ती आली होती...
ती आली होती...
(कल्पना - आईच्या अकाली मृत्यू नंतर दाटून आलेले दुःख या कवितेत मांडले आहे. )
ज्यावेळी पापणी
ओली झाली होती
त्या सकाळी
पहाट वेळी
ती आली होती...|| धृ ||
येताना ती जरा दबकतच आली
मला पाहताच खूप तृप्त झाली
हसली थोडी जेव्हा माझी नजर गेली
तेव्हा "कसा आहेस तू...?"
तिने विचारपूस केली होती
त्या सकाळी
पहाट वेळी
ती आली होती... || १ ||
माझ्या साऱ्या वेदनेचे दुःख
तिला होत होतं
मी खूप मोठं व्हावं
अस तिचं मत होतं
आता मी खूप मोठा होऊनही
मन मला खात होतं
मला जगणं शिकवून मात्र
स्वतः मृत्यू कडे निघून गेली होती...
त्या सकाळी
पहाट वेळी
ती आली होती...|| २ ||
सदैव सोसत असे ती
दुःखाचा झळा
पण शेवटच्या श्वासापर्यंत
लावत राहिली लळा
नेहमी म्हणायची
" पोट भर जेव रे बाळा"
त्या शब्दांची मला
आज आठवण झाली होती
त्या सकाळी
पहाट वेळी
ती आली होती....|| ३ ||
कर्तव्यासाठी आता
झिजवतो आहे काया
शोधूनही सापडेना
ती वेडी माया
त्या मायेची ती आता
मिटवून गेली छाया
त्या ममतेची खरी किंमत
मला आज कळत होती
त्या सकाळी
पहाट वेळी
ती आली होती...|| ४ ||
"तुझ्या बाळाने देखील"
"असच मोठ व्हावं"
"तू देखील तुझ्या बाळाला"
"असाच लळा लावं"
" तुमची मेलेली आजी"
"आता तारा झालीये, म्हणावं"
डोळे उघडले गेले
त्यावेळी पहाट झाली होती
त्या सकाळी
पहाट वेळी
ती आली होती...|| ५ ||
