अंतर
अंतर


पाहुण्यांकडे लग्न होतं म्हणून घरी तयार होण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरु होती. तयार होऊन आमच्या गाडीने आम्ही सर्व निघालो. सकाळचे ८ वाजले होते तरीही रस्त्यावर धुर फेकणाऱ्या वाहनाची गर्दी होतीच होती शिवाय वाहनांचा कर्कश आवाज होता. आम्ही सर्व मंडळी लग्नस्थळी पोहोचलो. प्रशस्त अश्या प्रांगनामधे भव्य-दिव्य असा सेट लावला होता. फुलांनी सजवलेल्या दरवाज्यावर येणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर परफ्यूम लावून एक महागडे गिफ्ट लेमन सेट किवा टी सेट देत होते. तिथे चर्चा होती की मुलींकडच्या लोकानी नवरदेवाला घर, गाडी आणि भरपूर दागिने दिले होते. बाहेर मोठ्या आवाजात डीजे वर गानं सुरु होत.
“आज फिर पिने की तमन्ना है”
आणि सगळे मद्यधुंद नाचत होते.
लग्नानंतर गावाकडे जाण्याचा बेत होता म्हणून आम्ही सर्वजण निघालो. दरवर्षी सारखी या वेळेस सुद्धा खुप उन होती. कार मधला A.C. फुल ऑन केला. वाटेत मुलाना तहान लागेल म्हणुन पाणी विकत घेण्यासाठी थांबलो. पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन प्रवासाला निघालो.
प्रवासामधे रस्ताच्या दुतर्फा मोठमोठ्या बिल्डिंग दिसत होत्या. काही उच्च-शिक्षित लोक सिगरेट ओढत दुष्काळ आणि शेतकर्यांच्या आत्महत्या या विषयावर चर्चा करत होते.
दुपार झाली होती. मुलांना भूका लागल्या होत्या. गाडी एका हॉटेलजवळ थांबवली. काहींनी पिझ्झा, काहींनी बर्गर तर मी फ्रेंच फ्राईस मागवून खाल्ल्या. हॉटेलचे बिल देऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
काही वेळाने शहर सोडून गावाकडला परिसर दिसू लागला. चहूबाजूनी हिरवा शालू नेसलेल्या पर्वत रांगा, डौलणारी झाडे आणि शहारणारी हवा एक वेगळाच अनुभव देत होती. आम्हाला चहाची तलब आली म्हणून एका टपरीवर थांबलो. सगळ्यांनी चहा घेतला. आमच्या हिला प्रवासामुळे बर नव्हतं वाटत. तिथे बसची वाट बघत असणाऱ्या काही महिलांनी तिची विचारपूस केली आणि तिला लिंबू-सरबत दिले. टपरीवाल्या भाऊने रिकाम्या झालेल्या बाटल्या पैसे ना घेता पाण्याने भरून दिल्या.
थोड्या अंतराने आम्हाला गावाची कमान दिसली. कमानीवर आदर्श अश्या गावाचं नाव दिमाखाने कोरलं होते. आजूबाजूला शेतावर शेतकरी लावणीचे काम करत होते. बायका त्यांना मदत करत होत्या. पोरं निळ्या आभाळाखाली शाळेचा अभ्यास करत होती. गावच्या कडेने वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती. गावकरी पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते.
गावामध्ये सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम होता. आज संपूर्ण गावं सजवलेलं होत. वेशीपासून मंदिरापर्यंत रस्ते फुलांनी नटलेले होते. चोहीकडे वातावरणात एक वेगळाच सुगंध दरवळत होता. लग्नामध्ये उभ्या असलेल्या जोडप्याना संपूर्ण गावं आशीर्वाद द्यायला आलं होत. या कार्यक्रमाचा सर्व खर्च गावकरी मिळून करणार होते.
लग्नाचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही सगळ्यांनी गावं-भोजन घेतलं. खरंच ते अस्सल गावाकडचे महाराष्ट्रीय जेवण सुखद आनंद देणारं होत. रात्री गावाबाहेर असलेल्या शेताकडे फेरफटका मारण्यासाठी निघालो. सोबत आलेल्या ग्रामसेवकाने रेडीओ सुरु केला. त्यावर गाण सुरु होत.
“आज फिर जिने कि तमन्ना है”