नाते मनाचे
नाते मनाचे
“दादिमा, कैसे हो! खाना खा लिया क्या।”
“हो रे बेटा, लंगरमध्ये झाले. तू केळ खातो का? आज कोणीतरी मी नसताना दोन केळं ठेवले माझ्या गोठोड्याजवळ. “
दादी दादरला फुटपाथवर राहायच्या. तिथेच जेवण, झोप व कशीतरी आंघोळ करायच्या. जाता-येता लोक जे पैसे द्यायचे, त्या ते गोळा करायच्या.
दोन महिन्यांपूर्वी नवरा गेल्यावर मुलाने कोल्हापूर जवळच्या खेड्यातून फिरायला नेतो म्हणून मुंबईला आणलं व त्यांना सोडून तो पळून गेला. त्यांना आता त्याच्याकडे परत जायचं नव्हतं. मुलगी रमा गडचिरोलीकडे कुठेतरी राहात होती. तिचा पत्ता वा फोन नंबरही त्यांना आठवत नव्हता. पैसे तिच्याकडे जाण्यासाठी त्या गोळा करत होत्या. पण जाणार कशा?
तो माझा रोजचा जाण्या-येण्याचा रस्ता. तिथे आमची ओळख झाली. मी त्यांना तिथे बसलेलं अनेकदा पाहिलं व मग त्यांच्याशी बोलायला सुरवात केली. त्यांच्या वागण्या- बोलण्यावरून त्या चांगल्या घरातल्या आहे, हे लक्षात येत होतं.
मी सोशल मिडियावर त्यांचा फोटो काही दिवसांपूर्वी टाकला होता व त्यावरून संपर्क साधून मुलीने कालच पत्ता पाठविला होता.
“चलो दादी, आज सामान बांध लो। अब रास्तेपर रहनेके दिन खतम। आज गाडीसे मै आपको घर छोड दूंगा।”
“घर? ना, मै वहा नही जाऊंगी।”
“अरे, मै आपको गडचिरोलीमे छोडूंगा। पता है मेरे पास बिटियाके घरका।”
दादींचे डोळे भरून आले. कोण खरा मुलगा हेच त्यांना कळेना.
नाते मनाचे व भावनांचे जास्त सच्चे ठरले.
