Sonali Gadikar

Others

1  

Sonali Gadikar

Others

माणुसकी

माणुसकी

3 mins
828


माणुसकी... माणसानी माणसासाठी दाखवलेली माणुसकी, जी आता हळूहळू लयास चालली आहे. माणूस प्रगत झाला, माणसांची जागा मशीननी घेतली पण त्यासोबत तो माणूसकी गमावून बसला. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती, आजी-आजोबा नातवंडांवर गोष्टींच्या माध्यमातून किंवा गाण्यातून कधी गोड बोलून तर लटकेच रागावून उत्तम संस्कार करायचे. नकळत जीवनातील मूल्य समजावून सांगायचे, माणूसकीचा धडा शिकवून जायचे. त्यामुळे ती पिढी ही प्रगल्भ झाली आणि माणसातील माणुसकीला जागली.


शेजारधर्म पाळणे, सुखदुःखात एकमेकांना आधार देणे, कधी आर्थिक तर कधी मानसिक सहाय्यता करणे, वेळ पडली तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरजवंताच्या उपयोगी पडणे, ही माणुसकी त्या पिढीतील तरुणांच्या मनावर बाल संस्कारातून रुजवली गेली होती. बरीचशी लोक चाळीत राहायची, आणि चाळ ही एका कुटुंबाप्रमाणे असायची, आणि खरंच जणू माणुसकीचा झरा स्वच्छंदपणे वाहताना दिसायचा.


माणसाचं घर लहान असले, पैसे जरी पोटापूरते असले तरीही माणसांची मनं मोठी होती, माणुसकी जीवंत होती. पण हल्लीच्या काळात आपण बघतो की, माणूसच माणसाचा वैरी होत चालला आहे. एकत्र कुटुंबपद्धती जवळपास बंद झाली आहे, घरातील मोठ्या आदरणीय व्यक्तींना वृद्धाश्रमाचा मार्ग इच्छा नसतानाही स्वीकारावा लागतोय. ज्या आई - वडिलांनी एक वेळेस उपाशी राहून मुलाला मोठे केलंय, त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, फक्त त्याच्या ओठावरील हास्य पाहण्यासाठी.. ते आई-वडील आज मुलाला जड झालेय. ज्यांनी हात धरून उभे राहायला शिकवले त्यांचा हात थकत्या काळात सोडून द्यायचा...?


कुठे गेली ती आपुलकी, तो दृढ विश्वास आणि ती माणुसकी... ते ऋण ती परतफेड...? कुठे हरवले ते सगळे...? बालपणी सतत जवळ असावी अशी ती आई आणि प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यासाठी हवे असणारे बाबा आज का नकोसे झालेय? त्यांच्या मुळे आपण आपल्या पायावर उभे आहोत, हे आपण आज विसरलो आहे.


मुक्या जनावरांवर दया करणे, भुकेल्या जीवाला अन्न व तहानलेल्या सजीवांना पाणी देणे, इतकी साधी माणुसकी दाखवणे सुद्धा कठीण झालंय या पिढीसाठी. आजही अति श्रीमंत लोकांच्या लग्नसमारंभात कितीतरी पटींनी अन्न वाया जाते तेच अन्न गरिबांना, ज्यांना खरंच त्याची गरज आहे त्यांना दिले तर त्या तृप्त झालेल्या आत्म्याचे आशीर्वाद मिळतील आपल्या मुलाबाळांना.


पूर्वीच्याकाळी पैसा कमी होता पण माणुसकी मात्र प्रत्येकामध्ये होती, माणुसकीने माणूस श्रीमंत होता. आलेल्या पाहुण्यांचे खुल्या मनाने स्वागत

व्हायचे, पाहुणचार केला जायचा, नात्यातील ओलावा, भावनांची देवाणघेवाण, प्रेमाचे चार शब्द, एकमेकांबद्दल ओढ असायची. पण या पिढीमध्ये यांतील काहीही दिसून येत नाही. विभक्त कुटुंबपद्धती, एक किंवा दोनच भावंड, अति श्रीमंत होण्याचा अट्टाहास, फ्लॅट पद्धती, मुलांना पुरेसा वेळ न देणे अशा एक ना अनेक कारणांमुळे आज माणुसकी ही धूसर होत चाललीय.


कुणाला कुणाची गरज नाहीय, प्रत्येकजण स्वावलंबी झालाय, घर तर पॉश झालंय निर्जीव वस्तूंमुळे पण ज्यामुळे घराची शोभा वाढेल असे आईवडील किंवा मोठे भाऊ-बहिणी मात्र दुरावले आहेत. त्यामधे भरीत भर या मोबाईल, टॅब किंवा कॉम्प्यूटर, लॅपटॉपच्या अति वापरामुळे घरात एकमेकांजवळ

असूनदेखील घरातील सदस्य संवादही करत नाही.


"दुरून डोंगर साजरा" या म्हणीप्रमाणे दुरूनच एकमेकांसोबत गोड राहतात... मनातील भावनांचे मूल्य हे कवडीमोल ठरले आहे. आजच्या या घोर कलियुगात माणूस माणसाला महत्व देत नाही कारण तो मशीनचा गुलाम झालाय. एक सेकंद जर मोबाईल नजरेआड झाला तर....? विचार करू शकत नाही आपण, बरोबर आहे न?


पण लक्षात असू द्या की नकळतपणे आपण आपल्या पुढच्या पिढीला अधू बनवतोय, त्यांची समाजिक वाढ खुंटतेय, त्या नव्या पिढीचे नुकसान आपण

अनावधानाने करतोय.  माणुसकी, जिव्हाळा, प्रेम, भावना, मदतीचे महत्त्व सामाजिकता, समानता, आदर, सन्मान, याचा दुरदूरपर्यंत अर्थ त्या भावी पिढीला कळणार नाहीये फक्त आपल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे....


म्हणून मला मनापासून असे वाटतंय की अजूनही वेळ गेली नाहीये, आजही मुलांकडे लक्ष दिले, योग्य  मार्गदर्शन केले तर येणारी पुढची पिढी नक्कीच

"माणूसकी" या शब्दाचे खरे महत्त्व समजून घेईल. आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्याचा उपयोग सर्वांसाठी मनापासून करेन.


Rate this content
Log in