Harsha Lohe

Others

2.6  

Harsha Lohe

Others

आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता

आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता

3 mins
313


नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणींनो..

           

         आजचा विषय तसा फारच नाजूक आहे कारण हा प्रश्नच खूप गंभीर आहे. आताची परिस्थिती पाहता विचार केला तर प्रत्येक घरात एक ना एक व्यसनी व्यक्ती असतेच. आता व्यसन कोणत्या प्रकारचे आहे हे प्रत्येकाचे वेगवेगळे..


         सर्वप्रथम आपण व्यसन म्हणजे काय जाणून घेऊया. "व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीची , वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची खूप जास्त प्रमाणात लागलेली सवय". आता सवय माणसाला कशाचीही लागू शकते चांगल्या गोष्टींची किंवा वाईट गोष्टीचीही. त्या गोष्टीचं आपण व्यसन लाऊन घ्यायचं किंवा नाही हे पूर्णपणे आपल्या स्वतःवर अवलंबून असते. 


          व्यसन म्हटलं की सर्वांसमोर एकच चित्र दिसते ते म्हणजे दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनी माणसाचं , त्याच्या घराचं आणि त्याच्या घरातील त्रासलेल्या लोकांचं. या व्यसनाला कोण जबाबदार आहे, स्वतः व्यसनी तरुण , व्यसनी तरुणांचे आईवडील , की आपला हा निर्दयी समाज. आपल्या समाजात काहीच निर्बंध नाहीत का या व्यसनासाठी ??


व्यसनी मुलांचे पालक:-


         आज ८०% घरात हीच परिस्थिती आहे , 

आपला मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे हे पूर्णपणे माहीत असून सुध्धा काही आईवडील त्या व्यसनी मुलाचं लग्न लाऊन देतात. का तर लग्न झाल्यावर सुधारेल किंवा त्याची बायको पाहत बसेल आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो. अरे पण जी मुलगी तुम्ही त्या व्यसनी मुलासाठी निवडता ती आधी कुणाची तरी लेक असते , एक हाडा मासाचा जिवंत जीव असते ती कसा सहन करणार हा अन्याय. उलट तुम्हीच तिला वाळीत टाकल्यासारखं वागायचं, तिचा तिरस्कार करायचा आणि तिच्या नशिबाला दोष देऊन मोकळं व्हायचं. किती दिवस चालणार हे सगळं ???


         लग्न झाल्यावर तिला जेव्हा पहिल्यांदा माहिती पडतं की , तिचा नवरा रोज दारू पितो तिचं आयुष्य तर तेव्हाच संपल्यासारखं होतं. पण तरी हा कधीतरी सुधारेल या वेड्या आशेवर ती आयुष्य काढत जाते. त्यामध्ये तिला किती मानसिक त्रास सहन करावा लागतो हे तिच्याशिवाय कोणीच समजू शकत नाही. याला सर्वस्वी जबाबदारी आहेत त्याचे आई वडील ज्यांनी स्वतःच्या मुलाचं व्यसन , त्याचं भविष्य काय माहित असून देखील एखाद्या मुलीचं आयुष्य खराब केलं. वरून हुंडा पण मागायचा.


          मुलीचं लग्न झालं की ती माहेरच्यांनी देखील परकी होऊन जाते. आणि त्यातही तिला वडील नसेल तर तिच्याकडे तर कोणी ढुंकूनही पाहत नाही. माहेरचे देखील तिच्याकडे वाईट नजरेनेच बघतात जसं काही व्यसन तिच्या नवऱ्याला नाही तर तिलाच आहे. आणि तसंही ज्या स्त्रीचा नवरा तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो तिला सासर आणि माहेर दोन्हीकडे चांगली वागणूक मिळत असते ,अन्यथा नाही.

          

समाज:- 


         आता बघुया समाज किती जबाबदार आहे. समाज म्हणजे कोण ?? तुमच्या आमच्या सारखे लोकच ना ?? आपल्याला माहिती असतं ती मुलगी या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीमुळे आधीच किती त्रासातून जीवन जगत आहे एक आपल्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून आणि दुसरे तिचं स्वतःचे मुलं, पण आपला समाज तिला त्या चिखलातून बाहेर काढण्याऐवजी तिलाच अनेक दोष देऊन मोकळा होतो. हीचीच काहीतरी चूक असेल म्हणून तो दारू पितो. अरे ती आधीच मनाने मेलेली आहे तिला आणखी का मारता. शक्य असेल तर तिला बाहेर काढा परत नका तिच्यावरच लांच्छन लावू.  

  

         आतातर परिस्थिती इतकी गंभीर होत चालली आहे की या व्यसनी लोकांमुळे निर्व्यसनी मुलांना देखील मुली मिळणे अशक्य झाले आहे. कारण याआधी मुलींच्या पालकांची झालेली फसवणूक , निष्पाप मुलींचे गेलेले जीव..काय चूक होती त्यांची की त्यांनी याच्या एका बाटलीसाठी स्वतःच आयुष्य संपवलं. आणि वरून आपला समाज तिलाच दोष देतो, ती सासर माहेर दोन्हीकडे ओरडून ओरडून स्वतःच दुःख सांगते तेव्हा तुम्ही तिला समजून घेत नाही आणि तिने स्वतःचा जीव गमावल्यानंतर ओरडता की तिने असं नाही करायला पाहिजे होतं. आम्हाला का नाही सांगितलं. 


मी वारंवार हात जोडून एकच विनंती करते आपल्या आसपास अशा व्यसनी माणसाच्या विळख्यात फसलेल्या मुलींना बाहेर काढा शक्यतो एखाद्या गरिबाला मुलगी द्या पण व्यसनी पुरुषाच्या गळ्यात बांधून तिला आयुष्यभरासाठी फास नका लावू. मेलेल्या मुलीचा फोटो घरात लावण्यापेक्षा घटस्फोट घेऊन स्वतःची जिवंत मुलगी घरी आणलेली कधीही चांगलीच..दारूच्या घाणेरड्या वासापेक्षा घामाचा सुगंध कधीही चांगलाच येईल...


Rate this content
Log in