आठवणीतला गाव
आठवणीतला गाव


असाच एकदा मी माझ्या गावापासून साधारणतः वीस-पंचवीस मैलावर असणार्या एका गावात गेलो होतो. माझ्या बरोबर माझा भाऊही होता. त्यांचेच त्या गावात काही तरी काम होते. मी फक्त सोबतीला गेलो होतो. गावात पोहोचलो त्यावेळी सायंकाळ झाली होती. पाळीव जनावरे घरी परतत होती. काही रानात चरत होती. खूप अशी माणसे दिसत नव्हती. छोटी मुले मात्र थोड्या अंतरावर खेळत होती. त्यांचा खेळही खूप रंगात आलेला होता. ते गाव तसे खूप छोटे होते. साधारणतः पंधरा-वीस घरे असतील. पण तो गाव खूप खुप सुंदर दिसत होता. डोंगराच्या कुशीत लपलेला चोहिकडील परीसर हिरवागार दिसत होता. वार्याची ती मंद झुळुक मनालाही गारवा जाणवत होता. त्या गावच्या गाव दैवताचे मंदिरही छान दिसत होते. त्या मंदिरावरील कलशावरील ती भगवी पताका... गावातील महिला ओळीने पाणी भरताना दिसल्या... काहीजणी शेतीतील कामे करून परत येत होत्या. त्या खेळत असलेल्या मुलांपैकी एकाला जवळ बोलावले. त्या मुलाला आम्हाला ज्याच्या घरी जायचे होते. त्यांचे नाव सांगितले. त्याचे ते मळलले कपडे, तो अवतार पाहून मला लहानपणाची आठवण आली. त्या मुलाने आम्हाला ज्या घरी जायचे होते त्या घरी सोडले. आणि तो पुन्हा उड्या मारत खेळायला गेला. मी मात्र घराबाहेर थांबलो होतो. तो परीसर, निसर्ग न्याहाळत होतो. खूप छान वाटत होते. सुंदर स्वप्नातील जसे गाव असते ना तसे गाव मी पाहात होतो. तेथील माणसे शेतीतून काम करून आलेली. त्यांच्या चेहर्यावर ते दमलेले भाव दिसत होते. त्या गावात कोणीही एकमेकांच्या घरी उगाच गप्पा मारताना मात्र दिसले नाही. आता थोडा अंधारही झाला होता. गावातील लाईट लागल्या होत्या. परत निघायचे म्हणून गाडी जवळ चाललो होतो तेवढ्यात मगाशी जो आम्हाला मुलगा सोडायला आला होता ना तो पुन्हा आला होता. हातात बिस्कीटं दिसत होती. तो मुलगा खूप प्रेमळ वाटत होता. आता गाडी जवळ पोहोचलो होतो. गाडीवर बसलो आणि निघालो. त्या वेळी तो मुलगा व त्यांचे मित्र आम्हाला बाय बाय करत होते. चंद्राचा प्रकाश पडला होता. त्या लख्ख प्रकाशातही ते गाव खूप उजळून निघाले होते. जणू स्वर्गात आहे की काय याचा भास होत होता. गावाची वेस सोडून गाडी मुख्य रस्त्याला लागली होती. असे गाव भुतलावर मी पहिल्यांदा पाहिले होते. या गावाची आठवण माझ्या मनात मात्र वेगळीच जागा निर्माण करून गेली.