Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Nilesh Bamne

Others


4  

Nilesh Bamne

Others


एक कप…

एक कप…

4 mins 189 4 mins 189

बरेच दिवस विजय अशा एखाद्या कामाच्या शोधात होता ज्यात त्याला मानसिक समाधान आणि काहीतरी रचनात्मक कार्य केल्याचे समाधान मिळेल. विजयला फक्त पैसे कमावण्यासाठी तशी नोकरीची गरज नव्ह्ती कारण विजय अशी काही कामे करण्यात पारंगत होता की ती कामे त्याच्याकडून करून घेण्यासाठी लोक त्याच्यामागे लागतात आणि त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसेही त्याला द्यायला तयार असतात. पण का कोणास जाणे विजयला त्याच्या सर्वांत आवडत्या क्षेत्रात काम करून पैसे कमवायचे होते. विजयने इतर क्षेत्रातून कमावलेले लाखो रूपये त्याने या क्षेत्रात खर्च केले होते. ते क्षेत्र होते लिखाणाचे. विजयला लहानपणापासून कविता, कथा आणि लेखलिहण्याचा प्रचंड नाद होता त्या नादापायी त्याने स्वतःच स्वतःची अनेक पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती, अनेक वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात मासिकातच नव्हे तर सध्याच्या अघाडीच्या मराठी साहित्याला वाहिलेल्या संकेतस्थळांसाठी त्याने शेकडो लेख मोफत लिहिले होते. त्याच्या या लिखाणाच्या व्यसनावर त्याने अक्षरशः लाखो रूपये उधळल्यामुळे त्याला सकाळ – संध्याकाळ घरच्यांचे टोमणे आणि बोलणी खावी लागत होती. म्ह्णूनच विजयने कदाचित त्याच लेखनाच्या क्षेत्रातून अर्थार्जन करण्याचा गाढवपणाचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्ह्णून त्याच्या एका लेखक मित्राने त्याला तशी एक संधी उपलब्ध करून दिली. विजयने त्या संधीचा फायदा उचलण्याचा निर्णय घेतला.


एक अमराठी उद्योजक एका मराठी साहित्याला आणि बातम्यांना वाहिलेले संकेतस्थळ चालवत होते. त्या संकेतस्थळासाठी पूर्णवेळ लिहिण्याची संधी त्याला मिळणार होती. एक अमराठी माणूस मराठीसाठी काहीतरी करतोय, त्याच्या त्या प्रयत्नात आपणही खारीचा वाटा उचलावा असा विचारही विजयने केला होता. आपल्या मित्रासह विजयने त्या अमराठी उद्योजकाची भेट घेऊन कामाचं स्वरूप वगैरे समजून घेतलं. पैसे किती देणार – घेणार वगैरे निश्चित केले. त्याला त्या कामासाठी मिळणारे पैसे तसे कामाच्या मानाने कमीच होते पण मराठीच्या प्रेमापोटी आणि आपल्या लिहिण्याच्या नादापोटी विजयने ते ही मान्य केले होते. त्या अमराठी माणसाकडे विजयने जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. तेव्हा विजयच्या लक्षात आले की त्या उद्योजकाने त्याचे साहित्य कधीही वाचलेले नाही आणि साहित्य क्षेत्रातील त्याच्या योगदानाची त्याला पुसटशीही कल्पना नाही.

        

कामाच्या पहिल्याच दिवशी लिखाण राहिले बाजूला लिखाणाच्या माध्यमातून जाहिराती कशा मिळविता येतील, जास्तीत जास्त लोकांपर्यँत पोहोचून लिखाणाच्या माध्यमातून पैसे कसे उभे करता येतील यावरच चर्चा होऊ लागली. विजयला व्यक्तिशः पैशात अजिबात रस नव्हता तसा जर तो त्याला असता तर आज तेथे नसता. विजयला पैसे कमावण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते ते ही कमी श्रमात आणि कमी वेळात, येथे तर त्याला बारा तास काम करावे लागणार होते. तरीही निदान आपला पगार निघावा इतक्या जाहिराती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची विजयची तयारी होती. त्या उदयोजकाकडे आणखी दहा- बारा लोकं कामाला होते पण त्यांच्या आणखी विजयच्या कामाच्या स्वरूपात प्रचंड अंतर होतं. ती लोकं जे काम करत होते ते काम करण्यात ही विजय पटाईत होता पण त्याने त्याबद्दल त्याला काहीच सांगितले नाही. विजयला अगदी सुरूवातीपासूनच मनासारखे मनाला पटेल ते काम आणि मनाला वाटेल तितका वेळ करण्याची सवय होती. एखादे काम विजयने हातात घेतले तर ते अर्धवट सोडण्याची सवय त्याला नव्हती. अट फक्त एकच... एखादं काम त्याच्यावर सोपवलं की त्यात कोणीही कोणतीच ढवळाढवळ करायची नाही. आजही कित्येक लोक त्याच्या सोबत एखाद्या विषयावर अथवा एखाद्या समस्येवर चर्चा करण्यासाठी त्याची चातकासारखी वाट पाहत असतात.


दुसऱ्या दिवशी त्या उदयोजकासोबत विजय चर्चा करीत असताना त्याने चहा मागवला. त्याच कार्यालयातील एक मुलगी दोन कप चहा घेऊन आली. कदाचित तिला विजयचं महत्व लक्षात आलेले असेल. चर्चा करता करता त्या उद्योजकाने चहाचा एक कप उचलला. त्याच्याबद्दलचा आदर म्ह्णून तो बोलत नाही तोपर्यंत चहाचा कप उचलणे विजयच्या तत्वात बसत नव्हते. त्याने चहा पिऊन कप खाली ठेवला पण तो विजयला काही चहा घे म्ह्णून म्ह्णाला नाही. त्याने चर्चा तशीच सुरू ठेवली गरमागरम चहा गारेगार झाली तरी तो काही बोलत नाही. हे पाहिल्यावर विजयची किंचित सटकलीच त्याला भयंकर राग आला. आपला राग गिळत तो चहा आणणाऱ्या त्या मुलीचा आदर करायचा म्ह्णून विजय त्याच्या मनाविरूद्ध चहाचा कप उचलून चहा प्यायला. आपल्याकडे काम करणाऱ्या माणसाने आपल्यासोबत बसून चहा प्यावा हे त्याला मान्यच नसावे बहुदा. त्याला ते तसे सपष्ट बोलायचे नव्हते पण त्याच्या कृतीतून ते स्पष्ट झाले.


अमराठी असतानाही मी मराठीसाठी काहीतरी करतोय हे दाखविण्याच्या धडपडीत तो यशस्वी झाला होता पण मराठी माणसाच्या मनात इतरांबद्दल असणारा आदर, प्रेम आणि गोडवा त्याच्यात कधीही येणार नव्हता. आपल्या ध्येयासाठी प्रसंगी आपले सर्वस्व पणाला लावण्यासाठी लागणारी मराठी माणसात जन्मजात असणारी तत्परता त्याच्यात कधीच येणार नव्हती. त्याच्यापेक्षा शंभर पटीने श्रीमंत असणाऱ्या उद्योजकासोबत मराठी-अमराठी उद्योजकांसोबत कित्येकदा गप्पा मारलेल्या विजयला तो आपला अपमान वाटला नसता तर ते नवल ठरलं असतं. विजय जातीने मराठा त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही या वृत्तीचा आणि तो उद्योजक काम करून घेण्यासाठी कोणाचे पाय चेपावे लागले तरी चालतील या वृत्तीचा. विजयचे मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर प्रेम होते पण ते इतकेही नव्हते की त्यासाठी त्याने आपला स्वाभिमान गहाण ठेवावा. त्या एका चहाच्या कपामुळे तो उद्योजक त्याच्यापुढे उघडा पडला होता. त्याच्या केबिनमधून बाहेर पडताना विजय गालातल्या गालात हसला होता त्या हसण्याचे कारण त्या उद्योजकाला कधीच कळणार नव्हते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयने आपल्या लेखक मित्राला भेटून स्पष्टच सांगितले... मराठीसाठी काहीतरी करीत असल्याचे ढोंग करणाऱ्या त्या अमराठी माणसासोबत काम करण्यापेक्षा मी मराठीसाठी झटणाऱ्या मराठी माणसासोबत फुकट काम करेन... निदान तो एक कप चहाला माझ्यापेक्षा जास्त महत्व तर देणार नाही...


Rate this content
Log in