आलीया भोगासी
आलीया भोगासी


आज ऑफिसातून तो जरा लवकरच घरी आला आणि मोठया आशेने सोफ्यावर बसून त्या चौघीँना पाहत राहिला ..
आजी, आई, बायको आणि सूनबाई-
मोठ्ठा आवाज केलेल्या टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसलेल्या दिसत होत्या !
दिवसभर या ना त्या कारणाने, एकमेकीपासून दूर राहणारी ती चार तोँडे,
"एकटीव्हीसमभाव" या न्यायाने टीव्हीसमोर मात्र शेजारीशेजारी न भांडता, चिटकून बसलेली दिसत होती !
यावेळी अचानक तो आला असला, तरी त्यामुळे त्या चौकडीला काहीच फरक पडला नव्हता ..
पण - तो मात्र आपल्या स्वागताविषयी
भलत्याच अपेक्षा बाळगून लवकर आला होता !
. . मालिका पाहण्यात गुंगलेल्या त्या चौघीकडे हताशपणे पाहण्याखेरीज,
तो आता काहीच करू शकणार नव्हता !
एक मालिका सुरू होऊन, पंधरा मिनिटे झाली..
अचानक मोठ्या आवाजातल्या जाहिरातींचा अखंड मारा सुरू झालेल्या उपद्रवामुळे,
आजीने नाक मुरडले,
आईने त्रासिक मुद्रा केली,
बायकोने आणि सूनबाईने, एकसमयावच्छेदेकरून,
"चहात माशी पडल्यावर" बघून होतो, अगदी तसाच चेहरा करत,
एकमताने नाराजी व्यक्त केली..
"शी बै, नको तेव्हाच हे च्यानेलवाले
या जाहिराती कशा मधेच लावतात की !"
आता तरी चहाचा कप आपल्या पुढ्यात येईल, या आशेने तो उत्सुक झाला होता ..
पण,
मोठ्या आवाजातला तो टीव्ही बंद तर झाला नाहीच, त्याऐवजी जाहिरातीपुरता आवाज सूनबाईने म्यूट केला ..
आणि-
"जाहिरातवाले आपला रसभंग किती निर्लज्जपणे व बेमालूमपणे करतात-"
या विषयावर एक मिनिट व एकोणपन्नास सेकंद तावातावाने बिचाऱ्या चौघींत चर्चा चालूच राहिली ..
टीव्हीच्या आवाजापेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात !!