बालपणीची दिवाळी
बालपणीची दिवाळी
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी...
ही कविता म्हणतच लहानपणी दिवाळी यायची...मस्त उत्साह, आनंद घेऊन , मज्जा घेऊन दिवाळी येत असे...
परीक्षा आटपतायत कधी आणि आम्ही दिवाळीची मजा करतोय कधी अस होत असे...अभ्यास करतानाही डोक्यात यावर्षी किल्ला कसा बनवायचा, आकाशकंदील पारंपारिक की चांदणी तयार करायची असे विचार चालू व्हायचे...
परीक्षा झाली की आम्ही भावंडं , शेजारचे मित्रमंडळ आणि कधी कधी तर आई ही असे आमच्या बरोबर ..तिला हे सगळं खूप आवडायचं ...मस्त मोठा आकाशकंदील करायचो आणि मग छान उंचावर लावायचा...
आकाशकंदील करताना किल्ला या
विषयीही गप्पा व्हायच्या. या वर्षी कोणता करायचा किल्ला हे ठरत असे..म्हणजे अगदी सहजी नाही हां..खूप चर्चा, मतमतांतरे आणि मग फायनल व्हायचं...
मग किल्ला तयार करायला वाळू आणायला दारापाशी कामाला असलेल्यांना सांगायचो आणि जोडीला लाल माती आणायची आणि मग एकदाचं किल्ला पूर्ण व्हायचा...किल्ल्यात ठेवायला मावळे,शिवाजी महाराज , तोफ, अस सगळ आणून ठेवलं जायचं...आईला विचारून अस धान्य पेरायाच की ते पटकन उगवेल किल्ल्यात...त्यातच प्राणी,पक्षी ही खेळणी सुद्धा असायची ...सगळ्यात आवडीच असायचं ते कारंजं, धबधबा बनवणे किल्ल्याजवळ ...आणि त्यासाठी मग शेजारच्या डॉक्टर काकांकडे जाऊन सलाईन बॉटल मागून आणायच्या...आणि मजा म्हणजे तेव्हा खूप मुले आधीच सांगून ठेवायची आम्हाला बॉटल हवी म्हणून...तिथे कोणी कंपौंडर असेल त्याला आधी सांगून ठेवायचं की आम्हाला नक्की दे असं...अशा तऱ्हेने सगळी जमवाजमव करून किल्ला व्हायचा...
किल्ला झाला की संध्याकाळी त्यात ठेवायला आई पणत्या देत असे मग त्या ठेवल्या की अजून खूप सुंदर दिसत असे किल्ला...
एकीकडे फटाके वाजवायची सुरुवात होत असे.. केपा, सापगोळ्या, पाऊस हेही लावायची सुरुवात आधीच होत असे..आमच्या शेजारीच फटाके दुकान होत त्यामुळे सारखं आधीपासून आणायला हवे असायचे फटाके...
आमची वयस्कर आजीही आम्ही फटाके लावताना बाहेर ओटीवर येऊन बसायची..पण जास्त आजीला फटाके झाले की फुलबाजा, पाऊस, भुईचक्र हे आवडत असे...आजी पण बाहेर बघायला आली की खूप मजा यायची, सगळे एकत्र मग खूप आनंद व्हायचा दिवाळीत...
अशी सगळी पूर्वतयारी झाली की नरकचतुर्दशी उद्या आहे आज झोपा लवकर कारण उद्या लवकर उठायचं आहे अस आईबाबा फर्मान सोडत असतं..मग झोपायच आणि अस ठरवून की खूप आधी पहाटे उठून आधी फटाके वाजवायचे आणि मग मित्र मंडळ जमले की संगायायच मी आधी लावले..लवकर उठले..अशी मजा असे...
दिवाळीच्या दिवशी आई खूप आधी उठायची..मग पाठोपाठ मी कारण मला खूप आवडायचं पणत्या लावायच्या, सगळ्या अंगणातला केर काढायचा, रांगोळीत पणत्या ठेवायच्या...तुळशी जवळ कोनाड्यात पणती ठेवायची...अशी छान छोटी छोटी मदत करायची आईला...हे सगळ सगळ अजूनही आवडतच पण तेव्हा खूप मजा असायची ती आता कशी येणार ना...बालपणीची मजाच न्यारी हेच खर...
.
आई अगदी छान सुवासिक तेल, उटणे लावून द्यायची आणि छान कडकडीत पाण्याने अभ्यंग स्नान..अहाहा किती छान वाटत असे .थोडी थंडी असे तेव्हा ..आणि त्या थंडीत ते मस्त अभ्यंग स्नान खूप छान वाटे...
आपण अभ्यंग स्नान करतो तसच देवाला ही बाबा छान स्वच्छ करत आणि गरम पाणी, अत्तर वगेरे लावून पूजा करायचे. आणि फराळातील लाडू, करंजी अस असेल तरी आमच्याकडे आई गोडाचा शिरा लागतो देवाला दिवाळीच्या दिवशी तोही करत असे..अजूनही आमच्याकडे गोड शीराही नैवेद्याला फराळ बरोबर असतो.
बाबांची पूजा झाली की मग पुजे नंतर गणपतीच्या आणि लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शनाला जायचो. छान नवीन शिवलेले कपडे घालून, देवळात जायचो..साधारण आमच्या बहिणींचे फ्रॉक सेम असत अगदी नीट आम्हाला कळायला लागेपर्यंत ...
देवळात जाऊन आले की सगळे एकत्र फराळावर ताव मारायचा...तेव्हा आमच्याकडे कामाला असणारे सगळे ही लवकर येत आणि तेही फराळाला असायचे...तेव्हा गूळ, नारळ घालून गोड पोहे ही आई करायची...
फराळ झाला की परत थोड खेळून वगेरे झाल की खर तर झोप यायची खूप लवकर उठल्यामुळे...पण मग लवकर जेवून झोपा अस आई सांगत असे..मग जेवून छान झोप काढायची आणि मग लक्ष्मी पूजन असायचे...तेव्हा आळीतील व्यापारी वर्ग दुकानात पूजेला बोलवत असतं...तिथे आम्ही जायचो...
अशी चार दिवस फक्त आणि फक्त मजा असायची...भाऊबीजेला संध्याकाळी आमची ओवाळणी व्हायची..आई छान ड्रेस किंवा काहीतरी वेगळे आम्हा बहिणींना आणायची.. मामा येत असे घरी आणि बाबा आत्याकडे जायचे भाऊबीजेला...अशी चारही दिवस दिवाळी अगदी खूप उत्साहात आणि आनंदात साजरी होत असे लहानपणी...
लहानपण म्हटलं की किती छान आठवणी असतात आणि मग किती बोलू आणि किती काय अस होतं माझं...काय म्हणताय तुमचं ही असच होतं ना? पण या अमूल्य आठवणी कधीच संपणार नाहीत आणि संपूही नयेत कधीच...पण आत्ता इथेच थांबते पण आठवणी मात्र येतच आहेत त्याची मजा घेते...तुम्हीही तुमच्या आठवणी आठवा जरा मैत्रिणींनो😊...
अशी मस्त दिवाळी लहानपणीची अजूनही प्रत्येक वर्षी आठवते.. इतक्या वर्षांनी ही सगळ चित्र जसच्या तसं डोळ्यापुढे उभ राहतं...एकीकडे आईच्या आणि आजीच्या आठवणींनी छान ही वाटतं पण डोळ्याच्या कडा ओलवतात...मग हळुवार डोळे टीपायचे आणि मनात आठवणी अधिकच जपायच्या अगदी हळुवारपणे...आणि आता छान आठवणी मुलांना, भाचा,भाचीला सांगायच्या...मग मस्त आनंद मिळतो आम्हालाही आणि मुलांनाही...
