गुंफले प्रेमाचे धागे
गुंफले प्रेमाचे धागे
“हॅलो अनुप, मी मुंबईहून पांडे काका बोलतो आहे.”
“नमस्कार. काय म्हणता,काका?”
“अरे, राहुल आजकाल घराबाहेर निघतच नाही. काही दिवसांपूर्वी भेटला होता. तेव्हा तो सध्या स्वयंपाकीण येत नाही, असं म्हणाला. हार्टचं दुखणंपण आलं आहे”, काकांनी सांगितलं.
पांडे काकांच्या फोनने अनुप काळजीत पडला. मम्मा गेल्यानंतर पप्पा एकटे राहत होते. ते ब्रिगेडियर म्हणून निवृत्त झाले होते. तेव्हा त्यांचा अर्दली आणि कुक होता व त्यामुळे त्यांना काम करायची सवय नव्हती. हार्टचं दुखणं म्हणजे वेळेवर औषधपाणी घ्यायला हवं. काही पथ्यं असतील.त्यांची स्वयंपाकाची बाई, इतर सर्व कामंही सांभाळून घेत होत्या. पप्पांनी घराबाहेर निघणं जणू बंद केलं होतं आणि बेल वाजवली तरी ते दार उघडत नव्हते. अनुप हैदराबादला राहत होता. वडील रागावल्यामुळे त्याच्याशी क्वचितच बोलायचे. अनुजाशी (अनुपची लहान बहीण) त्यांचे नियमित बोलणं होत असायचं. त्या रात्री अनुपने पप्पांना फोन केला. त्यांनी फोन घेतला नाही. अनुपने त्यांना संदेशही पाठवला. महत्वाचं बोलायचं आहे, हे कळविलं. नंतर त्याने अनुजाला फोन केला. पप्पांचा अनुजावर खूप जीव होता व ते तिच्याशी नियमित बोलायचे. ती लंडनला राहात असल्यामुळे त्यांना सांभाळू शकत नव्हती. अनुपने तिला पांडे काकांच्या फोनबद्दल सांगितलं व पप्पांशी लगेच बोलायला सांगितलं.
अनुप नंतर खूप वेळ शून्यात नजर लावून बसला. ग्रेस त्याची अस्वस्थता व बेचैनी पहात होती. ती त्याच्या जवळ जाऊन बसली. तिने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला व शांतपणे बसून राहिली. थोड्या वेळाने अनुपने स्वतःहून तिला सांगितलं,
“अग, पप्पांना दोन- तीन महिन्यांपासून हार्टचा आजार आहे. पांडे काकांनी सांगितलं की कलाबाई, म्हणजे स्वयंपाक व इतर काम करणारी बाई, येत नाही. पप्पांना किचनचं काम येत नाही. पप्पा घराबाहेर निघत नाही. ते एकटे पडले आहे. पप्पा माझा फोन घेत नाही. ग्रेस, काळजीनं मला काही सुचत नाही.”
“अनुप, रात्र खूप झाली आहे. झोप आता. उद्या सकाळी लवकर परत प्रयत्न कर”, ग्रेसने समजाविलं.
अनुप अस्वस्थ झाला होता आणि रात्री झोपू शकला नाही. लगेच मुंबईला जाऊन त्यांना भेटावं व स्वतःच्या घरी आणावं असं त्याला वाटत होतं…अनुप आणि त्याचे पप्पा दुरावले होते. अनुपच्या लग्नामुळे ते व मम्मी दुखावल्या गेले होते. मम्मा गेल्यावर तीन दिवसातच अनुप व ग्रेस मुंबईहून परतले होते. अनुपच्या आदी- अहानला पाहायला आजी- आजोबा आले नव्हते आणि आजी गेल्यावरही अनुपने मुलांना मुंबईला नेले नव्हते. ग्रेसला या गोष्टी अनेकदा खटकल्या होत्या, पण अनुपने स्वतःहून सांगितलं पाहिजे, असं तिला वाटत होतं. सकाळी अनुपचा फोन परत अनुत्तरितच राहिला. त्याचा पडलेला चेहरा पाहून ग्रेसने शेवटी त्याला कारण विचारलं.
अनुप म्हणाला, “माझी चूक आहे. मी तुला आधी सांगायला पाहिजे होतं. पप्पा आर्मीत ब्रिगेडियर होते, हे तुला माहिती आहे. त्यांचं माझ्यावर जितकं प्रेम होतं, तितक्याच अपेक्षाही होत्या. त्यांना मी आर्मीत जावं, असं वाटत होतं. पण मला कॉर्पोरेट क्षेत्राची ओढ होती. मी कायद्याचं शिक्षण घेऊन पुढे मॅनेजमेंट मध्ये गेलो. तिथेच मी पप्पांची नाराजी ओढवून घेतली. नंतर मी मम्मीने पसंत केलेल्या मुलीशी लग्न न करता, त्यांच्या इच्छेविरुद्ध, तुझ्याशी प्रेम विवाह केला. त्यांना तुझ्या धर्माशी काही देणं -घेणं नव्हतं. पण मम्माला मी दुखवलं हे त्यांना खपलं नाही आणि तेव्हापासून त्यांनी मला जे दूर केलं ते जणू काही कायमचं. आपल्या आदी- अहानला सुद्धा भेटायला ते कधी आले नाही.”
“अरे पण मम्मा गेल्यावर तर आपण गेलो होतो ना?”, ग्रेसने विचारलं.
“हो, मी मोठा मुलगा असल्यामुळे तिला मी अग्नी द्यावा हे तिने बोलून दाखविलं होतं. पप्पांना ते माहीत असल्यामुळे आपण गेलो. त्यांनी मला ‘तिसऱ्या दिवशी परत जा’ असं स्पष्ट सांगितलं. त्यावेळी अनुजा पोचणारच होती म्हणून आपण परतलो.”
अनुप त्यावेळी खूप उदास झाला होता. मम्मा गेल्यामुळे तो दुःखी असावा असं ग्रेसला वाटलं होतं. पण अनुपला पप्पा असं वागतील याचा अंदाज होता. ते आर्मीत कठोरपणाकरिता व शिस्तप्रिय स्वभावामुळे प्रसिद्ध होते. चुकांना माफ करणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. मुलांना आजोबांच्या या स्वभावाची झळ पोचू नये, म्हणून अनुपने त्यांना न नेण्याचा निर्णय घेतला होता. त्या तीन दिवसात, अनुपने ग्रेसला एक क्षणही त्यांच्यासोबत एकटं सोडलं नाही. मम्माच्या अकस्मात जाण्याने ते खूप बिथरले होते. त्यांना देवाचा, अनुपचा, परिस्थितीचा आणि नशिबाचा राग होता. ग्रेसबद्दल त्यांच्या मनात पहिलेच राग होता, म्हणून त्याने काळजी बाळगली.
सकाळी लवकर उठून अनुपने पहिला फोन पप्पांनाच केला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो घेतला नाही. त्याचा संदेश त्यांनी वाचला होता, पण उत्तर दिले नव्हते. त्याने अनुजाला लगेच फोन केला. तिचे पप्पांशी बोलणं झालं होतं. ते ठीक होते. त्यांच्या बाईने अचानक येणं बंद केले,असं ते म्हणत होते व दुसरी बाई लावणं त्यांना जमत नव्हते.
“अनुप, त्यांचं ब्लडप्रेशर वाढलं आहे. हार्ट प्रॉब्लेम आहे. या दोन्ही आजारात पथ्यं सांभाळावी लागतात. मम्माला जाऊन आठ महिने होतात आहे व त्यात हा ओढावलेला एकटेपणा. मी त्यांना ड्रिंक सोडायला म्हणते, तर ते ‘हो- हो’ म्हणतात. अनुप, तू काहीतरी कर ना. मला अगतिक वाटतं”, ती म्हणाली.
अनुप म्हणाला, “अनु, माझ्या मनात हेच विचार रात्रभर थैमान घालत होते. ते मला जवळ येऊ देत नाही म्हणून ग…पण आता डोक्यावरून पाणी गेलं. मी नक्की काहीतरी मार्ग काढतो.”
चहा घेताना ग्रेस म्हणाली, “मी मुंबईला जायचा विचार करते आहे.”
“काय?” तो ताडकन म्हणाला.
“तुझ्यासारखीच मी रात्रभर विचार करत होते. मला हा एकच उपाय दिसतो आहे”, ग्रेस म्हणाली.
अनुप पार गोंधळून गेला.स्वतःला सावरत तो तिला म्हणाला,
“अग, तू त्यांना आवडत नाही. कशाला उगाच ‘ आ बैल मुझे मार’ करते?”
ग्रेसला तो राग नाही, पण नाराजी असावी, असं वाटतं होतं. पप्पा तिला ओळखत नव्हते. अनुपला हा निर्णय मान्य नव्हता. ग्रेसला पप्पांच्या आवडीनिवडी, स्वभाव आणि सवयींची मुळीच माहिती नव्हती. ग्रेसचे उत्तर एकदम सोपे होते.
“ते इथे येणार नाही.तू तिथे जाऊ शकत नाही. राहता राहिले मी. जाऊ दे रे मला. मी त्यांचं बस्तान बसवून येते. एकदा त्या घराची घडी नीट बसली की मी परत येते.”
तिने बिनपगारी रजा घ्यायचं ठरविलं. आदी-अहान स्वतःचे सर्व करायचे. सुधामावशी स्वयंपाकघर सांभाळून घ्यायच्या. अनुपला घराकडे लक्ष द्यावं लागणार होतं. पप्पांना न सांगताच जायचं, असं तिने ठरवलं, कारण मग कदाचित त्यांनी मनाई केली असती. पप्पा आणि अनुजा दोघांनाही सांगु नको, ही सूचना तिने अनुपला दिली आणि दुसऱ्या दिवशीच जायचं ठरवलं. मुलांना तिने सर्व समजावून सांगितलं आणि पटकन बॅग भरून घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या विमानाने ग्रेस मुंबईला पोचली. पप्पा सांताक्रुझला राहात असल्यामुळे ती पटकन घरी पोचली. तिने बेल वाजवली. दुसऱ्यांदा बेल वाजवल्यानंतर पप्पांनी दार उघडलं.
त्यांनी विचारलं, “कोण पाहिजे?”
“पप्पा, गुडमॅार्निंग. मी ग्रेस. ओळखलं ना?” तिने विचारलं.
“कोण ग्रेस? आपण भेटलो आहे का? नाव ओळखीचं…”, ते स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे म्हणाले.
“पप्पा, फक्त नाव ओळखीचं नाही, तर आपलं नातं आहे. मी ग्रेस- अनुपची पत्नी.”
त्यांनी तिला खरंच ओळखलं नव्हतं, की ते नाटक करत होते, कळायला मार्ग नव्हता. सर्व सकारात्मकतेनं घ्यायचं हे ती ठरवून आली होती.
“ओह, ग्रेस? आता लक्षात आलं. कसं येणं केलं? काही कार्यक्रम वगैरे?” त्यांनी चौकशी केली.
“मुळीच नाही. मी खास तुमच्या सोबत राहायला आली आहे”, ती उत्साहात म्हणाली.
“व्हॅाट? मला कोणाची गरज नाही. अनुपने तुला पाठवलं असेल. तो तर…”, ते रागानं म्हणाले.
ग्रेसने, ती अनुपच्या मनाविरूध्द त्यांच्यासोबत राहायला आली, हे त्यांना सांगितलं. नाईलाजाने त्यांनी तिने तीन-चार दिवसात निघून जावं, हे निक्षून सांगितलं.
स्वागत तर थंडच झालं होतं, पण ग्रेस हताश झाली नाही. हातपाय धुवून ती स्वयंपाकघरात गेली. तिने घरात असलेल्या थोड्या दूधात चहा व सोबत उपमा केला. पप्पा साधा उपमा आवडत नाही म्हणून नाराज झाले. फ्रीज व इतर डबेपण रिकामेच होते. तिने सर्व सामानाची यादी केली व जवळच्या सुपरस्टोरला नंबर शोधून पाठवली. तो फ्लॅटपण स्वच्छ करायची गरज होती. पण हाताशी कोणी नव्हते. तिने पांडे काकांना फोन करून बाईची व्यवस्था करून द्यायची विनंती केली. ग्रेस तिथे राहणार, हे ऐकून पांडे काकांना आनंद झाला व त्यांनी मदत करण्याचं कबूल केलं.
सामान येईपर्यंत तिने आंघोळ केली. देवघर स्वच्छ केलं व पूजा केली. तेवढ्यात सामान आले. ते घेऊन स्वयंपाकाला सुरवात केली. अनुप मम्मा कसा साग्रसंगीत स्वयंपाक करायची, हे सांगायचा. तिने साधा व सुटसुटीत स्वयंपाक केला. तिने मग पप्पांना जेवायला हाक मारली. तिच्या हाकांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे, तिने त्यांच्या बेडरूमच्या दारावर टकटक केली. त्यांचं काही उत्तर आलं नाही. तिने आत प्रवेश केला. ते बसल्या बसल्या झोपून गेले होते. तिने हळूच हलवून त्यांना उठवलं व विचारलं,
“पप्पा, सॅारी. जेवायला येता ना?”
“जेवण? कोणी स्वयंपाक केला?” त्यांनी गोंधळून विचारलं.
“पप्पा, मला खूप काही येत नाही. पण मी केला. येता ना तुम्ही?” ती विनंतीवजा स्वरात म्हणाली.
“अग, मी शाकाहारी आहे. भलतं खात नाही”, त्यांनी सांगितलं.
“मला माहिती आहे व मी पण शाकाहारीच आहे”, तिने माहिती दिली.
“आलोच मी.”
त्यांना बाहेर आल्याबरोबर उदबत्तीचा सुवास जाणवला. त्यांनी देवघराकडे नजर टाकली. तेवत असलेले दिवे व उदबत्ती पाहून त्यांना निमाची आठवण झाली.
“तू पूजा केली का?”
“हो पप्पा, का?”
“तू वेगळ्या धर्माची आहे ना? पण ठीक आहे.”
“आज किती दिवसांनी घरात पूजा झाली”, ते स्वतःलाच म्हणाले.
पहिले ते एकटेच जेवत होते व ग्रेस त्यांना वाढत होती. मग पप्पांनी तिला जेवायला बसायला सांगितलं. जेवताना काही संवाद झाला नाही. तिने त्यांना पाणी दिलं आणि जेवणानंतरच्या ओषधांची चौकशी केली.
“औषधं संपली आहे. मी पाहीन काय करायचं ते”, ते म्हणाले.
ग्रेसने त्यांना ओषध घ्यायला जाऊ या का विचारलं व त्या निमित्ताने तिला काही औषधं घेऊन मार्केट कुठे आहे हे कळलं असतं,असं ती म्हणाली. त्यांनी तिला मार्केट पाहून काय करायचं, हा प्रश्न विचारला व तिला लगेच परतावं लागेल, याची आठवण करून दिली. पण जाण्याआधी थोडेफार आजूबाजूचं पाहण्याची इच्छा तिने व्यक्त केली. त्यांनी चार वाजताची वेळ मार्केटला जायला ठरवली आणि तिने हा निरोप पांडे काकांना दिला. ते औषधाच्या दुकानात असताना पांडे काका तिथे आले. पांडे काका पप्पांशी बोलू लागले.
“पप्पा, तुम्ही बोला. ती फाईल मला द्या. मी औषधं घेते”, ग्रेस म्हणाली.
अगदी सहज तिने त्यांच्या हातातील फाईल घेतली. डॉक्टरांचे नाव व पत्ता पाहिला. औषधं विकत घेतली. त्यांचं बिल स्वतःकडे ठेवलं.
“अरे या कोण? अनुजा …”, पांडे काकांनी विचारलं.
“नमस्कार काका. मी ग्रेस, अनुपची पत्नी.”
“अरे वा, वहिनी गेल्या तेव्हा ओझरतं पाहिलं होतं. मी पांडे काका.”
ओळख झाल्यावर, सहज ग्रेसने त्यांना व पप्पांच्या जवळच्या दोन- तीन मित्रांना सकाळी नाश्ता करायला बोलावलं. पप्पांना ते पटलं नाही. पण ग्रेसने त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करून आमंत्रण दिलं.
पप्पा मान नकारार्थी हलवत असताना ग्रेस आनंदाने म्हणाली, “काका, ठरल तर मग. साडेआठला मी वाट पाहते.”
औषधं घेण्याची युक्ती फायदेशीर ठरली. ग्रेसने काउंटरवर उभी असताना मेडिकल रेकॉर्डचे फोटो काढून घेतले. आता औषधांची नावं व वेळा तिच्याकडे होत्या. दुसरे म्हणजे पप्पांच्या मित्रांना भेटता येणार होते.
संध्याकाळी घरी आल्यावर पप्पा तिला खूप रागवले. त्यांचा तो राग पाहून ती घाबरून गेली. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . तिने रडतच ‘सॉरी’ म्हटलं व पांडे काकांना येऊ नका कळवते, असं म्हणाली. त्यांनी तिला मूर्खपणा करू नको, असं सांगितलं आणि निमा छान तयारी करायची अशी टिप्पणी केली. पण काय करावं हे सांगितलं नाही. डोळ्यातील पाणी पुसत व स्वतःला सावरत ती कामाला लागली. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास बेल वाजली. पांडे काकांनी एका बाईला पाठवले होते.
त्या आशाबाई होत्या. ती आशाबाईंना कामाचे स्वरूप समजावून सांगू लागली. तिने त्यांना ती पाहुणी आहे, हे स्पष्ट केलं. सासरे एकटे राहतात व बाईंना घर सांभाळावं लागेल, स्वच्छता, दूध, किराणा, भाजीपाला, औषधपाणी आणि त्यांची पथ्यं पाळावी लागतील, हे सांगितलं.
“मॅडम, मी इथे काम केलं आहे” ,आशाबाई म्हणाल्या.
अनुपच्या मम्मासोबत त्यांनी काम केलं होतं. मम्मा गेल्या आणि पप्पांनी आशाबाईंना येऊ नका सांगितलं. मम्मांसोबत आशाबाई दिवसभर कामाला असायच्या. त्यामुळे त्यांना घरकामाची कल्पना होती. ग्रेसने त्यांना फक्त मसाले, मीठ, तेल आणि तूप कमी टाकायला सांगितलं. पण त्यांना ‘सर’ कसं वागतील याची शंका वाटत होती, कारण त्या सतत निमा मॅडम सोबत असायच्या. ग्रेसने त्यांना विनंती करून या, असं सांगितलं. फक्त आशाबाईंना पप्पांच्या आवडीनिवडी आणि खाण्याच्या वेळा माहिती होत्या. मग पगार आणि कामाची वेळ त्यांनी ठरवली. ग्रेसने त्यांना तिला ‘मॅडम’ म्हणायला मनाई केली आणि आशाबाईंना ती मावशी म्हणू लागली. आशा मावशींच्या येण्यामुळे ग्रेसचा मूड बदलला. त्या रात्रीचा स्वयंपाक करूनच घरी गेल्या. जाण्यापूर्वी ग्रेसने त्यांना उद्या सकाळी नाश्त्याला पाहुणे राहणार आहे, हे सांगितलं. मम्मांनी त्यांचा पाहुणचार कसा केला असता, हे जाणून घेतलं.
आशामावशींनी सकाळी लवकर येऊन, साफसफाई करून, छान गरमागरम नाश्ता आणि फक्कड चहा करून देण्याचं आश्वासन दिलं. रात्री ती पप्पांना जेवायला बोलवायला गेली, तेव्हा ते ड्रिंक घेत होते. ग्रेसने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, त्या वेळी, त्यांच्यासोबत गप्पा मारायचं ठरवलं. ते किती ड्रिंक घेतात, हे तिला कळणं आवश्यक होतं. जेवताना त्यांनी स्वयंपाक कोणी केला विचारलं. नवीन बाई म्हटल्यावर, त्यांनी ग्रेस गेल्यावर, घरात कोणी कामाला नको, हे बजावलं. रात्री तिने त्यांना टेबलावर औषध दिली व मुद्दाम मुलांना व्हिडिओ कॉल केला. मुलांशी जुजबी बोलून तिने मुलांना आजोबा दिसतील व आजोबांना मुलं अशी जागा घेतली. मुलांशी बोलून तिने त्यांना आबांची ओळख करून दिली. मुलांनी त्यांना नमस्कार करून स्वतःची ओळख करून दिली व मग आबांना मुलांशी संवाद साधावाच लागला.
“हॅलो बेटा, कोणत्या वर्गात आहात तुम्ही दोघं?”
“आबा, मी आदी पाचवीत आणि अहान तिसरीत आहे.”
“तुम्ही खूप लहान आहात. मम्माशिवाय कसे राहता?” त्यांनी विचारलं.
“आबा”, अहान म्हणाला, “आम्हाला कामं करायची सवय आहे व बाबा आहेत ना? आईला तुम्हाला भेटायचं होतं, म्हणून ती तिथे आली.”
“असं का?” ते म्हणाले.
“आबा, आमच्या आईला आई -बाबा नाही. तिला त्यांची खूप आठवण येते, म्हणून ती तुम्हाला भेटायला आली”, आदी बोलत होता.
मग तिने विषय बदलला आणि उशीर झाला म्हणून झोपायला जा, असं सांगितलं. पप्पांना रात्रीकरिता पाणी दिलं आणि मग तिने अनुपला स्वतःच्या खोलीतून फोन करून सर्व बातम्या दिल्या आणि तिच्या हातात औषधं आणि डॉक्टरांचं नाव आलं, हे कळवलं.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून ग्रेस कामाला लागली. मफिन्सची तयारी करून, ते ओव्हन मध्ये ठेवले. तोपर्यंत साडेसहा वाजले होते. घरभर मफिन्सचा सुवास दरवळत होता. पप्पा रूम मधून बाहेर येत उत्स्फूर्तपणे म्हणाले,
“ निमा गेल्यावर पहिल्यांदाच घरात बेकिंगचा सुवास दरवळतो आहे. मस्त…”
मग त्यांची नजर ग्रेसकडे गेली व ते चूप बसले. त्यांना चहा व बिस्कीट देऊन, ती तयार व्हायला गेली.
ती तयार होऊन बाहेर आली, तेव्हा आशा मावशींची हॉलची साफसफाई आटोपली होती. त्यांनी इडल्या कुकरमध्ये लावल्या होत्या. इडल्या, चटणी, सांबार, गरम बटाटेवडे, सँडविच, मफिन्स, फ्रेश ज्यूस व शेवटी चहा किंवा कॉफी…
त्या दिवशी पांडे काकांनी नाश्ता करताना सुनबाईंची पाठ थोपटली,
“बेटा, वहिनींच्या पद्धतीने किंवा त्याहून सरस सर्व पदार्थ केले. राजेशाही नाश्ता झाला. आमचे पोटोबा व आम्ही तृप्त. अन्नदाता सुखी भव”.
“मी आहे तोवर असेच येत रहा”, ग्रेसने निमंत्रण देऊन टाकलं.
“राहुल, तू नाव ठेवत होता, ती ख्रिश्चन सुनबाई हीच का?” प्रकाश काकांनी नको तो प्रश्न विचारला.
ग्रेस हसून म्हणाली, “हो काका. मी ख्रिश्चन आहे. माझे वडील ख्रिश्चन होते व आई हिंदू होती.”
“होती म्हणजे?” पांडे काकांनी विचारलं.
“माझ्या लग्नापूर्वीच एका अपघातात आई व डॅड गेले”, तिने सांगितलं.
“अरेरे”, पांडे काका हळहळले, “पण तू आल्यामुळे या घराला घरपण आलं. बघ ना, आज राहुलने पूजाही केली आहे.”
“पूजा व मी?” पप्पा ओरडले, “निमाला देवाने अकस्मात नेलं व मी त्या देवाची पूजा करू? या मुलीने पूजा केली.”
ग्रेसची आई रोज पूजा करायची. तिला म्हणून मराठी पूजा, सणवार आणि स्वयंपाक करता येत होता. प्रकाश आणि आनंद काकांना सूनबाईंचे कौतुक वाटले. ग्रेसने मग त्यांना आदी आणि अहानचे फोटो दाखवले. त्यांनी मुलांचे कौतुक केले. मित्र गेल्यावर पप्पा खूप आनंदात होते.
“आज थोडं उशीरा जेवू”, असं त्यांनी आशाताईंना सांगितलं. मध्ये भरपूर वेळ होता, म्हणून आशाताईंना स्वयंपाकाच्या सूचना देऊन, ग्रेस डॅाक्टरांना भेटून आली. त्यांचे पथ्यं, औषधं, पुढे कोणत्या चाचण्या केव्हा करायच्या, हे समजून घेतलं. तिचं एक मोठं काम पूर्ण झालं होतं.
दुपारी जेवणानंतर तिने त्यांना औषधं दिली व मग नंतरची आवराआवर करताना मुद्दाम मम्मांचा विषय काढला. पप्पा हॅालमध्येच बसले होते. ग्रेसने मावशींना मम्मांबद्दल विचारले. मावशींनी त्यांच्या सुंदरतेची तारीफ केली व त्यांना घरही नीटनेटके ठेवायला आवडायचे,हे सांगितलं. ग्रेसने पप्पांना मम्मांच्या साड्या, इतर वस्तू आणि फोटो पाहता येतील का विचारलं. त्यांनी मम्मांना ती सून म्हणून मान्य नव्हती व अनुपने तिच्या मनाविरूध्द लग्न केले होते, हे सांगितले. ग्रेसने शांतपणे तिची व मम्मांची भेट झाली असती, तर कदाचित त्यांना ती आवडली असते, हे सूचवलं. देवाने तिला ती संधी दिली नाही, याची खंत व्यक्त केली.
“देवाबद्दल मला काही सांगू नको. निमा माझं सर्वस्व होती- पत्नी, मैत्रिण व आईसुध्दा. अकस्मात ती गेली. माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाली”,पप्पा चिडून म्हणाले.
“पप्पा”, ग्रेस म्हणाली, “तो आठवणींचा बकुळगंध किती सुखद असेल. प्रेमाने त्याला जतन करा. त्या आठवणींचं संवर्धन करा. तो कस्तुरीगंध तुमच्या दुःखाला हळूहळू कमी करेल. मी माझ्या आई वडिलांच्या आठवणींनी आनंदी होते. तसेच पुढे तुम्ही व्हाल.”
“तू मला अक्कल शिकवू नको. आता माझ्या जीवनात काही आनंद उरला नाही. अर्थसुद्धा राहिला नाही. जगायचं म्हणून जगायचं किंवा मरण येत नाही म्हणून जगायचं.”
त्यांच्या बोलण्यात रागही होता आणि वैषम्य सुद्धा. ग्रेस त्यांच्यी व्यथा समजू शकत होती. काही व्यक्ती कधीच विस्मरणात जात नाही. अशा व्यक्तींना आपल्या मनात स्नेहपूर्वक जिवंतचं ठेवलं पाहिजे. त्या गेल्या असल्या तरी सतत आपल्या सोबत असतात. ग्रेसने फक्त फोटो,त्यांच्या साड्या व वस्तू पाहीन हा शब्द दिला. पप्पांनी मम्माचे कपाट उघडून पाहायला परवानगी दिली आणि आशाताईंना तेव्हाच कपाट साफ करून घ्यायची सूचना केली. निमाताईंचे कपाट उघडल्यावर ग्रेस त्यांचा व्यवस्थितपणा पाहून चकित झाली. साड्या व ब्लाऊज रंगाप्रमाणे रचून ठेवले होते. दागिने एका लहान स्टीलच्या पेटीत होते. कपाटाच्या सगळ्यात खालच्या कप्प्यात त्यांनी तलम कापडाच्या घडीत काहीतरी ठेवलं होतं. ग्रेसने हळूच ती लिफाफ्यासारखी केलेली तलम घडी बाहेर काढली. टेबलवर ती ठेवून उघडली. अहो आश्चर्य! त्यात लहान मुलांचे कपडे होते. अगदी कोरे करकरीत आणि मऊ. ते अनुप आणि अनुजाचे कपडे नक्कीच नव्हते. त्या कपड्यांखाली एक लिफाफा होता आणि दोन लाल डब्या. लिफाफ्यात बाळांचे फोटो होते. ते आदी-अहानचे फोटो होते. ते मम्मांकडे कसे आले? कपडे त्यांच्यासाठीच होते का? तिने मावशींना डब्या उघडून पाहिला सांगितले. प्रत्येक डब्बीत एक सोन्याची जिवती, लहान गोफ व वळं होतं.
“म्हणजे हे माझ्याच बाळांकरिता होते. पण मग?...”
“ताई, हे पहा”, मावशी आनंदानं म्हणाल्या. त्यांच्या हातात अनुप- ग्रेसचा फोटो होता. हे फोटो अनुपनेच पाठवले असावेत, असं ग्रेसला वाटलं. पण तो या विषयावर कधीच बोलला नव्हता.
“ताई, मायलेकाचं नातं असं तोडून तुटत नाही. मन नेहमी मुलांमध्ये गुंतलेलं असतं”, मावशी म्हणाल्या. पप्पांच्या चहाची वेळ होत आल्याने त्यांनी पटकन कपाट साफ केले . कपाट तर बंद झालं, पण ग्रेसच्या मनाचं दार काही केल्या बंद होत नव्हतं.
‘पप्पांना माहिती आहे का? हे सर्व मम्मांनी त्यांच्या नकळत केलं?’ हे प्रश्न तिला अस्वस्थ करत होते.
संध्याकाळी तिने एखाद्या बगिच्यात जाऊ असं सूचविलं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी नकारच दिला. मग तिने दोन दिवसांनी परत जायचं असल्याने आजूबाजूचं पाहायचं राहून जाईल, असं म्हटल्यावर ते तयार झाले आणि जवळच्या उद्यानात गेले. पार्कमध्ये पप्पा बाकावर जाऊन बसले. ग्रेस एकटीच पूर्ण बगिच्यात चक्कर मारून आली. ती हळूच पप्पांच्या बाजूला जाऊन बसली. अनवाणी पाय तिने अलगद कोवळ्या गवतावर ठेवले. तो थंडगार व कोमल स्पर्श मनाला आनंदून गेला.
नकळत तिने पप्पांचा हात हातात घेतला व म्हणाली,
“पप्पा, बूट काढून गवताचा स्पर्श पहा किती सुंदर आहे. गुबगुबीत सशाला हात लावल्यावर जसं वाटतं ना, तसचं जाणवतं तळव्याला. सर्व शीण क्षणातच गायब होतो.”
पप्पा संभ्रमानं तिच्याकडे पाहत होते. का ते तिला एकदम उमजलं नाही. जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तिने त्यांचा हात सोडला.
“सॅारी, मला असं वाटलं की माझे डॅड बाजूला बसले आहे.”
तिच्या डोळ्यातील पाणी पाहून ते म्हणाले,
“काही हरकत नाही.”
पण त्यांनी हळूच गवताचा लुसलुशीत स्पर्श अनुभवला.
ती,अंधार पडायच्या सुमारास, मुद्दाम पप्पांच्या बेडरूममध्ये जाऊन बसली. तिच्या येण्याने ते नाराज झाले, पण बोलू शकले नाही. तिने ती तिथे असेपर्यंत रोज उद्यानात जाऊ, असं सुचवलं. मुलं इथे असती तर बगीच्यात बॅडमिंटन, फुटबॉल आणि क्रिकेट खेळले असते, हे सांगून, तिने पुढे आदी कसं शाळेच्या क्रिकेट टीममध्ये असून वक्तृत्व स्पर्धांमध्येही बाजी मारतो, हे सांगितलं. ते ऐकत होते की नाही कळत नव्हतं. तरी ती त्याच उत्साहानं बोलत राहिली. तिने आदी आत्ताच अनुपच्या खांद्यापर्यंत आला आहे, हे म्हणताच…
“काय सांगते? इतका उंच?” पप्पांचा अनपेक्षित उत्स्फूर्त प्रतिसाद आला. मग तिने अहान कसा छान बॅडमिंटन खेळतो, हे सांगितलं. दोघेही अभ्यासात हुशार आहे आणि अनुप नेहमी कसा म्हणतो की मुलांनी आजोबांचे गुण घेतले आहेत, हे ही सांगितलं. आता पप्पांचे कान टवकारले होते. पण मावशी त्या घरी निघाल्या सांगायला आल्या व तो क्षण निसटला.
रात्री जेवणानंतर तिने परत त्यांच्यासमोरच मुलांना व्हिडिओ कॉल केला.
“आदी- अहान, तुम्हाला एक गंमत सांगायची आहे.” तिने बोलताना एक कटाक्ष पप्पांकडे टाकला. ते वाचण्यात रंगले आहे, असं वाटत होतं.
“ काय ग ?”
“आज मी आजीचं कपाट पाहिलं. इतकं सुंदर व व्यवस्थित ठेवलं होतं सर्वकाही…”
“मम्मा, निमा आजीचं कपाट? “ आदी म्हणाला.
“मला पण तिचं कपाट दाखव पटकन”, धाकटा बोलला.
“हो बेटा, आजोबांना विचारावं लागेल. पण गंमत तर ऐका. कपाटात एका छान घडीत तुमचे दोघांचे लहानपणचे फोटो आहे आणि…”
“खरंच? तिचा आपल्यावर राग नाही?’”आदीने विचारलं.
“छे रे, आपली आजी खूप प्रेमळ होती, असं सगळे सांगतात. बाबाही तेच सांगतो, हो ना? मग ती राग का करेल?”
“पुढचं सांग लवकर.”
आता पप्पांचे लक्ष तिच्या बोलण्याकडे होते. मग तिने मुलांना कपाटात काय पाहिलं, ते सांगितलं. मुलांचं आबांशी बोलणं करून दिलं. रात्री ती पाणी ठेवायला त्यांच्या खोलीत गेली. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत ती सतत त्यांच्या सोबत असल्याने त्यांना ड्रिंक घेता आले नाही व ते त्यांच्या लक्षातही आले नाही. ती दूध देऊन वळली, तेव्हा त्यांनी विचारलं,
“का ग, खरंच निमाच्या कपाटात लहान मुलांचे कपडे आहे? आणि ते जिवती वगैरे?”
“हो पप्पा.”
“आणि फोटो केव्हा आले? या वस्तू केव्हा व का घेतल्या तिने? मला का सांगितलं नाही?” “आमचा पण फोटो आहे, पप्पा.”
“व्हॅाट?? निमाला तर तुमच्या लग्नामुळे प्रचंड मनस्ताप झाला होता. मग…?”
“पप्पा, शांत व्हा. विचार करू नका. झोपा आता. उद्या या विषयावर बोलू”, ग्रेस म्हणाली.
पण ते खूप अस्वस्थ झाले होते आणि त्यांच्या मनात आलं, ‘ निमा, तू घेतले हे कपडे? केव्हा? जिवती, गोफ आणि वळं? तू मला कधी सांगितलं नाही.’ त्या विचारांच्या तंद्रीत व झोपेच्या ग्लानीत ते स्वतःला म्हणाले,
‘ मी तुला हा विषय काढू दिला नाही. कधी चुकून हा विषय निघाला व बोलणं सुरू झालं, तर मी तुला रागवायचो. अनेकदा तर मी विषयच बदलून टाकला. मी तुला समजू शकलो नाही का ग? निमा काय झालं?’
सकाळी नाश्ता झाल्यावर, त्यांनी ते फोटो, कपडे आणि गोफ वगैरे स्वतः पाहिलं. त्यांचे डोळे पाणावले होते. अनुप आणि ग्रेसचा फोटोही पाहिला. एकदम सौम्य आवाजात ते म्हणाले,
“निमा व अनुप एकमेकांशी बोलत होते का?”
“पप्पा, मला कल्पना नाही.”
“मग हे सर्व इथे कसे आले? हे सर्व तिने नातवंडांकरीता घेतले होते का? माझं डोकं कालपासून सुन्न आहे. निमा या विषयावर कधी बोलली नाही. मी तिला कधी बोलूच दिलं नाही, असे तर झाले नाही? मी तिच्यावर अन्याय केला का? मी तिला या आनंदापासून वंचित ठेवलं? मला खूप अपराधी व दोषी वाटतं आहे. निमा…”
भावनांच्या आवेगात ते लहान मुलासारखे हुंदके देत रडले. त्यांना सावरणं ग्रेसला खूप कठीण गेलं. त्यानंतर ते त्यांच्या रूममध्ये दडून बसले. जेवण व चहाही त्यांनी खोलीतच घेतला. संध्याकाळी ते अचानक बाहेर आले व ग्रेसला म्हणाले,
“आज बगीच्यात जायचं नाही का? चल लवकर तयार हो.”
या वेळी ती त्यांना मुलांच्या ‘प्ले झोन’मध्ये घेऊन गेली. मुलांना खेळताना पाहून पप्पांचा मूड चांगला झाला. ते आनंदात घरी परतले. जेवणापूर्वी तिने परत मम्मांचा विषय काढला. मम्मांच्या सुंदर साड्या खराब होण्यापूर्वी, सेवाभावी संस्थाना दान करू या का विचारलं. त्यांनी परवानगी दिल्यानंतर, अशा संस्था शोधून, तिने मम्मांचे कपडे दान केले. त्यांचे सोने व चांदी अनुजाला द्या, असं सांगितलं.
मग नेहमी सारखे जेवण व औषधं झाली. मुलांशी बोलणं झालं. पप्पाही मुलांशी प्रेमाने बोलले व झोपायला गेले. दूध द्यायला व पाणी ठेवायला ग्रेस गेली. त्यावेळी सहज सुचल्याप्रमाणे ते म्हणाले,
“का ग , मुलांशी रोज बोलते. पण नवऱ्याशी बोलत नाही. त्याच्याशी भांडून आली का?”
ग्रेसला हसूच आलं. “नाही हो, पप्पा. आम्ही रात्री उशीरा बोलतो. पण तुम्ही का विचारलं? तुम्ही अनुपशी बोलता का? फोन लावू का?”
“नाही, मला बोलायचं नाही.”
रात्री अनुपशी बोलताना तिने त्याला फोटो कधी पाठवले विचारलं. त्याने लग्नानंतर त्यांचा व मुलं झाल्यावर त्यांचा व अधूनमधून मुलांचे फोटो पाठवले होते. त्यानंतर मम्माला ग्रेस आणि मुलांना भेटण्याची इच्छा होती, हे सांगितलं. पण पप्पा तिला तो विषय काढू देत नव्हते.
मग ग्रेसने अनुपला तिचा कयास सांगितला.
“अनुप, ते स्वतःलाच मी निमावर अन्याय केला का विचारत होते.”
“चला, तुझ्या जाण्याचा फायदा होतो आहे. मुलांशी ते मोकळेपणाने बोलू लागले. औषध व पथ्यं रूळावर आली. ते घराबाहेर निघतात. मित्रांशी बोलतात. अजून काय पाहिजे? पण तू ठीक आहे ना? विपरित परिस्थितीत तू गेली…”
“अरे, अनुप, पप्पांची आजची प्रतिक्रिया पाहून मी भारावून गेले. मला शंभर हत्तींचं बळ मिळालं रे.”
ते तरीही ग्रेसला किंवा मुलांना नावाने हाक मारत नाहीत, हे तिला खटकत होतं. अनुपचेही नाव ते काढत नव्हते. पण त्या दिवशी तिच्या नवऱ्याशी भांडणाचा त्यांनी उल्लेख केला आणि ग्रेसला ‘लोहा अब पिघल रहा है’ ही जाणीव झाली. त्या दिवसानंतर त्यांचं वेळापत्रक ठरल्यासारखं झालं. पप्पांनी तिला परत कधी जाते विचारणं बंद केलं.
ती अधूनमधून त्यांच्या मित्रांना घरी बोलावू लागली. ते दोघं रोज संध्याकाळी बगीच्यात जात. आल्यावरही ते गप्पा मारत, मग जेवण, औषधं, त्यानंतर मुलांना व्हिडीओ कॅाल करत. त्या दोघांच नातंही घट्ट झालं होतं. ती मोकळ्या मनानी त्यांच्याशी संवाद साधत होती. जेव्हा त्यांना तिचे शिक्षण, कंपनीतील पद, वगैरे माहिती कळली, तेव्हा ते अचंभित झाले. मग ते जूहू बीच, सिद्धीविनायक मंदिर, इस्कॅान टेंपल, वगैरे ठिकाणी गेले. कोशातून ते हळूहळू बाहेर पडत होते.
आशा मावशी उत्तम रीतीने घर संभाळत होत्या. त्यांना औषधांच्या वेळा, पथ्य -पाणी इत्यादींची सवय झाली होती. एका कागदावर तिने त्यांच्या मित्रमंडळींची नावं व फोन नंबर लिहून ठेवले. त्यात स्वतःचा व अनुपचा नंबरही टाकला. विविध तपासण्या केव्हा करायच्या व त्याकरिता घरी कोणाला बोलवायचं, पप्पांना डॉक्टरांकडे कधी पाठवायचं व कोणासोबत पाठवता येईल, हे सर्व तिने एका डायरीत नमूद करून ठेवलं. पप्पांना इतर कोणतीही अडचण आली तर लगेच फोन करायचा, ही महत्त्वाची सूचनाही दिली.
तिने हळूहळू स्वतःचं सामान आवरायला सुरुवात केली. दोन दिवसानंतरचं तिकीट काढू असं ठरवलं. ‘ आता पप्पांना कल्पना द्यायला हवी’, असं तिला वाटलं.
दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर, तिने पप्पांना हाक मारून सांगितलं,
“पप्पा, मी परवा हैदराबादला परत जाईन म्हणते.”
“तू परत जायचा विचार करते आहे, हे आतापर्यंत कधी बोलली नाही व आता अचानक जाते? काय झालं?” त्यांनी काळजीनं विचारलं.
“सर्व ठीक आहे, पप्पा. मी दोन-तीन दिवसांकरता आले व चांगलाच मुक्काम ठोकला, तेही तुमच्या इच्छेविरुद्ध. पण दिवस कसे गेले कळलंच नाही. पाहता पाहता सव्वा महिना होत आला. आशा मावशी आता घर छान सांभाळतात. तुमचे मित्रही येत जात राहतात. मम्मांचे सामानही योग्य व्यक्तींकडे गेलं. मग आता निघायला हवं ना?”, ग्रेसने विचारलं.
“हे बघ, तू होतीस म्हणून आशाताई होत्या. तू जाते आहे तेव्हा त्यांची सुट्टी. मला त्यांची गरज नाही”, ते म्हणाले.
“पप्पा, राहू द्या ना आशाताईंना. मला तुमची काळजी वाटणार नाही”, ती हक्कानं म्हणाली.
त्यांनी तिच्या जाण्याच्या कल्पनेला विरोध केला. ती जाणार असल्यास आशाताईंचं काम बंद कर, असं सांगितलं.
“तुम्ही समजून घ्या, पप्पा. तुम्ही एकटे राहू शकणार नाही. आशाताई…”
“मग मी वृद्धाश्रमात जातो. आता माझ्या मनाची तयारी आहे. मी एकटा पडलो होतो. स्वतःला कोंडून घेतलं होतं. नैराश्यानं ग्रासलेला होतो. पण तू माझ्या आयुष्यात वसंत ऋतू होऊन आली. तू माझ्यावर अनुजापेक्षाही जास्त प्रेम केलं. तुझ्या सहवासाची, मायेची व प्रेमाची किंमत मला कळली आहे. आता मी एकटा जगू शकणार नाही. मी आनंदानं वृद्धाश्रमात जाईन”, पप्पा म्हणाले.
ते त्यांच्या मतावर ठाम होते. मग ग्रेसने त्यांना विनंती करून वृध्दाश्रमात जायच्या आधी दोन-चार दिवस हैदराबादला येण्याची विनंती केली. त्यांची आदी-अहानशी भेट झाली असती. पप्पा त्यानंतरही निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यांनी दुसऱ्या दिवशीही सकाळी वृद्धाश्रमात जाईन असं सांगितलं. नाईलाजाने ग्रेसने ते मान्य केलं, कारण त्यात त्यांना आनंद, सुख आणि समाधान प्राप्त झालं असतं. तिने तसं त्यांना सांगितलं, पण ती स्वतः त्यांच्यावर नाराज असल्याचं स्पष्ट केलं.
“मी नाराज आहे तुमच्यावर, पप्पा”, ती हसत म्हणाली.
त्यांच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून ती म्हणाली,
“तुम्ही माझा शब्द डावलला. काही दिवसांकरता चला ना माझ्या घरी. काही दिवसच राहा”, ती म्हणाली.
तिचा रडवेला चेहरा पाहून ते म्हणाले ,
“येतो बेटा. पण फक्त तीन-चार दिवसच राहीन. मग तू स्वतः येणार आहेस मला वृद्धाश्रमात सोडायला. वचन दे.”
“प्रॉमिस पप्पा. तुम्ही म्हणाल त्यानंतर मी तुम्हाला सोडायला येईन.”
तिने लगेच त्यांचे तिकीटही काढलं. पप्पा येणार हे तिने अनुपला सांगितलं नाही. अनुप ग्रेसला घ्यायला आला होता. हैदराबादला ते विमानतळावरून बाहेर आले, तेव्हा तिच्यासोबत पप्पांना पाहून तो अवाक झाला. त्याने वाकून पप्पांना नमस्कार केला व सर्व बॅग आपल्या ताब्यात घेतल्या. ग्रेसने अनुपला डोळ्यांनी शांत राहायची खूण केली.
त्यांच्या घरासमोर गाडी थांबल्याबरोबर व आजोबांना पाहिल्याबरोबर आदी- अहान ‘आजोबा- आजोबा’ म्हणत धावत घराबाहेर आले. दोघांनी वाकून त्यांना नमस्कार केला व नंतर त्यांच्या गळ्यातच पडले. दोघांनी जणू काही आजोबांचा ताबा घेतला. त्यांचे दोन्ही हात पकडून ते त्यांना घरात घेऊन गेले. “आजोबा, आपल्या घरी तुमचं स्वागत आहे. आज आपली फॅमिली पूर्ण झाली.”
ते आजोबांना नाचत- हसत घर दाखवायला घेऊन गेले. आजोबांनीही त्यांचे हात घट्ट धरून ठेवले. ते दृश्य पाहून अनुपने ग्रेसचा हात आपल्या हातात घेतला. दोघांचेही डोळे पाणावले होते.
ग्रेस त्याला म्हणाली, “बघ, दोन- तीन दिवसात ते तुझ्याशी इतक्याच प्रेमानं बोलतील. तू त्यांच्याशी सर्व ठीक आहे, असंच वागत रहा.”
“पप्पा घरी आले यातच सर्व आले. ग्रेस, मिशन पप्पा आणि आजोबा यशस्वी झाले. तू पप्पांना किती छान समजून घेतलं. जे मला जमलं नाही, ते तू सहज साध्य केलं.”
“मी भाग्यवान आहे. मी प्रेमाचे धागे व नातं गुंफलं. त्यांनी प्रेमानं प्रतिसाद दिला. ते खरचं माझे पप्पा झाले. बघ, आता ते इथे इतके रमतील की परत जायचा विषयच काढणार नाही. माझे पप्पा, नाही आपले पप्पा, खूप प्रेमळ व गोड आहे.”
डॅा वंदना पाठक
