कविता
कविता
1 min
442
क्षणात हसते क्षणात रुसते
मनात शिरुनी बसते कविता
वाटेवरती हरवून, कधी कधी
क्षणात परतून येते कविता
मनात लपला श्रावण कविता
नवयुवतीचे यौवन कविता
विरहाच्या त्या कठोर राञी
प्रेयसीचे स्मरण कविता
तिच्याच सोबत फिरते
तरीही तिच्याचसाठी झुरते कविता
तिच वसते नयनी तरीही
तिलाच शोधत असते कविता
स्वप्ने फुटुन गेली तरीही
खाचाखळग्यात सुचते कविता
काटे पेरल्या वाटेवरती
गुलाबासारखी फुलते कविता
कविता असते गुज मनीचे
कविता असते गुढ प्रीतीचे
एकांताची मैञीण बनते
ती सुद्धा कविताच असते
सुर्यास्ताला सुंदर करते
तीसुद्धा कविताच असते
खुप रंगाची,खुप ढंगाची
विविधरंगी दिसते कविता
एकदा लिहुन ठेवली कि
आयुष्यभर आपली बनते
कविता.....
