तु पण कधी एक सुट्टी घे रे देवा
तु पण कधी एक सुट्टी घे रे देवा
तु पण कधी एक सुट्टी घे रे पांडुरंगा,
नाहीतरी दिसायला दगडात आहेसच उभा !
दोन्ही हात कटेवरी युगेयुगे
दुखुन नाही आले का?
ये कधी विसाव्याला
मोकळे कर हात पाय
उतरुन ठेव डोक्यावरचा भार
; पण हसणं मात्र तेच असु दे
गोडपैकी ओठांवर, आहे तसंच!!
एक सुंदर पिवळ्या चाफ्याचा हार
खुलुन दिसेल तुझ्या काळ्या कांतीवर,
तेवढीच सुटका उदबत्तीच्या कोंडमाऱ्यातून..
"खरंच असशील तर ये!!
बघतोस काय हात ठेवून कंबरेवर?
बरं, एवढं तरी करच आता"
आगळं असं काहीच बोलणार नाही!
कुठलेच आरोप नाही..
कसलंच मागणं नाही..
तूच सांग तुझी काही ईच्छा!
तूच माग तुझं मागणं!
घे काही माझ्याकडुन
जे असेल मला देण्यासारखं..
मला हवा तसा ये!
फक्त तेवढा खुलून ये..
अगदी रितारिकामा!
मोकळ्या हाताने.. मोकळ्या मनाने..
मला आवडतो मोकळा ढाकळा जीवभाव
कुणाला दिसणार ही नाहीस, अगदी
जरी इथे आलास तू!
लोकांना हवा तसा दगडात दिसतोस ना, पांडुरंगा...
