गुरू परब्रह्म
गुरू परब्रह्म
गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णू, गुरुर्रदेवो माहेश्वरा l
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरुवे नमः l
गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, काय सांगू महती, या जगात श्वास घ्यायला सुरवात केल्यापासून, किंवा कदाचित त्याच्याही पूर्वी पासून. खूप काही शिकलोय, अनुभव घेतलेत. आपल्या आयुष्यात आदर्श व्यक्ती असणे हेच मुळात भाग्याचे लक्षण, काही व्यक्ती आपल्या आयुष्यात नसत्या तर आपले आयुष्य, जगणे कसे असते हे ही सांगता येत नाही. जसं की आपले माता -पिता, आपल्या वर संस्कार करून योग्य अयोग्य हे ठरवण्याची कुवत निर्माण करणारे आपले गुरुवर, आणि आताचे शिक्षक, काळ बदलला, पण संदर्भ तेच. मनाला भावणारे, भिडणारे, आपलेसे वाटणारे, कधी कधी नकोसे वाटणारे पण तरीही महत्वाचे.
मला आता तारीख नक्की आठवत नाही पण
F. Y. B. Com. ची final Exam. सुरु झाली, पहिला पेपर अकाउंट्स चा होता, दुसऱ्या दिवशी चा पेपर संपवून घरी निघाले, घरापासून कॉलेज 2 किमी. लांब, त्या वेळी बस, रिक्षा अशी काही सोय न्हवती, कॉलेज ला जाण्यासाठी, आडवळणी रस्ता, ( आता तर कॉलेज पर्यंत घरे झालीत, आणि खूप गजबज ही आहे. )त्या वेळी आमच्याकडे, (स्टुडंट्स ) गाड्या जाऊ दया, सायकल सुद्धा नव्हत्या. दुपारची वेळ, ऊन डोक्यावर आलेलं, मी नऊ महिन्याची गरोदर, हळू हळू चालत होते, तेवढ्यात प्रा. सुनील झगडे सर गाडीवरून निघाले, मला म्हणाले बस गाडीवर तुला घरी सोडतो, आमचे घर गावातच गणपती मंदिराच्या मागे, त्या मुळे बहुतेक तिथूनच सगळ्यांचे जाणे येणे, मी सरांच्या मोटार सायकलवर मागे बसले, आणि गप्पा मारत निघालो, मन:शक्ती केंद्राच्या जवळपास आल्यानंतर मला अचानक डोळ्यासमोर अंधारी आली, चक्कर आली,( त्या वेळी खूप नाजूक होते ) आणि काही कळायच्या आत, काही सुचण्यापूर्वीच मी गाडीवरून खाली पडले, पण माझं नशीब चांगले मी पाठीवर पडले, आणि बेशुद्ध झाले. सरांनी मग मला घरी आणले, डॉक्टर बोलावले, आणि मला तब्बल 4-5 तासांनी शुद्ध आली. पहाते तर सगळे जण माझ्याभोवती बसलेले होते, आणि प्रचंड घाबरले होते, सरांना खूप अपराधी वाटत होते, त्यांची पत्नी ही सोबत होत्या, कॉलेजचे फ्रेंड्स, पण कुणी ही एकमेकांना दोष दिला नाही, सगळ्यांना फक्त माझी आणि माझ्या बाळाची काळजी. मी शुद्धीवर आल्यावर सगळ्यांना हायसे वाटू लागले, आणि मग दुसऱ्या दिवशी वडिलांनी माझ्यासाठी रिक्षा ठरवली कॉलेज पर्यंत जाण्या येण्यासाठी, परीक्षे च्या काळापर्यंत, पण रस्ता असा भयानक की डिलिव्हरी साठी हॉस्पिटल मध्ये जाण्याची गरजही लागली नसती, असे रिक्षाने येणे सुद्धा प्रचंड त्रासदायक होते. आमच्या कॉलेज चे प्राचार्य. सुरेशचंद्र म्हात्रे सर यांना माझी अवस्था समजली आणि त्यांनी माझी सोय आमच्या घराच्या जवळ असलेल्या शाळेत श्री. शिवाजी विद्यामंदिर चाकण, येथील प्राचार्याशी बोलून माझी परीक्षा संपेपर्यंत माझी सोय त्या शाळेत केली, उप प्राचार्या च्या केबिन मध्ये. सर स्वतः पेपर सुरु होण्यापूर्वी रोज यायचे, मला काही हवं नको ते विचारायचे, आणि मगच कॉलेज वर जायचे, एक प्राध्यापक , एक शिपाई, माझ्या सोबत असत. आणि अखेर माझी परीक्षा पार पडली. कोण काळजी घेत अशी !
पण प्रत्येक दिवशी मी जणू परीक्षाच देत होते, देवाचे आभार मानत होते, की निदान पाठीवर पडले म्हणून बरे, पोटावर पडले असते तर माझं आणि माझ्या बाळाचे काय झाले असते दिवस भरत आले होते, मी सारखी पोटाला हात लावून, बाळाची चाहूल घ्यायची, बाळ सुखरूप तर असेल ना, त्याला काही झाले तर नसेल ना, काही होणार तर नाही ना, काही व्यंग तर होणार नाही, असे अनेक प्रश्न मनाला भेडसावत होते, अस्वस्थ करत होते. खूप बेचैन होते. पण देवाच्या कृपेनें 10 -12 दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली, आणि सुंदर, निरोगी, आणि अगदी कापसा सारख्या मऊशार, cute बाळाची मी आई झाले, आणि माझ्या जीवात जीव आला. हा प्रसंग माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग, कारण जर चुकून काही अघटीत घडले असते तर आई म्हणून माझे असलेले अस्तित्व, माझ्या शिक्षणाची उर्मी, इच्छा, महत्वाकांक्षा काहीच उरले नसते, आज जी मी आहे ती कदाचित घडलेच नसते. अशाही परिस्थितीत परीक्षा देऊन मी वर्गातून पाहिली आले.
आपल्या विद्यार्थिनी ची आपल्या मुलीसारखी काळजी घेणे, तिला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणे, प्रेमळ, काळजी घेणे, यामुळे ते कायम माझ्या आई नंतर ते मला माझी माऊली च वाटले, मला कायम असं वाटते की ते माझ्या सरांच्या ऐवजी वडील म्हणून लाभले असते तर??..
असे म्हणतात ना मूर्ती पेक्षा कीर्ती महान,
F.Y.B.Com.ला 'चाकण शिक्षण मंडळाचे 'कला व वाणिज्य महाविद्यालय, ऍडमिशन घेतले तेव्हा कांबळे सर प्रभारी प्राचार्य होते, आणि नंतर आम्हाला अधिकृत प्राचार्य लाभले. प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. ते येण्या पूर्वीच त्यांची कीर्ती अगोदर पसरली आणि दरवळली होती. कडक शिस्तीचे, परखड, स्पष्ट वक्ते, प्रेमळ, प्रसंगी कठोर, पण कायम संवेदना जपणारे, संस्थे कडे प्राध्यापकांचे पगार देणे शक्य नाही तेव्हा त्यांना स्वतःच्या जवळचे पैसे देणारे, विद्यार्थ्यांना समजून घेणारे, अशी किती तरी रूपे पाहिलीत मी त्यांची, अगदी शालिनी तुला कधीही काहीही गरज लागली तर तू माझ्या कडे येऊ शकतेस असा विश्वास देणारे, माझ्या मुलीसारखी, हे घर तुझ्यासाठी कायम खुले आहे, आणि म्हणून सगळे जण मला त्यांची दत्तक मुलगीच समजायचे आणि मलाही त्याचे अप्रूपच होते. माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मला क्लार्क म्हणून कॉलेज मध्ये रुजू व्हायला सांगितले. जागा उपलब्ध नाही म्हणून पॅसेज मधे माझा टेबल लावण्यात आला, सरांनी पाहिल्यावर विचारले आणि माझा टेबल, कॉम्पुटर, आणि काही साहित्यासहित त्यांच्या म्हणजे प्राचार्यांच्या केबिन मधे लावण्यात आला.
त्यांच्याकडे सर्वच प्रकारचे लोक भेटायला यायचे राजकारणी, समाजकारणी, बुद्धिवान, विद्यार्थी, सल्ला घेणारे, असे बरेच. कधी कुणी म्हणाले की सर आम्हाला फक्त तुमच्याशीच बोलायचे आहे, तर मी खुणेनेच बाहेर जाऊ का म्हणून विचारायचे, पण सर त्यांना म्हणायचे की ती इथेच थांबेल, तुम्ही मोकळेपणाने बोलण्यास काहीही हरकत नाही, किती हा विश्वास !...
आमचे कॉलेज त्या वेळी विना अनुदानित होते त्या मुळे खूप कमी पगार मिळायचा, मला पुढे शिक्षण चालूच ठेवायचे होते, आणि कुणापुढे हात ही पसरायचा न्हवता, त्या मुळे मी कंपनी मधे काम करायचे ठरवले. सगळे प्राध्यापक म्हणाले अजूनही वेळ गेली नाही तू परत विचार कर, पण मी काहीशा ना खुषीनेच जाण्याचा विचार पक्कl केला. माझ्या आयुष्यातील हा चुकीचा निर्णय होता असे आजही मला वाटते. सर्वच प्राध्यापक आणि स्टाफ ने मला साश्रू नयनांनी निरोप दिला, मी जेव्हा सरांना भेटायला गेले तर त्यांचं ही मन भरून आले होते, आणि मी रडतच त्यांच्या गळ्यात पडले, मग त्यांनी मला सावरले. पण म्हणून आमच्यातले बंध कधीच संपले नाहीत जेव्हा कधी मन दुःखी होतं असे तेव्हा आई बरोबर आणि सरां बरोबर बोलले की बर वाटायचं.
माझ्या मुलाला अनिकेत ला त्यांच्या कडे बोलावून त्याला सायकल, कॉम्पुटर शिकवणारे, कायम काळजी घेणारे, पण तेवढेच करारी, हुशार, विद्वान, प्रचंड बुद्धिमान, असे असूनही आता (साधारण 76 वर्षे )असेल, अविवाहित असूनही कायम मायेचा पाझर, स्वतःच्या हाताने जेवण करून खाणार, एकदा मी त्यांना भेटायला गेले तर त्यांनी केलेलं स्वयंपाक, चिवडा मला खूप प्रेमाने खाऊ घातला, अशा व्यक्ती आयुष्यात येणे, आणि त्यामुळे आपले जीवन, विचार बदलणे, हे सुद्धा भाग्याचेच, 'शेतकरी संघटने 'ची धुरा मा. माजी खासदार शरद जोशी असतांना आणि नसतांनाही समर्थ पणे सांभाळणारे, पण कधी बडेजाव, मोठेपणा, देखावा, भंपकपणा याचा अजिबात लवलेश नाही कोणत्याही विषयावर अतिशय गहन, खोलवर विचार करून बोलणे, खूप लोक केवळ त्यांच्याशी बोलण्यासाठी, ऐकण्या साठी धडपडायचे, काहींना ते काय म्हणतात हेच कळत न्हवते . खूप खूप विश्वास ठेवला त्यांनी आमच्यावर, त्या वेळच्या तीन चार बॅच च्या विद्यार्थ्यांना यांना हा अनुभव नक्कीच आला असणार, आणि आम्ही सगळे खरंच भाग्यवान आहोत.
त्या मुळेच कदाचित मला या पेशाकडे यावेसे वाटले असावे, त्या मुळेच मलाही प्राध्यापिका व्हावेसे वाटले असावे......... त्यांच्या विचारांचा फार पगडा आहे माझ्यावर, पण मला वाईट एकाच गोष्टीच वाटतंय की मी त्यांच्या कसोटीला पूर्ण उतरलेय का? मला त्यांच्याकडून काही घेता आले का? मला त्यांच्या साठी जे काही करावेसे वाटले ते मी अजूनही केलेच नाही.......मी माझ्याच विश्वात गुंतलेय. हा विचार कायमच मला त्रास देतोय.....
आणि खरंच अशा व्यक्तीमुळेच आयुष्याचे नंदनवन होते, सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्व ! त्यांच्या काळात त्यांनी खूप प्रोत्साहन दिले, खूप स्पर्धामध्ये भाग घेता आला, कुणाला आमच्या कॉलेज चे नाव ही माहीत नाही, छोटे कॉलेज आहे, आपल्याला जिंकण्याची संधीच नाही अशी अवस्था असतांना त्यांनी आम्हाला प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊ दिले. आम्हाला आमच्यातले गुण ओळखण्याची संधी दिली, आमची ( batch )टीम ही खूप छान होती, आम्ही स्थानिक, आंतर महाविद्यालय, राज्य, आणि राष्टीय पातळीवर ही खूप बक्षिसे मिळवली, मी माझं छोटं बाळ सांभाळत या तीन वर्षाच्या काळात 35 च्या जवळपास बक्षिसे मिळवली . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला 'आदर्श विद्यार्थिनी' म्हणून गौरवलं गेलं. आणि एकदा तर कॉलेज मध्ये माझ्या हस्ते ध्वजारोहण झाले. हा माझ्यासाठी खरंच खूप भाग्याचा, आणि आनंदाचा क्षण !
प्राथमिक शाळेतील राऊत गुरुजी, माध्यमिक शाळेतील अभ्यंकर मॅडम, लोणकर सर, कॉलेज मधील गोरे सर, शेवकरी सर, मावकर सर, जे पुढे जाऊन माझे सहकारी ही झाले, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शाखांमधील माझे सहकारी, मित्र मैत्रिणी, माझी आई, जी माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट, चूक, बरोबर अशा सगळ्या वेळी सोबत होती आणि आहे, आणि महत्वाचे म्हणजे माझे विद्यार्थी. आयुष्यातल्या त्या सगळ्या महत्वाच्या क्षणी मी ज्यांच्याकडून काही शिकले, जगणे शिकले, आणि ती प्रत्येक व्यक्ती जिने मला नामोहरम करण्यासाठी, विरोधात जाण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी, मला हरवण्याचा या साठी, जाणीवपूर्वक प्रयत्न केले, त्यांचीही आभार, कारण त्याशिवाय मला माझ्यातल्या पूर्णत्वाला आकार प्राप्त झाला नसता, माझी प्रगती होऊ शकली नसती, या सृष्टी तील त्या सर्व मूर्त अमूर्त जाणिवांचे आभार, जीवन जगताना मला जगवलं.
माझ्या कॉलेज मधील बरेचसे मित्र मैत्रिणी fb वर फ्रेंड्स आहेत, त्यांनी ही त्यांचे अनुभव comment मधे सांगावे, फोटो असतील तर ते ही share करावे, माझे विद्यार्थी ही आहेत ( फार विद्यार्थ्यांना add kele नाही )तुम्ही ही अनुभव सांगू शकता. या सगळ्यांची मी फक्त ऋणी राहीन.
माझ्या घराच्या वास्तुशांतीला सर आवर्जून उपस्थित होते. तो फोटो मी शेअर केलाय. आणि दुसरा फोटो मी त्यांना मागितला तर viral करायचे नाही असे सांगून त्यांनी दिला. पण मी हट्ट केला. आणि त्यामुळे त्यांनी मान्य केले.
कुंभारासारखा गुरु नाही रे जगात
वर घालतो धपाटा, खाली आधाराला हात.
