कविता
कविता
1 min
394
सण आला दिवाळीचा
तुम्ही फराळात दंग
काम करुन शेतात
माझे भिजते सर्वांग
लाडू करंज्या चकल्या
गोड तुमचा फराळ
भाळी माझ्या कामधंदा
रोज कामाचं गुऱ्हाळं
तुम्ही दंग मैफिलित
रम्य दिवाळी पहाट
पाणी शेंदण्या पहाटे
माझ्या हातात रहाट
नवी खरेदी तुमची
मिळे तुम्हाला आनंद
शेत शिवारी राबणं
हाच जडलाय छंद !
सणा सुगीच्या दिसात
तुम्हा नटणं सजणं
माझी कष्टाची दिवाळी
शेती मातीशी झुंजणं
