Pooja Yadavrao Bhange

Others

4.8  

Pooja Yadavrao Bhange

Others

जीवन : एक संघर्ष

जीवन : एक संघर्ष

6 mins
4.3K


    वेळच असा आला, काय करावं? कुणाला सांगावं ? तेच कळत नव्हतं, अगोदरच परिस्थिती बेताची होती, तरीही आतापर्यंत 'गरीबी' या शब्दाचा अर्थच समजला नव्हता. म्हणूनच ही परिस्थिती आमच्या परिवारात निर्माण झाली असावी . खरंच वयस्कर माणसांचा जर विचार केला ना तर खूप दुःख वाटते मनातल्या मनात!

   माझे वडील यादव भनगे हे गावातच एका दुकानात गेल्या सहा ते सात वर्षांपासून नोकरी करतात प्रथम वर्षी म्हणजेच 2014 साली साठ हजार प्रति वर्ष इतका पगार होता. तेव्हा मी इयत्ता नववीत शिकत होते. माझ्या पाठचा भाऊ श्रीकांत सहावीत तर सर्वात लहान बहीण प्रतिक्षा इयत्ता तिसरीत शिकत होती. वडिलांनी कमावलेल्या पैशातच आमच्या परिवाराचे उदरनिर्वाह व्हायचा आणि तेवढ्यातच मच्या सार्‍या मूलभूत गरजा पूर्ण व्हायच्या. म्हणून एक आनंदी जीवन जगत होतो. माझ्या वडिलांचा स्वभाव , शिस्त , ईमानदारी व साधेपणा पाहून त्यांच्या मालकांनी जणू अगोदरच ठरवून घेतलं होतं की आता माझ्या वडिलांना तिथून निघून देणार नाहीत.

     असेच काही वर्ष आनंदित जात होते जमा सातवा वर्षे चालू होता तेव्हा वडिलांच्या पगारात एक लाख प्रतिवर्ष इतका वाढ झाला. आणि आम्ही भावंडं इकडं माध्यमिक वर्गाकडे वळलो. आई-वडिलांच्या मातृत्वाने आणि माझे गुरु सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या आशीर्वादाने मला गावातच 2018साली नेताजी सुभाष चंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल येथे नंबर लागला आणि माझी पुढे शिकण्याची इच्छा पूर्ण झाली. तो दिवस माझ्या जीवनातला अविस्मरणीय होता.

     आतापर्यंत सरकारी जिल्हा परिषद शाळेत शिकत असल्याने शाळेचा गणवेश पुस्तक व दुपारचे जेवण यांची व्यवस्था शासनाकडून होती, पण आता जीवनात खूप काही बदलून गेलं. मी आणि माझा भाऊ आता माध्यमिक शाळेत शिकू लागलो. म्हणून सर्व काही स्वतः विकत घेण्याजोगी दुसरा कोणता पर्यायच नव्हता.

     पहिल्या वर्षी नवीन असल्याने कॉलेजची फीस भरण्याची अडचण जाणवली नाही जात गेले तसतसे परिस्थिती बेताची होऊ लागली.कॉलेज म्हटलं की सर्वजण गणवेशात टाप-टीप राहणे, उशीर न होता वेळेवर येणे व दररोज क्लास करणे हा आमच्या कॉलेजचा नियम होता. या नियमात थोडस ही काही वेडेवाकडे दिसले की मग लगेच त्यांना गेटच्या बाहेर करण्यात येत होते.

     माझा कसाबसा एक वर्ष निघून गेला. पहिलाच वर्ष असल्यामुळे माझ्या अभ्यासाचा काहीच कसलाच ताळमेळ लागला नाही, खरं सांगावं तर मला अभ्यास करण्याची शैली व पद्धत तेव्हा समजले ,जेव्हा पहिल्या वर्षीचे पाच विषय बॅक असल्याचा धक्का बसला! वेळ तर निघून गेली होती.आता विचार करून पश्चातापाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

    दुसरा वर्ष सुरू झाला, तेव्हा काही सिनियर्स ताईंची ओळख झाली. त्यात स्वरूपा पाटील, प्रणया नरवाडे आणि स्वाती मुंडे या माझ्या बेस्ट ॲडव्हायझर होत्या. अभ्यासात काही अडथळा आला की लगेच त्यांना विचारायचं आणि त्याही माझ्या शंका पटकन दूर करायच्या.

इकडे माझी आई माझं स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून  राब - राब राबायची, आणि तिकडे वडील माझ्याकरिता दुसऱ्यांच्या दुकानात अतोनात कष्ट करायचे. हा दृश्य डोळ्यासमोर येताच डोळ्यांतील अश्रूधारा बाहेर पडतात. पण याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता मोठ्या माणसांचा आधार ही नव्हता म्हणून आमच्या आई-वडिलांच्या कष्टावरच आम्ही जगत होतो. त्यांचा विचार करताना मन भरून यायचं, पण आई-वडिलांना माझ्याबद्दलची काळजी व मला शिकवण्याची धडपड पाहून मनात एक वेगळीच जिद्द निर्माण व्हायची.

घरात सर्वात मोठी मुलगी मीच असल्यामुळे माझ्या शिक्षणाची काळजी आई-वडिलांनाच नव्हे तर लहान भाऊ बहिणींना पण वाटायची. पूर्ण शिक्षण गावातच झाल्यामुळे बाहेरील जग मला माहित नव्हतं, म्हणून घरात सगळे माझ्या बद्दलच विचार करत असत. माझी खूप काळजी करायचे.

माझा भाऊ सतत मला माझ्या कामात मदत करायचा. आणि मला आवश्यक असलेल्या वस्तू पेन, पेन्सिल ,वह्या व इतर वस्तू लगेच दुकानातून आणून द्यायचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'नोट्स'. त्या नोट्स आणण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा येर-झारा घालायचा , बहिण लहान असूनही मला घर कामात मदत करायची. घरातल्या कोणत्याही कामासाठी माझी वाट न पाहता सर्व कामे आटोपून मी कॉलेज वरून घरी येईपर्यंत गृहपाठ घेऊन बसायची. तिच्या या मदतीमुळे मलाही अभ्यासासाठी खूप वेळा भेटायचा. खरंच! मी खूप भाग्यवान आहे की अशा आई-वडिलांचा आशीर्वाद व भाऊ बहिणीचे प्रेम माझ्या पाठीशी आहे.

एका दिवशी असेच पॅथॉलॉजी चा पेपर चालू असताना अचानक, सर आले आणि परीक्षेचा फॉर्म व फीस दोन ते तीन दिवसात जमा करण्याचा आदेश देऊन निघून गेले.

   आता प्रश्न पडला होता की, परीक्षा फीस सोळाशे रुपये आणि माझे बेक असलेले पाच विषयाचे प्रत्येकी शंभर रुपये असे एकूण एकविसशे रुपये आणायचे तरी कुठून? घरात सद्यस्थिती तर बेताची होती, हे तरी मला माहीत होते म्हणून फीस बद्दल आई-वडिलांना काहीच सांगितलं नाही.

   दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या रस्त्यावरून चालत घरी येताना एक विचार मनात आला आणि थोडसं बरं वाटलं. पटापटा पाऊल पुढे टाकत घरी पोहोचले व पाठीवरील बॅग खाली ठेवली आणि भावाला ‌बद्दल सांगितलं. मग काय त्यांची साथ मिळाली की मग पुढे सगळं काही चांगलंच!

   आम्ही भावंड एकत्र आलो आणि काही महिन्यांपासून जमा करत असलेल्या पैशांनी भरलेला गल्ला जमिनीवर आदळला. जमिनीवर पडलेले पैसे एकत्र करून मोजायला सुरुवात केली. मग त्यात निघाले बाराशे रुपये. आता विचार होता फक्त 900 रुपयांचा. मी माझ्या बॅग मध्ये ठेवलेले रुपये पण काढून घेतलं, जे वडिलांनी तिकीटासाठी दिलेले होते पण कधीकधी मैत्रिणींसोबत चालत आल्यामुळे व कधी रिक्षा न मिळाल्यामुळे शिल्लक असलेले हे दोनशे रुपये. एवढ्यात भावानेही पटकन खोलीत जाऊन शंभर रुपये आणून मला दिले,विचारल्यावर हेच समजलं की जे नोट्स साठी दिलेले पैसे होते त्यातलेच काही शिल्लक असलेले पैसे त्याच्या कडे जमा होते. आणि इकडं लहान बहिणी ही खाऊ साठी ठेवलेले शंभर रुपये आणून दिले. अशाप्रकारे एकूण सोळाशे रुपये जमले. आता फक्त पाचशे रुपये हवे होते. तेवढ्यात रात्र झाली पण पण झोप काय येईना!फीस बद्दलची काळजी झोपू देत नव्हती. रुपयांच्या विचारातच कधी सकाळ झाली हेच समजलं नाही. पटकन जागे झालो आणि गोळा केलेली रक्कम पुन्हा मोजायला सुरुवात केली, मग काय चमत्कार झाला . अचानक 500 रुपयांची वाढ झाली. विश्वास होत नव्हता. आम्ही भावंडं चकित झालो. असे कसे होऊ शकते? पैसे मोजण्यात नक्की काहीतरी चूक झाली असावी, म्हणून पुन्हा मोजायला सुरुवात केली तरीही तेवढेच! हा चमत्कार झाला तरी कसा? आमच्याकडे तर सोळाशे रुपये जमा होते, मग मग त्या ठिकाणी अचानक एकवीसशे रुपये कसे झाले? ही जादू कशी झाली म्हणायची? कुणी केली ? नक्की परमेश्वरानेच आमची मदत केली असावी. असं वाटू लागलं. अशा अनेक प्रकारचे प्रश्नाने मनात गोंधळ निर्माण करत होता. पण नकळत आमच्या या धडपडी मागं आई-वडिलांचा पण आधार होता. हे तेव्हा लक्षात आलं जेव्हा आमचे आई-वडील आमच्याकडे कुतुहलाने पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळ्याच प्रकारचा आनंद उजळत होता, हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही.

   कसेबसे वेळेवर रुपयांची जोडणी झाली व वेळेच्या आत परीक्षेची फीस भरण्यात आली. काय मग घरी येत असताना हे लक्षात आले की जसे परमेश्वर या सृष्टीचा निर्माता आहे ना , तसेच प्रत्येक आई-वडील हे आपल्या मुलांचे भविष्य निर्माण करणारे जन्मदाते असतात. मुलांनी परिस्थिती जाणून आपल्या भावना व अडचणी मनातच ठेवला ना तरीही आपल्या मनातल्या वेदना भावना विचार हे सगळं समजून घेण्याची क्षमता व कला हे फक्त आपल्या आईवडिलांच्याच असतात. तशाच प्रकारे संकट समयी तेच लोक आधार देतात जे आपल्याला मनापासून प्रेम करतात. आणि आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त आपल्या बद्दल चांगले विचार करणारे कोणीच नसतात. म्हणून एकता व नम्रता या गोष्टींबद्दल विचार करायला हवा. माणसात एकता जर असली ना तर आणि एक दुःखांचे महासागर आपण पार करू शकतो.

अशा या सर्व गोष्टींचा विचार करत असताना मनात एक वेगळीच जिद्द व चिकाटी निर्माण झाली. मग काय, पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केलं आणि परीक्षेच्या तयारीत मन गुंतवल.

    पहिल्या वर्षी धक्का बसल्यामुळे दुसऱ्या वर्षी अभ्यास चांगला झाला होता. म्हणून पेपरची सोपे गेले. त्यामुळे रिझल्टची भीती पण वाटत नव्हती. परीक्षा तर आनंदात पार पाडल्या. पण दुसऱ्यांपेक्षा काहीतरी नवीन करायचं आणि आपल्या आई-वडिलांना आपल्यावर गर्व वाटला पाहिजे असं स्वाभिमानाने जगायला सुरुवात केली. स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की माझ्याही जीवनात अशी एक परिस्थिती येईल म्हणून, पण ते म्हणतात ना .'जो होता है वो अच्छे के लिये ही होता है'अगदी याप्रमाणेच माझ्या जीवनात ही परिस्थिती आली आणि जीवनात खूप काही शिकवून निघून गेली.

                           - लेखिका : पुजा यादवराव भनगे.


Rate this content
Log in