घरातले दिवस
घरातले दिवस
तसा तर तो नेहमीच बाहेर असायचा. काम, प्रवास, घर असं टप्प्या टप्प्यांनी घरी यायचा. घरची सगळी नवीनतम माहिती बोलण्यातून आपोआपच मिळायची. त्यावर वा, छान, हो का, असं कसं, बरं, येतो, जातो, अच्छा. येवढं बोलून तो घरात वावरत असे. म्हणजे काय की दिवसातले काही तासच ना, चालून जात होतं.
आता बदललंय. अंथरुणातून उठल्यापासून काहीना काही बोलावंच लागतं. म्हणजे ती विचारत राहाते, कसा झालाय चहा? कोणतं बिस्किट हवंय? दूध आणा वेळच्यावेळी. पिशवी घेतली का? पैसे कसे देणार? मास्क, ग्लोव्हज हे न ऐकलेले शब्दंही वारंवार ऐकायला लागत होते.
भाजी कोणती आणायची? बाकी काय सामान हवंय? कुठे हात तर नाही ना लावला? बरंय सध्या धोबी येत नाही ते, पण पेपर नाही येत म्हणून कसंतरीच वाटतंय. आज काय करू? कितीवेळ बसणार कंप्यूटरवर? तुमचे केस किती विरळ झाले नं? किती बोलत असते ही, आणि का?
टीव्ही सुरू असतो. जाहिरातींचं संगीत प्रमाणापेक्षा मोठं असतं की काय?
मी काम करत असतो. लक्षं नसतं, पण कान नाही बंद करता येत. भांड्यांचे आवाज. कूकरची फुसफुस, नळाचे आवाज, फोडणी, चर्र भाजी फोडणी घालण्याचा आवाज. बाथरूमच्या दारांचे उघडबंद. शांतच राहतो मी पण किती दिवस राहू शकेन.
मी या आधी बहिरा होतो की काय? म्हणजे ही म्हणाली सध्या पेपर नाही म्हणून रद्दीवालेही आवाज देत नाहीत. कधी ऐकला होता? छे:, आठवत नाही ऐकल्याचं. पेपर पहायचो रोज पण पेपर म्हणून ओरडण्याचा आवाज नाही आला. सतत हातात मोबाईल नाहीतर रिमोट. कधीतरी कुणी शेजारीपाजारी आला थोडाफार बोलायचं. बहीण आली की मात्र सतत बोलत असायची म्हणजे काय यांच्या प्रश्नांचे उत्त,र त्याच्या उत्तराची वाट न पाहता तीच उत्तर देऊन मोकळी व्हायची आणि भरीला ही होतीच आई-बाबाही घ्यायचे भाग थोडाफार. नंतर मग ऐकायचं आहेच आपल्याला म्हणजे आत्ता नाही ऐकले तरी चालण्यासारखं होतं. नंतर पुन्हा सौभाग्यवती पुन्हा सगळं सांगणार असणार मला, असो. फार फार तर म्हणायची अरे गप्प बस तू कंटाळा नाही येत का तुला थोडा मंद हसला तर चालून जायचं. आता फोन करते व्हिडिओ कॉल म्हणजे फोन हातात घ्यायला पाहिजे त्याच्या समोर बघितलं पाहिजे आणि फोन वर बोलावं लागतं. मलाच कळत नाही मी काय बोलतो ते, अर्थात ही घेते लगेच फोन म्हणजे मला सुटल्यासारखं वाटतं. आई बाबा काय बोलत असतात ते मात्र फारसं समजलं नाही हळू बोलत असतात, आणि कदाचित माझ्या संदर्भातल्या नसाव काही. पण आता मला हळूहळू कंटाळा यायला लागला होता. एकाच ठिकाणी म्हणतोय मी.
त्या दिवशी ऑफिस मधून कोल्हापुरेचा फोन आला होता किती भरभरून बोलत होता. पण ऑफिसमध्ये तू नाही बोलत एवढ! असं मी म्हटलं तर म्हणाला, "अरे तेच ना! तोच तर मोठा त्रास आहे. म्हणजे काय मला कुणाशी बोलायला मिळत नाही ना. मी आपल्या नुसता अच्छा म्हटलं. अरे अच्छा काय? आणि मला बोलायला मिळत नाही असं सांगतोय मी बाकी तुला काय फरक पडणार म्हणा. तुझ्या घरातली कंटाळत नाहीत का तू गप्प बसून राहतोस ते पाहून? इतक्यात ही आली कोल्हापूरे भाऊजी आहेत का? काय हो कशी आहे विनिता? झालं आता हे दोघं ही कसे काय थांबणार? मी फोन तिच्या हातात दिला.
फोन हातात घेऊन घरभर फिरून कुठे झाडू मार, धूळ पुसत होती भांडी आवरत होती. म्हणजे इतके सगळे आवाज एकाच वेळी हे कसे काय सहन करते? बरं बोलताना काही हळू बोलणे? अगदी सभा भाषणात भाग घेऊ शकते अशा पद्धतीने कोल्हापूरेशी बोलत होती. पण मला माझा फोन हवा म्हणून मागितला तर हातवारे असे केले, की मग मी बाहेरच्या खोलीत गेलो. टीव्ही चालूच होता आवाज कमी होता पण मला जाणवतं होता ना! फोन हेडफोन लावूनच बसतो मी तरी किती आवाज येतात आणि असे ते गुणगुंगुन गुंगुन काहीतरी ऐकू येत असतं.
आज मी जरा लवकर उठलो आणि सगळे झोपले होते म्हणून भराभरा माझं आटोपून काम करायला बसलो. बाहेरून जरा कधीतरी एखादा वाहनाचा आवाज येत होता, वारा सुटला असेल म्हणून झाडांचा आवाज येत होता पक्षी मात्र फार चिव चिव करतात. पण छान वाटत होतं कामाचा मूड लागला. जेमतेम तासभर झाला असेल आणि मी थांबलो. इतका शांत कसं? मग उठलो घरात फेरी मारली हो सगळे झोपले होते हे बरं होतं.
पण आता मी अस्वस्थ झालो म्हणजे त्याचा आवाज, हसण्याचा आवाज, पाण्याचा आवाज, बाथरूमच्या दारांचा आवाज, गॅस पेटवला, लाईटर, भांडे ठेवलं त्याचा आवाज पाणी घेतलं, भांड्यात पाणी टाकल्याचा आवाज आला. अरे काय आहे काय मी वाट पाहतोय आवाजांची! म्हणजे मला ऐकायला हवे आहेत ते आवाज. आणि आलीच ही पाच मिनिटात.
"अग बाई तुम्ही उठलात का, मला उठवायचं चहा दिला असता!" झाली हीची सुरुवात. मी परत कामाला बसलो. तेच नेहमीचे प्रश्न विचारत ही चहा-बिस्कीट वगैरे घेऊन आली चहा पिता पिता काही विचारत होती म्हणाली अहो रात्री बातम्या बघितलं का?
तीचं सामान्य-ज्ञान आणि बारकाईने टीव्ही पाहणे ऐकणे, मी चकित झालो बरच माहिती असतं हिला.
मला कळेना सगळं ऐकू कसे येते मला? अरे हो, कोणी उठला नव्हतं म्हणून मी हेडफोन नव्हते लावले. पण आता मुद्दाम उठून लावले तर…
चहा झाल्यावर मीच म्हटलं जातो मी आवरतो भांडी. एवढा कृतज्ञ चेहरा दिसला तिचा. नुसतं भांडी आवरतो म्हटलं मी. तर एवढं काय?
ती गेली घाईघाईने कामाला लागली.
मी घरात फेऱ्या मारल्या आईचं पांघरून नीट केलं बाबांची डोक्या खालची उशी सरकली होती ती नीट ठेवून दिली. किती वर्षानंतर एवढं निरखून पाहिल मी या दोघांना. म्हणजे माझ्या काना बरोबर डोळेही बंद असतात की काय?
बाबांची कटिंग वाढली आहे. विशालचे केस परवा हिने कापून दिले घरीच. चांगले कापले .
माझेही केस कापणार की काय ही? परवा दाखवत होती मला सचिनच्या मुलाचे त्याने केस कापले.
आज बाबा शिंका देत होते. आई म्हणत होती केस वाढलेयत डोकं नीट पुसत जा, हो आजारपण नको आता.
सांगितलं त्यांना उद्या लवकरात लवकर सकाळीच कापून देतो म्हणून. किती आनंदी दिसले. त्यांच्यासाठी घरी येणारे म्हातारे काकाही गावी गेले एवढंच म्हणाली आई. दोघंही येताजाता पुटपुटत जप करताना ऐकू येते. कितीतरी दिवसात हे दोघंही एकमेकांना असं करा तसं करा एवढंच संभाषण करताना ऐकू येतं. गप्प असतात. की आपणच नसतो म्हणून काही समजत नाही मला.
तरी आंघोळीनंतर बातमी दिलीच मला आईनी. "बरं का रे , कवितांचे सासरे ऐकत नाही म्हणे, नाहीतरी आता झाले म्हणे जगून, बाहेर जातात सारखे. कविता म्हणाली इ -पास काढून द्या म्हणून मागे लागले आहेत. "
मी हं करून गप्प झालो. उठून बायकोला मदत करायची होती त्या कमला लागलो. भांडी, पाणी या आवाजात ऐकू आले नाही बाहेर काय बोलत होते ते! पण गप्पा रंगल्या होत्या. विशालही मिसळतो त्यांच्यात. कविता आली, की बघायलाच नको. कसलाही विषय चालतो बोलायला. अभ्यास करतो म्हणा, काय करणार पुढे … जाऊदे, वेळ आहे तसा .
मी हेडफोन लावले. खूप सुरक्षित वाटलं. मला असं लक्षात आलंय की, सगळे बाहेरचे प्रश्न यांना सोडवता येतात असच वाटतं या सगळ्यांना.
काल एक जोखमीचे काम आले होते. अचानक ई-पास घेणारे भरपूर यायला लागले. मागे मागे जाऊन पाहिले तर मार्च महिन्यात प्रवास करणारे प्रवासी नव्हते. मार्च आणि पुढचे एक दोन महिने सगळ्या प्रवासाच्या वाहनांची आरक्षणं रद्द झालेली दिसली. राज्या राज्यातून लोकांच्या प्रवास करण्याच्या मार्ग, साधनं आदि प्रक्रियांचा डाटा मागवून ठेवला होता. तो यायच्या आधीच अचानक ई-पासांची मागणी वाढली होती.
दुपारची झोप, चहा नंतरची वेळ खूप अस्वस्थतेत जाते. घरातले सगळेच या वेळी काय करावं या चिंतेत असतात. विशाल आज कुठल्यातरी पुस्तकात बुडाला होता. आई, बाबा, आणी ही, कविता आणि तिच्या घरच्यांशी वीडियो कॉल करून बोलत होते. आज मीही थोडा बोललो. बहिणाबाई अखंड प्रत्येकाशी, तिच्या आणि आमच्याही घरात बोलत होती. हीही काही कमी नाही हे लक्षात आलं मला. कविताचा नवरा सुरेश जरा काळजीत होता वडील ऐकत नाहीत, बाहेर जाण्याचा हट्ट धरतात यासाठी. इत्यादी. आज मला हिने दोन तीन वेळा विचारलं कसला विचार करता एवढा? मी ऐकलंच नाही असं दाखवून नुसती मान हलवली.
रात्री जेवताना आधीच्या नोकऱ्या आताची लठ्ठ पगाराची वेठबिगारी यावर सुरू होतं आजोबा आणि नातवाचं बोलणं. अगदी हिरीरीने. शेवटी बाबांची गाडी वळली व्यायामावर. बाबांचं म्हणणं होतं की तरूण मुलांनी असं नुसतं बसून फोन कंप्यूटरवर वेळ घालवू नये. विशाल म्हणत होता आजोबा, एकटा माणूस फक्त बारा बाय बारा एवढ्याच परिसरात सध्या वावरू शकतो. फोन आणि कंप्यूटरवर जगाच्या भोवती फिरता येतं, पृथ्वीच्या पोटात, समुद्रात संचार करता येतो. त्यासाठी मात्र एका जागी बसावं लागतं हे खरंय. पण आजोबा, तुम्ही प्रत्येक कामासाठी बॅंकेत, सरकारी अॉफिसात फेऱ्या मारायचे, आता तीही कामं घरबसल्या होतात.
मला उगाच शंका आली, विशाल नक्की काय करत असतो कंप्यूटरवर ते पाहिलं पाहिजे एकदा. निदान मी घरी आहे तेव्हा मला संधी आहे. बाहेरून आल्यावर मुद्दाम काही बघता येणार नाही.
उद्यापण लवकर उठूया आजच्या सारखंच. जेवणानंतर घरातल्या घरात फेऱ्या, इथून तिथं, बाकीचे टीव्ही समोर, विशाल दोन्ही एकाच वेळी कानाला इअर प्लग, मांडीवर लॅपटॉप, समोर टीव्ही. आजी आजोबा, आई, यांच्याशीही काहीनाकाही बोलतोय. कसं काय जमतं? हं पण त्यांनाही सवय झाली दिसतेय, तो न बोललेले, तेच बोलून दाखवतात. अजब संवाद वाटतो मला. असो.
झोपताना कोल्हापुरेचा मिस कॉल आला. म्हणजेच काही तरी मेसेज केला असणार.
वाचता वाचता ताडकन उठलो. भराभर लॉग इन केलं. पासवर्ड बदल म्हणे तर बदलला.
म्हणजे माझ्यासारखाच त्यालाही या ई-पासच्या काही विचित्र हालचाली दिसल्या तर. सगळं तर व्यवस्थित आहे. 'बग' पण नाही, तरी…
बाहेर टीव्हीचा आवाज बंद झाला. हिचं फोनवर बोलणं सुरु होतं. विशालही बोलत होता वाटतं मधूनच. आई बाबा आपल्या खोलीत गेले. त्यांचं पाणी औषधं पहायला ही पण गेली. विशालच्या बोलण्यात सुरेशच्या वडिलांचा उल्लेख येत होता. काय ते चोरून ऐकता येत नव्हतं तरी भांडी आवरण्याचं निमित्त करून मी काही ऐकू येतंय का पाहात होतो.
मग सुरेशचे वडीलच बोलत होते त्यांच्याशी. बरंच समजावत होता, मी करतो, मी करतो असंही म्हणत होता. झोपायच्या आधी एकदा मेल पाहून घ्यावी म्हणून मोबाईल पाहिला तर कोल्हापुरेचा फोन आला." काय रावसाहेब, खास इनसेंटिव्ह मिळतोय तुला!"
"एक बाबा, गप रे!"
"अरे ऐक ऐक!"
त्या दिवशी बोललो होतो ना आपण त्या जास्तीच्या ई-पास बद्दल.."
"हं, त्यांचं काय?" मी थांबवलं त्याला. याला कशाला हे सगळं फोनवर बोलायचं असतं कुणास ठाऊक.
"अरे लोचा सापडला ना, पाताळातल्या लोकांचा! तू बघ बघ मेल आली असेल बघ!" चल, चल मी ठेवतोय!"
झाली कामं, बघावं काय म्हणत होतं..
"अहो, उद्या बाबांचं औषध आणा हं, संपत आली आहेत." पटकन दिवा बंद केला. झोपा ना, लवकर उठला होतात आज.
बरंय हिचं. झोपली लगेच.
मेल बघितली. सविस्तर होती. ई-पासचा डेटा पाहून दिसलेल्या अबनॉर्मॅलिटीज कळवल्या होत्या पुढे. डिपार्टमेंट मधे भराभर चक्रं फिरली. अनऑथराईजड हालचाली आणि नको नको ती माणसं सामील झालेली सापडली होती.
थॅंक्स टू वारकरी मंडळी. उत्सुकता म्हणून कवितांच्या घराजवळची ई-पासचे अर्ज तपासले ते वारकरी आणि वारीची व्यवस्था पाहणारे लोक होते. कविताच्या सासऱ्यांचंही नाव होतं आणि कोरोना स्वयंसेवक म्हणून विशालचही नांव दिसलं ई-पास अर्जासाठी.
हं, सगळं बंद केलं.
इअर फोन काढले अन् असला घर्र घर्र आवाज येतोय म्हणून पाहिलं तर बाईसाहेब चक्क घोरत होत्या.
----------------------------------------------X X X --------------------------------------------