arvind kulkarni

Others

2  

arvind kulkarni

Others

दिवे लागले रे दिवे लागले

दिवे लागले रे दिवे लागले

1 min
73


कुष्ठरोग नियंत्रण पथक (Leprosy control unit) उदगीर येथे मी सन 1993 साली नौकरीवर रूजू झालो . मला अहमदपूर तालूक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र हडोळती येथे पोस्टींग मिळाली . हडोळती PHC ची 15 गावे माझ्याकडे होती . त्यामधे कुमठा बु. व शिवणखेड येथे कुष्ठरूग्णांचे प्रमाण खूप होते . असो


 ते वर्ष 1995/96 चे होते .   कुष्ठरोग नियंत्रण पथक उदगीर चे आमचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. रामप्रसाद लखोटीया साहेब  आमचे मार्गदर्शक होते . कुष्ठरूग्णांसाठी त्यांनी भरपूर कार्य केले होते . एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतले व म्हणाले माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त मी कुष्ठरूग्ण महिलांना साड्या वाटणार आहे  . तुमच्या विभागातील रूग्णाना द्यायला मी तुमच्याकडे या साड्या देतो तेवढ्या तुम्ही त्यांना द्या. असे म्हणून त्यांनी माझ्याकडे दोन नव्या साड्या दिल्या . दिवाळी तोंडावर आली होती . मी ठरवले आपण भाऊबिजे दिवशी  त्या दोन साड्या देवू या . 

 कुमठा बु. हे माझे आवडते गावं. अगदी माझ्या गावासारखे पिंपरखेड सारखे .  गावातील तरूणमंडळ  उपक्रमशील होते . त्यांची मला खूप मदत व्हायची . मी कुमठ्याला जावून त्यांची बैठक घेतली व आपण भाऊबीज दिवशी वरच्या आबादी ला जावून दिवाळी साजरी करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला . सर्वांनी उत्स्फूर्त पणे सहमती दर्शविली . झाले भाऊबीज च्या दिवशी कोणी फराळाचे आणले कोणी फळे आणली , कोणी आकाशदीवे आणले कोणी फटाकडे आणले .

 आमच्या उपकेंद्राच्या सिस्टर व काही महिलांनी  त्यांच्या झोपड्यांचे आंगण स्वच्छ झाडून त्यावर शेनाचा सडा टाकून रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या .ही वरची आबादी म्हणजे कुष्ठरूग्णांची छोटीशी वसाहतच होती . कुमठ्याच्या ग्रामपंचायतीने गावापासून दोन किलोमीटर वर माळावर त्यांना जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले होते . त्या कुष्ठरूग्णामधे एक होती रंगूबाई (नाव बदलले आहे)  तिचे वय होते 30/35 . एकटीच राहायची झोपडीत ! आई वडील , भाऊ त्याच गावात राहायचे वेगळे . कुष्ठरोगामुळे तिच्या हातापायाची बोटे झालेली , नाक बसलेले अशी ही रंगूबाई सर्वांनाच नकोशी झालेली .   तिच्याकडे कोणीच येत नसे .दिवसभर लोकांची गुरेढोरे संभाळायची लोक देतील तो कोर कुटका खायची  गावातील बाया देतील त्या जून्या पुराण्या साड्या अंगाला गुंडाळायची  पायाला झालेल्या जखमा वर चिंध्या बांधून गावातील लोकांची गुर ढोरं राखीत ल॔गडत लंगडत चालायची . केसांच्या पिंगट बटा झालेल्या  अशी ही रंगूबाई ! गावातील चार मित्रांना घेवून आम्ही तिच्या झोपडीत गेलो व तिला म्हणालो आज भाऊबीज आहे , ओवाळ आम्हाला ! डाॅ. लखोटीया साहेबांनी दिलेली साडी ,माझ्या मिसेस नी दिलेल्या फराळाची पिशवी गावातील मित्रांनी ओवाळणी म्हणून टाकलेले पैसे आमच्या सिस्टर ने तिच्या झोपडीत लावलेल्या पणत्या हे सर्व पाहून रंगूबाई ला काही बोलायचेच सुचेना फक्त तिच्या डोळ्याला आसवांची धार लागली होती . कंठ दाटून आला होता .  एका कुष्ठरूग्णाच्या अंधारलेल्या झोपडीत प्रकाश पडला होता . 

हा अनुभव मला वेगळाच आनंद देवून गेला . गायिका पद्मजा फेणाणी यांनी गायलेले  

" दिवे लागले रे दिवे लागले 

 तमाच्या तळाशी दिवे लागले 

दिठींच्या दिशा खोल तेजाळताना 

कुणी जागले रे कुणी जागले " 

हे वरील गीत मी ऐकले व  25 वर्षापूर्वीची ही घटना आठवली तशी लिहून काढली.


Rate this content
Log in