ऋणानुबंध (अलक)
ऋणानुबंध (अलक)
सकाळची वेळ. घड्याळाच्या काट्याबरोबर माझी शर्यत चालू होती. ते सतत पुढे व मी मागे. हे वेळेवर गेले ऑफिसला. मलाही शाळेत वेळेवर जायचे होते. आज नील खूप कुरकुर करत होता. त्याचे डोळे लागले व मी डबा भरायला सुरवात केली. पण हनी बेडरूम समोर घुटमळायला लागली . नील उठेल म्हणून तिला हुसकावले, तर ती सरळ बेडरूम मध्येच गेली व पाळण्यात पाहू लागली. काय झाले म्हणून मी डोकावले तर नील कसेतरी करत होता. डॉक्टरांना बोलावले.
ते म्हणाले,
“श्वास घ्यायला त्रास होतो आहे व लगेच भरती करावे लागेल. थोडाही उशीर जीवावर बेतेल.”
लगेच त्याला भरती केले पण जर हनी तिथे घुटमळली नसती, किंवा पाळण्याजवळ गेलीच नसती तर…. विचारानेच थरकाप होतो. कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध होते देवच जाणे.
