STORYMIRROR

Sanjay Ronghe

Children Stories

2  

Sanjay Ronghe

Children Stories

आठवण

आठवण

5 mins
145

   मन आठवणींचा डोह असतो नाही का. अगदी बालपणापासूनच्या तर आत्ता एक क्षणापूर्वी पर्यंतच्या साऱ्याच आठवणी त्या डोहात साचलेल्या असतात. त्या आठवणींना थोडा उजाळा द्या आणि तो मग तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आपल्या डोळ्यापुढे अभ राहतो. यात सुखाचे क्षण असतात. काही दुःखाचे क्षण असतात. काही अंगावर काटा आणणारे प्रसंग असतात तर काही मनाला रोमांचित करणारे प्रसंग असतात. किती किती गोष्टी या डोहात जशाच्या तश्या साठवून राहतात. अशीच एक आठवण... ती आठवताच माझ्या मनाला सुखावून जाते. आणि मग माझा मीच माझ्यावर हसत राहतो. काय ते बालपण आणि कसले ते विचार. 


   त्या वेळी मी लहानच बहुतेक दुसरी तिसरीत असावा. तो दिवस रविवारचा असावा कारण त्या दिवशी मी घरीच होतो. आईची कामाची धावपळ सुरू होती. पप्पा बाहेरगावी कुठे तरी गेलेले होते. आईचा स्वयंपाक आटोपला आणि तिने जेवायला वाढले. मी आणि आई जेवायला बसलो. आईने मला सकाळीच केलेले गरम गरम जेवण वाढले भाजी, पोळी, वरण, भात ताटात होते. मी आईच्या ताटाकडे बघितले. तिच्या ताटात रात्रीच्या उरलेल्या पोळीचा फोडणी दिलेला चिवडा दिसला. तो बघून मलाही तो खायची इच्छा झाली आणि मी हट्टच धरून बसलो . मला तोच आईच्या ताटातला चिवडा हवा होता. पण आई माझ्या तब्येतीच्या काळजीपोटी तो द्यायला तयारच नव्हती. पण मला तर तोच चिवडा हवा होता. मी हट्टालाच पेटलो होतो. शेवटी आईने मला दमच भरला. म्हणाली ताटात जे वाढून दिले तेच खा नाही तर उपाशी राहा. तुला तो शिळ्या पोळीचा चिवडा मिळणार नाही. त्या पोळ्या काल दुपारच्या आहेत. त्याने तुझे पोट दुखेल. पण मी कुठे मानणार. मला तेच हवे होते. मीही मग हट्टच धरून ठेवला . माझा हट्ट बघून तीही जिद्द धरून बसली . म्हणाली नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार . नसेल खायचे तर उठ आणि चालायला लाग. फालतूचे लाड खूप झालेत. मलाही मग खूप राग आला आणि सरळ उठून बाहेर आलो आणि चालायला लागलो. 


   कुठे जायचे काहीच कळत नव्हते. मनात विचार आला आई नेहमीच मला रागावत असते. नकोच हा तिचा रसाग. मनात मग एक वेगळाच विचार डोक्यात आला. घर सोडून पळून जण्याचा विचार. चला घर सोडून पळून जावे . तेच बरे होईल. मग रागवत बस म्हणा आईला कुणाला रागवायचे ते. मी नसेल तर कुणावर रागावेल बघू या. शेवटी मी ठरवलेच, मी आता इथे नाही राहणार. जाईल कुठेही. राहील एकटा कसाही. आणि सरळ बाहेर येऊन वाटेला लागलो. कुठे जायचे काहीच कळत नव्हते. मग आठवले पेपर मध्ये वाचले होते कोणी एक मुलगा घरातून पळून जाऊन मुंबई ला निघून गेला होता . मुंबई किती मोठे शहर आपल्याला तिथे कोणीच ओळखणार नाही. आणि रागावणार पण नाही कोणी. छान आरामात राहू. अभ्यासही नसेल, आईचा राग नसेल, पप्पांचा मार पण नसेल . मुंबईला जाणेच छान राहील. मग मीही ठरवले आपण मुंबईलाच जायचे. राहू कुठेही कसेही मुंबईत. तिथे आईचे रागावणे तर नसेल. तेच खूप छान होईल. आणि मी निघालो रेल्वे स्टेशन कडे. 


   खूप चालल्या नंतर मी स्टेशनवर पोचलो. खूप चालल्याने पाय खूप दुखत होते. स्टेशन वॉर खूप गर्दी होती. गर्दीतून वाट काढत मी फ्लॅटफॉर्म वर जायला निघालो पण मधेच टी सी उभा होता. मनात विचार आला, टी सी ने पकडले तर काय करायचे. तिकीट घ्यायला खिशात पैसे पण नव्हते. गर्दीतून लपत छपत मी तसाच प्लँटफॉर्म वर आलो. तिथे तर गर्दी खूप जास्त होती. काहीच सुचत नव्हते. पायही खूप दुखत होते. तिथेच एक रिकामा बेंच बघून मी बेंचवर बसलो. कोणी आपल्याला बघत नाही याची काळजी घेत बराच वेळ बेंचवरच बसून राहिलो. गाड्या येत होत्या जात होत्या. उतरणारे लोक घाई घाईने उतरत होते. चढणारे लोक घाई घाईने चढत होते. पोचवायला आलेले लोक टाटा बाय बाय करून परत जात होते. मी खूप वेळ तेच चित्र बघत राहिलो. आणि मला पण मुंबई ला जायचे आहे हे विसरून गेलो. अजूनही पाय दुखत होते. उठावेसेच वाटत नव्हते. मग हळूहळू पोटात कावळे ओरडायला लागले. फ्लॅटफॉर्मवर चहा आणि खाण्याचे पदार्थ विकणारे ओरडून ओरडून पदार्थ विकत होते. त्यांना बघून मला भूक जाणवायला लागली. त्या पदार्थांचा सुगंध मला सारखी भुकेची जाणीव करून देत होता. आता तिथे बसणे मला अगदी कठीण होऊन गेले होते. 

   

तसा मी स्टेशनच्या बाहेर आलो. आणि घराच्या दिशेने परत निघालो. सकाळचा माझा राग निवळला होता. आणि त्याची जागा भुकेने घेतली होती.

आमच्या घराच्या जवळ एक मंदिर होते. नकळत माझे पाय मंदिराकडे वळले. मी मंदिरात आलो. देवाचे दर्शन घेतले आणि मग परत आई आठवली. परत घरी गेल्यावर आई रागावेल, कदाचित इतका वेळ कुठे होता म्हणून मारही देईल या भीती पोटी मी देवळातच बसून राहिलो. तिथून उठावेसेच वाटत नव्हते. आता पाय पण खूप दुखत होते आणि भुकेचे तर विचारूच नका. सारखा मनात विचार येत होता, आजू बाजूला कुणाच्या घरी जावे आणि भिकारी जशी भीक मागतात तशी भीक मागून आणावी आणि भूक शांत करावी. पण त्याचीही लाज मनात वाटत होती. मग बाजूला पाण्याचा नळ होता त्यावर जाऊन पोटभर पाणी पिलो. आता थोडे शांत वाटत होते. आणि मग मी तसाच तिथे मंदिरात खूप वेळ बसून राहिलो. किती वेळ तसाच गेला ते कळलेच नाही. आई बद्दलचा राग आणि भीती मात्र मनातून जात नव्हते. आता सायंकाळ व्हायला आली होती. परत भूक आपले डोके वर काढत होती. मग मात्र मी तिथून बाहेर आलो.बाहेर येऊन घराच्या वाटेकडे पाहत किती वेळ उभा राहिलो ते कळलेच नाही. मन द्विधा परिस्थितीत अडकले होते.


आता आईची खूपच भीती वाटायला लागली होती. वाटत होते आता मार पक्का मिळणार. मन सारखे रडत होते. काहीच सुचत नव्हते. असा बराच वेळ निघून गेला. तशातच मला आई तिकडेच येताना दिसली. तसा मी आणखीच घाबरलो . काय करावे काहीच कळत नव्हते. आणि मग मी जिवाच्या आकांताने पळायला लागलो. तशी आईही माझ्या मागे धावायला लागली. मी पुढे आणि आई मागे मला आवाज देत असा पाठलाग सुरू झाला. बरेच अंतर मी पार केले होते आणि आई मागे पडली होती. मात्र मधेच एका व्यक्तीने माझे बखोटे धरले आणि मला माझ्या आईच्या स्वाधीन केले. मी पुरता घाबरून गेलो होतो. आईच्या माराची भीती वाटत होती. आणि त्या भीती पायी मला रडायला येत होते. मी रडत होतो आणि सोबत माझ्या माझी आईही रडत होती. समजावत होती. बाळा असे कोणी निघून जातात का. चल घरी चल. तुला भूक लागली असेल ना चल जेवण कर. घरी चल. कुठे गेला होता माझा बाळ. शोधून शोधून थकून गेली रे मी तुला. आणि तू इथे देवळात लपून बसला होतास. असं परत कधी कधीच जायचे नाही बरं का. असा राग बरा नसतो बरं. त्यात तुलाही त्रास होणार आणि मला पण त्रास होणार. चल बाळा चल घरी चल. तुही जेवला नाहीस आणि मी पण जेवली नाही रे तुझ्यासाठी. आणि मग तिने मला तिच्या कुशीत घेतले आणि खूप खूप पापे घेतले. तीही माझ्या सोबत सारखी आसवे गाळत होती. हुंदके देत होती. मग आम्ही घरी आलो. आईनेच माझे हात पाय धुवून दिले आणि जेवायला वाढले. आईनेच मग स्वतःच्या हाताने मला भरवले. तिच्या डोळ्यातले आसवं मात्र थांबत नव्हते. खरच आई ही आईच असते.


Rate this content
Log in