Prafulla Mukkawar

Others

4.8  

Prafulla Mukkawar

Others

काही राहिलं तर नाही ना!

काही राहिलं तर नाही ना!

2 mins
482


जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो... 

“काही राहिलं तर नाही ना?”

वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाणाऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते 

“पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?” 

ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!


खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला 

“सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”

काय उत्तर द्यावे त्या म्हाताऱ्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”


लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते 

“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”

भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूममध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”


६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला  

“साहेब, काही राहिलं तर नाही ना?”

साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले की पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळंच इथे आहे मग “मागे काय राहणार” 


स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो 

“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”

तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. त्याला उमजेना की काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”

एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.


Rate this content
Log in