Sayali Diwakar

Others

2.0  

Sayali Diwakar

Others

अनोखा प्रवास

अनोखा प्रवास

10 mins
1.1K


  ‘पिराची वाडी’ चहूबाजूंनी डोंगरद-यानी वेढलेलं छोट्या वस्तीच गाव. ह्या छोट्याशा गावाला चारीबाजूने जणू हिरव्या रंगाच्या चादरीने साऱ्या जगापासून दूर कुठे तरी लपेटून ठेवले होते. साधारण ४०-५० घरे असलेली ही वस्ती संपूर्ण जगापासून पूर्ण दूर, अनभिज्ञ, आपल्याच जगात पिढ्यानपिढ्या जगत होती. ह्या डोंगरकपारीत कोणत्याही सोयी-सुविधांपासून वंचित असलेली ही वस्ती गरिबी, व अज्ञानात जगत होती. गावात नुसतीच वीज नाही म्हणून हे गाव काळोखात नव्हते तर ज्ञानाच्या ज्योतीपासून अनेक कोस दूर हे गाव आपल्याच कोशातच जगत होते. अशा स्थितीत रस्ते, दवाखाने, शाळा ह्या आवश्यक गोष्टी आहेत ह्याची समज देखिल ह्या वस्तीवाल्यांना नव्हती. पण ह्या परिस्थितीची कोणालाही खंत नव्हती. पिढ्यानपिढ्या आपण आहोत तिथेच कष्ट करून हातावर पोट भागवणारी ही मंडळी आहे त्यात समाधान मानून घेणारी होती.

    पण ह्याच वस्तीत आज पहिल्यांदाच पोस्टमन पत्र घेऊन सदाभाऊच्या घरी आला होता. पोस्टमनकडे आश्चर्याने पहात सारी वस्तीच सदाच्या घरासमोर जमा झाली होती. आता हा पोस्टमन काय सांगावा घेऊन आलाय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण पोस्टमनने सदाभाऊच्या पोराचे, विनायकचे पत्र वाचून सदाभाऊला आनंदाची वार्ता दिली की, “अरे सदाभाऊ, तुझ्या पोराच अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण होऊन तिथेच नोकरीपण लागली आहे. आता तो दोन दिवसांनी पिराच्या वाडीला, तुम्हाला भेटायला येत आहे. सदाभाऊ, तुमचा विनायक अमेरिकेत साहेब झाला. पोरानं मोठ नशीब काढलं बघा.”

    वस्तीतल्या सदाचा पोरगा ‘इन्या’ म्हणजेच विनायक, मोठा साहेब झाला ते पण अमेरिकेत, हे ऐकून वस्तीतल्या साऱ्या लोकांनी तोंडात बोटे घातली. पण एके काळी ह्याच वस्तीवाल्यांनी, इन्याला शाळा शिकायला पाठवले म्हणून सदाला खुळ्यात काढलं होतं. “आपली पोरं साहेब बनत नाहीत आणि शिकून कुणाच भलं झालंय? नस्त खूळ डोस्क्यात घिवू नगं.” असं समजावल पण होतं. पण तरी हार न मानता, सदाला आपल्या पोराला शिकवून मोठा साहेब बनवायचं होतं आणि सदाचे हे स्वप्न पूर्ण करून त्याचा इन्या, साहेब बनून पिराच्या वाडीला दोन दिवसांनी परत येणार होता.

    सदा आणि त्याची बायको सारजा, दोघांनाही आता जरासुद्धा धीर धरवत नव्हता. इन्याला कधी एकदा डोळे भरून पाहतोय असं त्या दोघांना झालं होत. इतक्या वर्षाची तपश्चर्या आता फळाला आलेली पाहून सदाचा उर सारखा दाटून येत होता, त्याचे डोळे आनंदाश्रुंनी भरून येत होते, सारजाची स्थितीही फार वेगळी नव्हती. ते दोन दिवस सदाभाऊच्या घरीच काय संपूर्ण वस्तीत अगदी लगबग चालू होती. सर्व वस्तीत चर्चेला नुसतं उधाण आलं होतं. जो-तो विचार करत होता की अमेरिकेहून आलेलं पोरगं त्याच्या बापाशी आणि मायशी कसं वागंल. त्यांच्याशी नीट बोलंल का? वस्तीतल्या लोकांना, बालपणीच्या मित्रांना ओळख तरी दाखवंल का? कुणी म्हणत होते की, “आरं, शिकल्या-सवरल्या पोरांना आपल्या सारख्या गावकऱ्यांचीच काय पण आपल्या गरीब आय-बापाची सुध्दा लाज वाटते. इन्या काय आपल्याला ओळख दाखवणार न्हाय.”

    हे सगळं ऐकून सदा नी सारजाला काहीच सुधरत नव्हतं. वस्तीवाल्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की आपल्या मुलाच्या प्रेमावर. त्याच काळजीनं सारजा सदाला म्हणाली, “आवं, मला काळजात सारखी धुक-धुकी वाटतीय, इतकं शिकलं सवरलेलं, साहेब झालेलं पोरगं आपल्याला इच्यारल ना? आपल्या संग चार शब्द बोलंल नव्हं? अन्, आपण तरी त्याच्या संग कस बोलायचं? मला तर लई काळजी वाटतीया बगा.” तेव्हा तिला धीर देत सदा म्हणाला, “अग सारजे, पोराला आपली आटवन हाय, म्हनून तर तो परत येतोय न्हवं! इतका चांगला दिस हाय, आता उगीच डोळ्यातन टिपं काढू नगंस. अन् मला एक सांग, आपलं सपान काय हुत? की इन्यान ह्या पिराच्या वाडीच्या बाहेर जाऊन, शेरातल्या लोकांसारखं चांगलं, ह्या वस्तीच्या पल्याडच आयुष्य जगावं. आपल्या इन्याने ते करून दाखवलं. मला तर आता इन्याकडून कन्चीबी अपेक्षा न्हाय बग. आपल्यापेक्षा सुखी आयुष्य आपलं पोरग जगतय, ह्यापेक्षा त्या ईश्वराकडे काय मागायचं. सारजे, आपलं काय गं, आपण ह्या मातीत जल्मलो अन आपली माती बी शेवटी ह्याच मातीत होणार.”

    सदाभाऊचा जन्म इथल्या पिराच्या वाडीतल्या वस्तीतच झाला. त्याचे आई-बाप ह्या डोंगर-कपारीतला आडोसा बघून इथे राहू लागले आणि इथलेच झाले. बाकीची वस्तीपण अशीच पिढ्यानपिढ्या इथे राहिलेली. ह्या डोंगर कपारी पालथ्या घालत अन् बापाबरोबर शेती करतच सदा लहानाचा मोठा कधी झाला, त्यालाच समजलं नाही. सदानकदा शेतातच काम केल्यामुळे सदाला बालपण असं काही असत हे कळलच नाही. लहान वयातच सारजा बरोबर सदाच लगीन झालं. कालानुसार आता आई-बापा पैकी कुणीच राहिले नव्हते पण त्यांच्या आशीर्वादाने तीन-चार एकर जमीन, काही शेळ्या आणि गौऱ्या व हौद्या ही बैल-जोडी त्याला मिळाली. घरची श्रीमंती जरी नसली तरी पोटापाण्यापुरत मिळवण्याची हिंमत नवरा-बायकोत नक्कीच होती. ह्या पिराच्या वाडीतच लहानाचा मोठा झालेल्या सदाला व ह्या वस्तीवाल्यांनाही ह्या वस्तीच्या पलीकडची दुनिया माहित नव्हती.

    पण शेतमालाच्या विक्रीच्या निमित्ताने सदा हल्ली जिल्ह्याच्या गावी जाऊ लागला होता. सदा जेव्हा जेव्हा जिल्ह्याच्या गावी जायचा तेव्हा तेव्हा तो अगदी हरखून जायचा. तिथला बाजार, तिथले रस्ते, गाड्या, बस आणि तिथली शिकलेली रुबाबदार कपड्यातली माणसं बघून तो चकित व्हायचा. संध्याकाळनंतर लागलेल्या त्या लाईट, दुकानातील तो झगमगाट बघून तर त्याचे डोळे दिपून जायचे. आणि मग तो परत आला कि खूप उदास व्हायचा. सारजाला तो म्हणायचा, “सारजे, दुनिया कुठच्या कुठं चाललीया, आपण मात्र मुंगीच्या गतीनं बी फूड जात न्हाई जिथं व्हतो तिथच हाय. भाईरची मानस शिकली-सवरली शर्ट-पँट घालून सायेब झाली. बसमधी काय बसतायत, गाडीत काय बसतायत, फटफटी काय चालवतायत. पण आपण.. आपला जल्म इथल्या मातीत झाला आणि आपली माती बी इथल्या मातीतच हुणार.” हे ऐकून सारजाला काय बोलावं तेच कळायचं नाही. ती वैतागून सदाला म्हणायची, “भाईरची दुनिया कुट का जाईना. आपलं नशीब कोण बदलणार हाय का? आपली दुनियाच इथ हाय तवा आपला जल्म बी इथच जाणार.”

    काळ वेगाने पुढे-पुढे जात होता पण पिराची वाडी पिढ्यानपिढ्या आहे तिथच होती. आणि अशा वेळी सदाभाऊच्या घरी आनंदाचा दिवस आला. ह्याच वस्तीच्या कुशीत त्याच्या मुलाचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर सदा आणि सारजाचे आयुष्यच पालटून गेले. मोठ्या हौसेने सदाने मुलाचे नाव विनायक ठेवले. मुलाच्या बारश्याला त्याने साऱ्या वस्तीला जेवण दिले. त्याच दिवशी त्याने ठाम निश्चयाने सारजाला बजावले, “सारजा, काय बी झालं तरी मी माझ्या पोराला लई शिकवनार आनी सायेब बनवनार. ह्या पिराच्या वाडीतील अंधारातून त्याला नव्या जगात पाठिवनार.” सदाभाऊच्या ह्या निर्णयाला मात्र सारजाने पूर्ण पाठिंबा दिला.

    इन्याच्या जन्मानंतर त्याच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटेने ती दोघे आता झपाटून धावू लागली. आपल्या पोराच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये म्हणून दोघही आपल्या देहाच्या काड्या झिजवू लागली. वस्तीतच एका पडक्या छपराच्या घरात मानेमास्तर शाळा चालवायचे. त्याच शाळेत सदाभाऊने इन्याला दाखल केले. इन्या जात्याच हुशार असल्याने लवकरच तो अक्षरात रमला. बघता बघता मानेमास्तरांच्या मार्गदर्शनात इन्या चौथीची परीक्षा पास झाला. पण ही शाळा चौथीपर्यंतच होती आणि पुढील शिक्षणासाठी मुलांना जिल्हयाच्या गावी जावे लागे. त्यामुळे वस्तीतील कुणीही मुलगा पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेला नव्हता आणि त्यांच्या आई-वडीलांनीही त्यात कधी उत्साह दाखवला नव्हता. पण सदाभाऊ मात्र लगेच जिल्हयाच्या गावी जाऊन इन्याच्या पुढील शिक्षणाची चौकशी करून आला. पण त्यासाठी इन्याला तिकडेच वसतीगृहात राहावे लागणार होते. त्यामुळे त्याच्या आईचा, सारजाचा जीव धाकधूक करीत होता. एवढस पोरग तिकडे एकट कस राहणार ह्याची चिंता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. पण सदाच्या हट्टापुढे तिचे काही चालले नाही. वस्तीतल्या लोकांनी पण त्याला खुळ्यात काढलं आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, “आर सदा, आपल्या गावातल कुणी बी पोरगं ही वाडी सोडून कदी गेलं न्हाई. अन तु र काय नस्त खूळ डोक्यात घ्येतलयस. गपगुमान पोराला शेतीच्या कामाला लाव अन तू निवांत हो कि.”

    पण शाळा सुरु होण्याआधीच सदा इन्याचा हात धरून जिल्ह्याच्या गावी घेऊन गेला. तिथे त्याने इन्याला नव्या दुनियेची ओळख करून दिली. “इन्या, हे बघ, हे मोठ शहर हाय, गाड्या, बशी, रस्ते, अन ही मोठाली घर. आता तुला ह्याची सवय करून घ्यावी लागल बाबा. इन्या! खूप शिक, मोठ्ठा सायेब हो आणि एक दिस इथल्या शिकलेल्या लोकांवानी बसमधून फिर. आमच्या बापजाद्यात कधी कुणाला काय बी मिळालं न्हाई. prपर पोरा तू सगळ मिळव.” जिल्ह्यातल्या शाळेत गेल्यावर इन्याला ती शाळा, ते वातावरण याची सवय व्हायला जरा वेळ लागला. तिथली मुल इन्याला चिडवायची, त्याची चेष्टा करायची. पण आपल्या शिक्षणासाठी आपल्या आई-बापाला किती त्रास पडतोय हे इन्या जाणून होता. त्याने आपले सारे लक्ष अभ्यासात घातले आणि इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. परिस्थितीची जाणीव असलेला इन्या लवकरच १० वीच्या परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पिराच्या वाडीत सर्व वस्तीत साखर वाटताना सदा ओरडून ओरडून सांगत होता, “माझा पोरगा पास झाला.”

    आपल्या वस्तीतल पोरग शहराच्या शाळेतन पास होऊ शकत ह्याच सगळ्याच वस्तीला आश्चर्य वाटलं. रात्री सर्व वस्तीवाल्यानी मारुतीच्या पारावर बसून इन्याच कौतुक केलं आणि सदाला सल्ला दिला, “सदा, आता पोराला तालुक्याच्या गावात कामाला लाव, तिथे त्याला काय ना काय तरी काम नक्की घावल.” पण सदाभाऊने ठाम नकार देत वस्तीवाल्याना सांगितले, “माझ्या इन्याला मी सायेब बनवनार हाय, त्याला अजून शिकवनार हाय.” हे ऐकून वस्तीतले सगळे कपाळावर हात मारतात व पुन्हा त्याला समजावयाचा प्रयत्न करतात, “आर सदा, यडा का खुळा तू! एकुलत एक तुझ पोरग, आता काय हातचं घालवनार हायेस व्हय? आर अजून शिकवलस तर पोरग शहरगावातून परत येणार हाय का? तुमच्या म्हातारपणात तुमास्नी कोन विचारनार. आर, सायेब बनवायचं खूळ घेतलयस म्हणून बाकीचा काय इचार करशील का नाय?” पण सदाभाऊने आपण इन्याला शिकवनार हे सगळ्यांना ठामपणे सांगितल. “तात्या, आमचा दोघांचा जल्म इथ झाला, अन आमची माती बी हितच व्हणार. आमच्या आयुष्यात आमी काय बी करू शकलो नाही, pपर आपल्यासाठी पोराला कशाला अडवायचं, मी पोराला शिकवनार.”

    मारुतीच्या पारावर साखर वाटून घरी आल्यावर सदा सारजाला पण साखर देतो आणि आपल्या पोराच कौतुक करतो. पण मघाशी पारावर झालेलं बोलणं ऐकून सारजाला साखरपण कडू लागते. कारण आत्तापर्यंतचा शिक्षणाचा खर्च कसातरी भागवला पण आता इथून पुढचा खर्च कसा करायचा? कुटन पैसा आणायचा? ह्यास्नी काय होतंय मोठ-मोठ्या बाता करायला, सायेब बनवन काय सोपं हाय का? कसं होणार हाय पुढ कोन जाणे.” तिला वाटल आपलं पोरग पास नसत झालं तर पुढचा प्रश्नच उभा रहिला नसता. आता हा पुढच्या शिक्षणाचा बोज्या कसा पेलायचा ह्याचीच चिंता तिला सतावत होती. पण सदान ह्यातन एक तोडगा काढला आणि त्यासाठी त्याने एक कठोर निर्णय घेतला. आपल्या पोरासाठी त्याने गौऱ्या व हौद्या ह्या आपल्या लाडक्या बैलजोडीला विकायचे ठरवले. हे ऐकून तर सारजा मटकन खालीच बसली अन म्हणाली, “अव, कुटली अवदसा तुमास्नी आठवलीया, ती नुसती बैल न्हाईत तर माझी पोरच हायत. त्यांना इकायला चाललाय म्हणजे माज्या काळजाचा तुकडाच मोडणार की तुमी”. अन सारजाला रडू आवरेनासे झाले. पण सदा तरी काय करणार. त्याच्या पुढ दुसरा मार्गच नव्हता. शिवाय प्रश्न फक्त बैलजोडीचा नव्हता, तर त्यांना विकल्यावर त्यांच्या जागी सगळी काम सदा व सारजालाच करावी लागणार होती. पण पोराच्या सुखासाठी त्यांनी जणू आपल्याच देहाचा नांगर केला.

    इन्याने पण आपल्या आई-बापाची आब राखत पुढील शिक्षण मोठ्या कसोशीने पूर्ण केले. त्याचे आईबाप शेतात राबत होते तर त्यांचा इन्या इथे पार्ट-टाइम नोकरी करत शिक्षण घेत होता. आणि त्याच्या या मेहनतीचे आणि अभ्यासाचे फळ म्हणजे इन्यालापुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली आणि तो अमेरिकेत गेला. पण तिथे सुद्धा तो आपल्या आईबापांना विसरला नाही. त्याला कायम जाणिव असायची की त्यांनी आपल्याला किती प्रतिकूल परिस्थितीतून शिकवलं आहे. रोज रात्री झोपताना त्याला आपल्या मायची दुखणारी खडबडीत पावलं आठवायची अन वडिलांचा कष्टाने घट्टे पडलेला खरखरीत हात. तेव्हा त्याला वाटायचं की मी माझ्या देहाचा पाळणा करून जरी त्यांना सुखी ठेवायचा प्रयत्न केला तरी कमीच पडेल. तेव्हा लवकरात लवकर नोकरीला लागून त्यांची दु:ख दूर करायची आणि त्याचं आयुष्य आनंदानं फुलवायचं.

आणि आज तो दिवस उगवला. साऱ्या गावाला इन्या येणार असल्याची खबर मिळाली होती. आणि सारा गाव सदाच्या घरासमोर जमला होता. दुपारच्या वेळी पिराच्या वाडीत मातीच्या धूराळ्यातून रस्ता काढीत एक मोटारकार गावात शिरली. गाडीच्या पों-पों च्या आवाजाने सारी वस्ती दणाणून गेली. सदाच्या घरापुढे ती अलिशान गाडी थांबली, ड्रायव्हरने उतरून आदबशीरपणे गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून विनायक साहेबांची स्वारी उतरली. सारजा, सदाभाऊ अन सारी वस्ती आ वासून पाहतच राहिली. त्याची गाडी, त्याचे कपडे, ड्रायव्हर आणि त्याच्या मोठाल्या बॅगा पाहून, वस्तीवालेच काय पण सारजा व सदाची पण पुढ होऊन त्याच्याशी बोलायची हिंमत झाली नाही. पण आईला जशी बछड्याला बिलगायची ओढ लागली होती तितकीच ओढ बछड्याला पण आपल्या आईला, बापाला भेटायची झाली होती. सगळा थाटमाट सोडून इन्या लहान मुलासारखा आपल्या आईबापाला बिलगला. तीव्र आवेगाने तिघांची गळाभेट झाली. कितीतरी वेळ तिघांच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते. मग इन्याने आपल्या आईवडिलांना नमस्कार केला, दोघांची मूर्ती तो जणू डोळ्यात साठवत होता. सदा नी सारजाला तर काहीच समजत नव्हते. त्यांची गळाभेट पाहून साऱ्या वस्तीचेच डोळे पाणावले नसतील तर नवल. सदाचा पोरगा साहेब झाला, यावर अजूनही विश्वास न बसणारे लोक त्याचा साहेबी थाटमाट पाहून चकीतच झाले.

साऱ्या वस्तीने व मानेमास्तरांनी विनायकचा शाळेत सत्कार समारंभ केला. तेव्हा विनायकने सर्वांसमोर एक धक्कादायक बातमी सांगितली. “मी माझ्या आई आणि वडिलांना माझ्या बरोबर अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी आलोय.” हे ऐकून सारी वस्ती एकमेकांत कुजबुजू लागली. ह्या अडानी आईबापाला एवढ्या लांब, परक्या देशात नेऊन हा करणार तरी काय? साऱ्या वस्तीने एकच सूर काढला, “जसा बाप खुला होता तसाच पोरगाबी खुळावला हाय.” इन्याचे बोलणे ऐकून सारजा आणि व सदाच्या काळजात एकदम धस्स झाले. आतापर्यंतचे सारे आयुष्य पिराच्या वाडीत काढलेले ते दोघे पोराच्या निर्णयाने चकीतच झाले. घरी आल्या आल्या सारजाने इन्याला त्याच्या बरोबर जायला ठाम नकार दिला. “इन्या, तुझा तू तिकड सुखी रहा. आमी दोग बी इथ गावच्या मातीतच सुखी हाय.” सदाने पण पोराला समजावलं, “पोरा, तुला इथन बाहेर काढायचं, मोठ करायचं, एवढच आमचं सपान होत. तू सायेब झालास, आता आमाला काय बी नग. तुज्या सुखातच आमी दोग बी सुखी हाय. तू आमची जरा सुदिक काळजी करू नगस. तुजा तू आनंदाने तिकडे जा.”

विनायकने दोघांच्या हाताला धरून खाली बसवलं, त्यांना शांत केलं, आणि समजावलं, “माय-भाऊ, मला तुमचं दोघांच पटतंय. आत्तापर्यंत तुम्ही दोघांनी माझ्या भविष्यासाठी सर्व जबाबदारी घेतलीत. आता माझी वेळ आहे तुमची जबाबदारी घेण्याची. तुमच्या दोघांना पोराला सुखी ठेवण्याची धडपड होती ना, आता मला तुम्हाला सुखात ठेवायची धडपड करू द्या. तुम्ही मला ह्या काळोखातून बाहेर काढून नव्या दुनियेत जायचं स्वप्न दाखवलत. आता माझं स्वप्न आहे तुम्हाला ह्या पिराच्या वाडीच्या बाहेरची वेगळी दुनिया दाखवण्याच. इतके दिवस जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून तुम्ही दोघांनी आयुष्य काढलत, तर आता तुमची सेवा करण्याची संधी मला द्या. तुमच्या शिवाय मला प्रगती नको, कोणतही सुख नको. तुम्ही दोघ बरोबर असाल तर माझ्या आनंद, सुखाला मापच राहणार नाही. पण जर तुम्ही दोघ आला नाहीत तर मी पण अमेरिकेला जाणार नाही, हे नक्की.”

विनायकच बोलण ऐकून दोघांनापण काय बोलव तेच समजेना. पोराकडे बघून दोघांचा पण उर दाटून आला होता. दोघपण जागच्या जागीच थिजून गेल्या सारखी झाली होती. इन्या अमेरिकेला जायच्या तयारीला लागला. प्रवासाची सारी तयारी तो लगबगीने करू लागला. उघड्या डोळ्यान दोघपण पोराकडे बघत होती पण पोराच्या प्रेमापुढे त्यांना काय बोलावे सुचत नव्हते. सगळी वस्ती आ वासून बघत होती. आज पिराच्या वाडीत काहीतरी अघटित घडत होतं. पिराची वाडी सोडून अलिशान मोटारीत बसून पिराच्या वाडीच्या वस्तीतला पोरगं आपल्या माय-भाऊला घेऊन अमेरिकेच्या प्रवासाला निघाला, एका अनोख्या प्रवासाला. गाडीच्या खिडकीतून पिराची वाडी मागे पडताना सदा व सारजा डोळे भरून पहात होती. तेव्हा गाडीच्या भोवती उडालेल्या धुळीच्या मातीकडे पाहून सदाचा उर भरून येतो आणि तो पिराच्या वाडीकडे आणि आपल्या पोराकडे नवलाईने बघत राहतो.





Rate this content
Log in