मी हवी म्हणजे काय हवं
मी हवी म्हणजे काय हवं
सकाळी उठून चहा उकळणार यंत्र की
दुपारी अन्न रांधून वाढणार पात्र
सध्याकाळी माळावा गजरा,
रात्रीचा शिनगार लाजरा
मी हवी म्हणजे नेमकं काय हवं
मी उशांचे अभ्रे धुते
मी खिडक्यांचे पडदे बदलते
माझ्या हातात असतो सुई-दोरा
मी वेजावर नजर ठेवते
बोटाला सुई टोचू नये म्हणून जपते
इतकंच काय,
कोटालादेखील सुई टोचू नये
असं हळुवार मी बटण शिवते
मी म्हणजे देवघरातला महावस्त्र
जे धुतलं जातं क्वचितच
लग्न असतं माझ्या आयुष्यातील पहिलं धुणं
महावस्त्राच्या काठाची जर आकसून गोळा व्हावी
तसे फुलण्याचे सगळे रस्ते गोळा होतात
अंगालगत आकसून चिकटून बसतात.
ही असते माझी मर्यादा
कुणा लक्ष्मणाने मला आखून दिलेली
हा मर्यादेचा मुकुट मी समाजपुरुषाच्या डोक्यात मापात बसवते
मी उभ्या घराला सांभाळून घेते
मी सांधते, मी बांधते, मी लिंपते
हर एक दुराव्याचं छोटंसुद्धा छिद्र
रोज नवी त्वचा कापून
मी आयुष्याला ठिगळ लावते
उरलेल्या त्वचेचं पान
भविष्यासाठी संकल्पून ठेवते
मी राणी, मी सम्राज्ञी
माझ्याशिवाय संस्कृतीचं पान सुद्धा हलत नाही
मला देवी म्हणतात
माझ्या हातात शस्त्र दिलेलं असतं
पण या शस्त्राला धार नाही
हे साऱ्यांना आधीच ठाऊक असतं.
मी देवी !
मला हार घालतात
वरून फुल दिसतात
आतला दोऱ्याचा फास मी लपवते
पायाखालची फळी घट्ट धरून ठेवते
नेटाने श्वास घेत राहते
मला जगायचं असतं
मला मरणाची भीती वाटते
मी उसळते, मी उसासते, मी धुमसते
चक्रीवादळागत घुमते
आता वादळ घुमणार आहे
सारा पाचोळा उडवणार आहे
