संभ्रम
संभ्रम
माझी मलाच पुरती ओळख नाही
नुसत्या चर्चाच झडत आहे
अबला मी... का.... स्त्री शक्ती?
अजून संभ्रमच आहे
आई, बहीण, पत्नी
सारी माझीच रूपे
प्रेयसी म्हणूनही मीच हवी
तरी मुलगी म्हणूनच का नको आहे?
अजून संभ्रमच आहे
गृहिणी कृतदक्ष मी
घर सावरण्या सज्ज आहे
पतीराजांची मर्जी सांभाळण्या
पत्नी बनू ... की ... प्रेयसी ?
अजून संभ्रमच आहे
स्त्री-पुरुष समानतेच्या युगात
प्रत्येक क्षेत्रात मी पुढे आहे
अवकाशाला जाऊन भिडले
तरी धरणीवर का पीडित आहे?
अजून संभ्रमच आहे
पुरुषप्रधान संस्कृती म्हणता
स्त्रीच स्त्रीची वैरी आहे
माझा खरा शत्रू कोण?
माणूस... का.. त्याचे विचार
अजून संभ्रमच आहे
साडी मी आवर्जून नेसते
जीन्स ही मज आवडते
बघणाऱ्यांच्या नजराच बोचऱ्या
परिधान तरी काय करू?
अजून संभ्रमच आहे
लक्ष्मीबाई मी
अहिल्या मी
सावित्री ही मीच
तरी रोज एक निर्भया बळी का जात
आहे?
अजून संभ्रमच आहे
