बर्फवृष्टीचा एक दिवस
बर्फवृष्टीचा एक दिवस


एखादा दिवस इतका छान जातो की त्या दिवसाचं चित्र डोळ्यासमोर येताच समाधान वाटतं. दोन दिवसापूर्वी गुगलच्या रिपोर्टवर संध्याकाळी बर्फ पडणार असल्याचे समजले.
हे बर्फ सुद्धा आपल्या पाण्यासारखं असतं. आपल्याला कसं पाणी परिचयाचं आहे. झिमझिम पाऊस आपण आनंदाने अंगावर घेतो. पावसात कधी मनसोक्त भिजतो, तर कधी गमबूट, रेनकोट, छत्री सगळं वापरून कोरडे राहून पावसामध्ये भिजतो. पाऊस पडून गेल्यानंतरचे पाण्याचे शिंतोडे सहजच अंगावर घेतो. कधी धबधबा पाऊस आणि सोसाट्याचा वारा आला किंवा येणार असं वाटलं की खिडक्या दारं लावून काचेतून पाण्याचे तांडव पाहतो. डोक्यापासून पायापर्यंत भिजलो की घरात येऊन अंग कोरडे करून कोरडे कपडे घालतो आणि मनातल्या मनात गरम गरम चहा कॉफी यांची आस धरतो.
अगदी तसंच! तसंच या हवामानाच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी बर्फ पडायला सुरुवात झाली म्हणून सगळ्यांनी स्नो फॉल! स्नो फॉल! (आमच्या लहानपणी स्नो मिळायचा पांढराशुभ्र, चेहरा उजळण्यासाठी वापरलं जाणारं क्रीम, त्याचा वास अजूनही आठवतो.) करत लहान मोठ्यांनी अंगावर घेतला. समोरच्या अंगणात तयार झालेल्या गालिच्यावर चालायला जाऊ म्हटलं तर भुसभुशीत आईस मधे पाय गेला आणि ओला झाला थंडगार पडला.
pan style="background-color: transparent; color: rgb(0, 0, 0);"> इथे आल्यापासून इथली शांतता, स्वच्छता, निटनेटकेपणा पाहून डोळे तृप्त झाले होते. घरांची छपरं दारं अगदी सारखे दिसले तरी वेगळी रचना असलेली उतरती छपरं. खाली पाणी जमिनीत मुरायला जागा. मोजकी आकार दिलेली झाडं. सरळ आणि वळणदार असूनही सुंदर रस्ते, प्रत्येक समोर गाडी बाहेर जायला सिमेंटचा कोबा. या सगळ्यावर स्नो पडून गवताचा रंग पांढरा शुभ्र झाला होता. घराचे उतरती कौलासारखी छतं पांढ-या शुभ्र स्नोनी पूर्ण झाकली गेली. ही किमया घडली, दोन-तीन तास पडलेल्या भुरभुरत्या बर्फानी. समोरचा रस्ता काळा पण स्नो पडून त्याचा झाला आईस्. बर्फवृष्टी थांबली तरी तापमान शून्याखाली गेलेलं असतं म्हणून आईस् घट्ट होत जातो. दोन तासानंतरही पांढरा कापूस भुरुभुरू उडती होता. तो आता झाडांच्या पानांवर आणि काड्यांवर साचायला लागला. झाडं पानं बर्फाचे कपडे घालून खाली वाकायला लागली होती. घट्ट झालेला आईस म्हणजे आईस शूज घालून खेळायला पर्वणी. बर्फवृष्टी थांबली मात्र आता रात्रभर थंडीचा कडाका होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला. जसजसे प्रकाश किरण घरांवर पडले तसे त्यांच्यावरील सहा इंची बर्फाचे थर हलके केशरी नंतर थेंब चमकू लागले. सूर्य पूर्ण वर आल्यावर या पांढऱ्या बर्फामुळे लख्ख उजेड आला घरात! घरातून मुलं, मोठी माणसं बर्फात खेळायला बाहेर आली. रस्ता पहिल्यासारखा दिसायला लागला. आपण पहिल्या पावसात भिजतो तसे इथे पहिला स्नो फॉलची मजा घेतात. मीही खूप मजेत खेळले या भुसभुशीत थंडगार कापसात! घरातूनही पाहता पाहता माझे दोन तीन तास सहजच निघून गेले. घरातलं तापमान हीटरमुळे ऊब देत होतं म्हणून मी सुरक्षित होते. काही वर्षांपूर्वी हिमालयात भटकंतीला गेलो असताना, रात्री तंबूत राहिलो आणि सकाळी एक एक फूट बर्फ सभोवताली पसरलेला. भीतीने गाळण उडाली कारण त्यातून जाऊन डोंगर पार करायचा होता. तो अनुभव आणि हा आत्ताचा अतिशय सुखद अनुभव. स्नो आणि आईस्!