पाऊस असाही तसाही
पाऊस असाही तसाही
1 min
198
विजा कडकडायला लागल्या
आताशा पावसाला सुरवात होईल
सारं कसं अगदी अंधारून आलंय
धुळीनं माखलेले रस्ते आता
नव्यानं खुलून येतील
मरगळलेली झाडं सतेज होतील
ती बघ लकाकून गेली वीज
आता पाऊस येईल
गारा, वादळ, पडकं छत पडक्या भिंती
इतके सारे प्रश्न मनात घेऊन
कुठं साठवू या पावसाला
डोक्यावर पक्कं छप्पर घेऊन
पावसाचा आनंद घेणारी माणसं
आणि...बिना छपराची डोळ्यातल्या पाण्यानं
पावसात भर घालणारी माणसं
झोडपणारा पाऊस नागड्या देहावर घेणारी
पाहिली मी माणसं
उन्हानं खन्न वाळलेल्या भाकरीचे तुकडे
पावसात भिजवून खाताना पाहिली मी माणसं
बाकी काय......
तसा पाऊस मन भिजवून जातो
कधी कधी मन थिजवून जातो
