी इयत्ता पहिलीत असतांनाची गोष्ट. लहानपणी आठवतात ती आमच्या घरातील आंगणातली मोठ-मोठी पेरूची झाडे. चवदार पेरूचा सीज़न म्हणजे, आम्हा लहानग्यांची चंगळच असायची. पण आमचे अप्पा, आमच्या काळजीपोटी झाडावर चढू द्यायचे नाहीत. त्यांच्या खोलिहून दूर दिशेच्या झाडांवरच चढायचा कारभार मी आणि माझा मित्र अक्षय करायचो. मग टवटवीत हिरवी पेरू तोडून खायची अन् सर्वात उंच असलेल्या फान्दिन्वर चढून ती तोडायची, ही मजा काही औरच होती. अश्याच झाडांवर चढण्याच्या सवयीमुळे, एकदा खाली पडून, चार टाक्यांचा प्रसाद देखील मिळाला आहे लहानपणी, पण ती ही गोष्ट नाही. ती आम्हा लहानग्यांच्या खोडकर प्रवृत्ती ह्या खंडात लिहीन केव्हा तरी पुढे.
तर मी सांगत होतो ते एका रविवारच आठवतय, एक पेरूच झाड नेमक अप्पांच्या खोली समोरच होते. त्यावर अगदी उंच फांदीवर, एका पोपटाने थोडा खाल्लेला टप्पोरा पिवळसार पेरू दिसला होता. पोपटाने खाल्लेले पेरू म्हणे जास्तीच गोड असतात! त्यामुळे आता हा पेरू तर हवाच, अश्या नझरेने दोघांनी एकमेकांकडे पाहीले. अन् दुसर्या क्षणात, दोघही पेरूच्या झाडावर चढायला लागलोत. हळूच मागे वळून वर पाहिलं, तर असा बोध झाला की तो पेरू नेमका अप्पांच्या खिडकीसमोरच होता. झालं! तसाच अक्षयला खाली ओढून घेतलं आणि त्याला पण बहुदा कळून चुकल होत. पण, पेरू तर हवा होता ना....
मग अप्पा नक्की कुठे आहेत ते पाहायला, अक्षय, पाणी पिण्याच्या बहाण्याने, वर गेला. खूण म्हणून तोंडाने "टाक", (जीभ वरच्या दातांच्या मागे दुडपून, जोरात आवाज करत थोबाडाबाहेर ती काढली तर मोठा आवाज येतो, त्यालाच "टाक" म्हणतात.) असा आवाज करायच ठरलं. मी तो आवाज झाडावर मधल्या फांदींवर बसून ऐकायचा अन् पेरूकडे चाल करायची. ठरल्याप्रमाणे, अक्षय वर गेला, व्हरणड्यातून थेट अप्पांच्या खोलीत जायच्या ऐवजी, तिथून अलीकडच थांबला. त्याची काही हिंमत होईना पुढ जायची. त्याला तिथे असा पाहून आईने (आमची आज्जि) विचारले "काही हवंय का?". "पाणी", एवढाच काय तो शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडला. आई पाणी अणुस्तोवर भीतभीतच त्याने डोकावून पहिले, तर अप्पा नव्हते खोलीत. पाणी-बीणी विसरून त्याने "टाक" असा जोरात आवाज तिथेच काढला. मला ऐकू आल्या बरोबर मी पुढे वर पेरुच्या दिशेने पटापटा चढू लागलो. वेळ जाउ नये आणि फक्त पेरूच कडे बघत पुढ जात होतो. इकडे घरात "टाक" आवाज ऐकून अप्पा त्यांच्या खोलीकडे परत येत होते..........
झालं! आता आपात्कालीन स्थितीत काय करायचं, हे आम्ही ठरवल नव्हती. गोचा झाला. अक्षय तसाच खाली पळाला, मला सावध करायला. अन् इकडे मी आता पेरूच्या फांदीजवळ येऊन ठेपलो होतो. पेरूची फांदी पोपटाच वजन झेलेल इतकी नाजूक होती. हे माझ्या त्या पेरूच्या प्रेमात देखील लक्षात आले. बहुदा अप्पांच्या धाकाने त्या क्षणात मी थोडा अलर्ट राहिलो, अस म्हणायला हरकत नाही. अलगद जवळच्या फांदीवर गेलो आणि पेरू तोडायचा म्हणून हात पुढे केला. आता इंच इंच पेरू जवळ जाणारी माझी बोटं, पवलोपावली पळत झाडाजवळ येणारा अक्षय, आणि झपझप खोलीकडे येत असलेले अप्पांचे स्थिर चैतन्य, बहुदा एकाच वेळेस घडत होते हे सगळे...
आता माझी बोटं पेरूला शिवणार तितक्यात, खिडकीचा किरर्र आवाज ऐकू आला, आणि बोट होती तीथच फ्रीज़ झाली. मनातून पेरू केव्हाच उतरला होता. आता तो एव्हाना आतून किडला असेल, अश्या भावना जागृत होत होत्या. तशी खिडकी उघडायची थांबली. एक निश्वास सोडला आणि म्हटल फक्त वार्याच झूळुक लाडावत असेल खिडकीला. अस म्हणून परत बोटं पुढ सरकवली, तर काय, पेरू दर्शनाच्या ऐवजी, अप्पांच्या करकामाळावरील घड्याळ चमकले, आणि फ्रेम-बाइ-फ्रेम खिडकी बाहेर डूलकावणारी त्यांची तेजोमय प्रतिमा माझ्या अगदी चार-सहा फूटांवर मला लख्ख उन्हात चांदणे
दाखवणारी होती. अशी ही गोष्ट.
आमचे अप्पा, जितके शिस्त-प्रिय तितकेच ते प्रेमळही होते. म्हणजे ते आम्हा लहानग्यांना नेहमीच गोष्टी सांगत, अगदी जोक्स सूद्धा सांगायचे. लहानपणची त्यांच्याबद्दलची भीती ही त्यांच्या आमच्या मनातल्या आदरस्थानाची पुष्टीच होती की. त्यांच्या अश्या कित्येक आठवणी आहेत ज्या जीवनात आजही प्रेरणा देणार्या आहेत.